अमूर्ताच्या रंगीतरेषा

    18-Feb-2024   
Total Views |
Article on dr ganesh tartare

घर नसलेल्या एका कलाकाराने आपल्या अमूर्त चित्रांसोबतच्या प्रवासात मुंबईसारख्या शहराला आपले घर केले. जे. जे. महाविद्यालयात आजही मार्गदर्शकाची भूमिका बजावणार्‍या, डॉ. गणेश तरतरे यांच्याविषयी...

जळगावजवळ यावल नावाचे एक गाव होते. तिथे एक मठ होता. एक दिवस एक आई आपल्या ११ दिवसांच्या मुलाला घेऊन, त्या मठाच्या आश्रयाला आली. बाळ जन्माला येऊन, दोन आठवडेही झाले नव्हते आणि नियतीने तिचे कपाळीचे कुंकू पुसले. माय-लेकाला मठाने आधार दिला. महाराजांनी त्यांची जबाबदारी घेतली. आई विणकर होती. हाताच्या बोटात कलेच्या रुपात शारदा वास करत होती. त्यावेळी यावलजवळ हातमागावर कापड विणले जायचे. साड्यांचे काठ, त्यावरची कलाकुसर लीलया उमटत असे. बाळ मोठं होत होतं. मठाधिपती गुरुमूर्ती शिवाचार्य महाराज होते. ११ वर्षे अशीच गेली. एक दिवस बाळाचे मातृछत्रही काळाने हिरावून घेतले. बाळाचे बाळपण संपले आणि आता सुरू झाले गणेशचे आयुष्य. महाराजांच्या छत्रछायेत, मठाच्या वसतिगृहात.

तो काळ होता स्वातंत्र्यानंतरचा. सरकार नवीन-नवीन होते. प्रशासनाकडून काही निर्णय घेतले गेले. ज्याचा फटका लोकांच्या जनजीवनावर बसू लागला. भारत आपल्या धार्मिक आणि भक्ती संस्कृतीशी घट्ट नाळ जोडून होता. धार्मिक संस्था उत्तम कार्यरत होत्या. लिंगायत समाजाचे प्रमाण मोठे होते. अनेक विद्यार्थी शिकून ज्ञानप्रसार करत होते आणि १९५४ साली धर्मादाय आयुक्त सरकारने नियुक्त केले. ट्रस्ट स्थापन झाले. अधिपती पद्धत काहीशी मागे पडून अध्यक्ष, उपाध्यक्ष असा प्रकार उदयाला आला. मठांचे उत्पन्न कमी झाले. उत्तम शिक्षकांची कमतरता जाणवू लागली होतीच. गुरुमूर्ती यावलचा मठ सोडून, छत्रपती संभाजी नगर येथे गेले. पुढे वसमत येथे मठ होता. महाराजांनी आपल्यासोबत गणेशलाही नेले. वसतिगृहातील मोठ्या कुटुंबात गणेश मोठा होत होता. हात आपली करामत दाखवू लागले होते. त्याच्या आईची कलेची अक्षय्य देणगी त्याच्याजवळ होतीच. घरातून मिळालेला वारसा. घर मात्र गणेशने केव्हा पाहिले नव्हते. त्याला चुलते नव्हते की, मावशा नव्हत्या. त्याचे आईवडील सुद्धा एकटेच! दिवाळीच्या सुट्टीत वसतिगृहातील मुले घरी गेली की, गणेश आणि महाराज मठात एकटे उरत. चार पणत्या आवारात लावून, मग ते बाहेच्या फटाक्यांचे आवाज ऐकत बसत. दोघेच. अशावेळी महाराज गणेशला गोष्टी सांगत. आपल्या गुरूंना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गुरूंचे ज्ञान, त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान हे सगळे ऐकताना, गणेशचे आयुष्याबाबतचे तत्त्वज्ञान विकसित होऊ लागले होते. एकीकडे गणेशची लहानसहान कामे सुरू होती. टी-शर्ट प्रिंट करून देणे, साईनबोर्ड बनवून देणे.

पुढे संभाजीनगरला गेल्यावर, तो रुढार्थाने अर्थार्जन करू लागला. शिकत होताच. कलाशिक्षण हे ध्येय. आपलं घर शोधत शोधत, मुंबईचा रस्ता त्याने शोधला. मुंबई रंगीत, झगमगती, कलासक्त, विविध रुपांची मायानगरी. गणेशची कला बहाव्यासारखी बहरत होती, तरीही अमूर्त, अर्थगर्भ. रंग त्याचे माध्यम होते आणि त्या माध्यमातून तो आपले आयुष्य साकारू लागला. निराकार साकारणारा चित्रकार! उच्चशिक्षण झाले आणि गणेश आता ‘सर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ’पीएचडी’ झाली.दरम्यान, काही वेळा गणेश मठात जाऊन आले होते. मधल्या कालावधीत महाराजांचे देहावसान झाले. गणेश तेव्हा ट्रस्टवर काही काळ राहिले. नव्या बटूला शोधून, मठाधिपती केले. हळूहळू त्यानंतर त्यांनी आपला आणि मठाचा मार्ग वेगळा केला. त्यांना आपल्या गत आयुष्यात आईवडील मिळाले नसले तरी प्रेम, सहानुभूती अपार लाभली. लोकांना त्यांच्याविषयी जिव्हाळा दाटून येई. तेव्हा त्यांचा एकच आग्रह असे, माझ्यावर केवळ दया दाखवू नका, तर माझ्यात असलेल्या अंगभूत गुणांवर प्रेम करा. त्यांना वाखाणून त्यांचे कौतुक करा. माझ्या कलेची कदर करा. या स्वाभिमानाची जाणीव मात्र त्यावेळीपासूनच होती. १९९४ साली त्यांनी मठात वाचनालय सुरू केले. वसमत येथे असलेल्या धर्मपीठाचे नंदीगोत्र होते. अनेकांची वाचनीय पुस्तके या ग्रंथालयात आहेत.

सध्या गणेश आपल्या पुस्तकावर काम करत आहेत. त्यांना त्यांची जीवनसाथीसुद्धा त्याच मठात सापडली. आपल्या कलेला जोपासावे, तसे त्यांनी तिच्याप्रतीचे आपले प्रेम जपले आणि एक दिवस लग्न केले. त्यांची मुले मोठी झाली आणि आपल्या आयुष्यात स्थिर आहेत. आज ते त्यांच्या गुरूचे चरित्र लिहिण्याचे काम करत आहेत. अरे हो, सांगायचे राहिलेच. बहुतांश वेळा प्रतिभावंत हातात कला असेल, तर शब्दांच्या माध्यमाकडे फारसे वळत नाहीत. मात्र, गणेश हे उत्तम लेखक आहेत, उत्कृष्ट समीक्षक आहेत. शब्दांतूनही चित्र उभे करायची कला त्यांना वश आहे. विचारांची अमूर्तता या शब्दातून मूर्तिमंत साकार होते. आपल्या गुरूंचे धार्मिक तत्त्वज्ञान, सामाजिक जाणिवेतून व्यतीत केलेले जीवन, यांच्या एकत्रीकरणातून साकारलेले स्वतःचे असे तत्त्वज्ञान आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे वेगळं अनुभवातून मिळवलेले ज्ञान. हे सर्व तुटकतुटक आठवताना, ते लिहून ठेवतात. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या, आपल्या गुरूंच्या आयुष्याचा पट मांडताना, त्यांच्या स्वतःतील गुरूलाही या विलक्षण गुरुतत्वाचा परिसस्पर्श व्हावा, याच सदिच्छा!
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.