छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाकडे ‘रावण’ या भूमिकेतूनच बघितलेले दिसते आणि अतिशय सावध राहून त्या संकटांचा मुकाबला केला. यासोबतच श्रीरामांनी वालीचा वध करून, किष्किंधेचे राज्य त्याचा भाऊ सुग्रीवाला दिले, तर रावणाचे राज्य त्याचा भाऊ बिभीषणाला दिले. कंस वधानंतर भगवान श्रीकृष्णांनी मथुरेचे राज्य त्याचे वडील उग्रसेन यांना दिले. ही दुसर्या राज्याप्रति व तेथील जनसमूहाप्रति व्यक्त केलेली व स्वीकारलेली भावना यावर आज आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
हर घर में एक ही नाम,
एक ही नारा गूंजेगा,
मेरे भारत का बच्चा बच्चा,
दि. २२ जानेवारी २०२४ला अयोध्या येथील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्ताने मला ही घोषणा ऐकायला येत होती. वाटले फक्त ‘जय श्रीराम’ हा नारा देऊन किंवा घोषणा देऊन चालणार नाही, तर पुनश्च एकदा श्रीराम-कृष्णाच्या कथा मुलांना जगायला शिकवल्या पाहिजेत. त्यात विशेषतः पालक, समाज, शिक्षक यांनी पुन्हा एकदा रामायण-महाभारत जाणून घ्यायला हवे. श्रीराम-कृष्ण हे फक्त उत्सव न राहता, जगण्याचा आधार व्हायला हवे. इयत्ता चौथीला असताना, या राष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण सर्वांनीच अभ्यास केला. ५० वर्षांहून अधिक काळ झाला असेल, इयत्ता चौथीला शिवछत्रपतींचा इतिहास आहे. महाराजांना लहानपणी त्यांच्या मातेने रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. श्रीराम-कृष्ण हे जगण्याचे साधन आहे, हे या मातेने त्यांच्या मनावर ठसवले. म्हणूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत. महाराजांनी श्रीरामचरित्र जीवनात तर श्रीकृष्णचरित्र राजकारणात वापरले.
मित्रांनो, लहानपणी आपल्यावर जे संस्कार होतात, ते मोठेपणी निश्चितच उपयुक्त ठरतात. दुर्दैवाने नीतिमत्तेचे बाळकडू असणार्या आपल्या अनेक धर्मग्रंथांचा प्रभाव आज काही परिचित-अपरिचित कारणांमुळे कमी झाला. आम्ही धर्मग्रंथ घराच्या बाहेर काढले. कीर्तन, प्रवचन यांना हल्ली फारसे कोणी जात नाही. घरात आजी-आजोबा दिसत नाहीत. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. वर्तमान कालखंडातील स्त्री शिक्षणाने नोकरी करती झाली; पण तिच्याजवळ तिच्याच मुलांसाठी वेळ नाही. घरोघरी शोधूनही जिजामाता सापडत नाहीत. मानवी जीवनावर संस्कारांचा मोठाच प्रभाव असतो. संस्कार देणार्या केंद्रांचाच लोप होताना दिसत आहे. याशिवाय संस्कार मूल्यशिक्षणातून मिळतात. शाळा-शाळांमधील पूर्वीचे मूल्यशिक्षणाचे तास कमी झाले आहेत. त्यामुळेही मूल्यशिक्षण कमी झाल्यासारखे आहे. ‘कोविड’मुळे मोबाईल मात्र मुलांच्या हाती लागला आहे.
फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली,
श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली,
लक्ष लक्ष दिव्यांनी झगमगाटी रोषणाई,
श्रीरामाच्या विजयी पताकांनी, आयोध्या सजली.
दि. २२ जानेवारीला अयोध्येत भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानिमित्ताने देशभर दिवाळीसारखे वातावरण होते. लोकांनी घरोघरी आकाशकंदील लावले, रोषणाई केली, गोडधोड करून आनंदोत्सव साजरा केला. गावागावांतील मंदिरात व त्याच्या परिसरात रोषणाई केली आणि एक वेगळाच अनुभव येत होता, जणू रामराज्याची नांदीच! पण, त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपले योगदान देणे आवश्यक आहे. किमान आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. कदाचित आज तेच होताना दिसत नाही. ‘कष्टाळू’ लोकांपेक्षा ‘कष्ट टाळू’ लोकांची संख्या जास्त दिसत आहे. कोणतेच क्षेत्र याला अपवाद नाही, असे मला वाटते.शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात प्रजा सुखी आणि समाधानी होती. स्वराज्यासाठी कोणताही त्याग करण्यास, ती मागेपुढे पाहत नव्हती. माझ्या मते, खरंतर आदर्श रामराज्याचे वास्तविक रूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात आपल्याला दिसून येते. सुशासन, पारदर्शिता, समान संधी, श्रमप्रतिष्ठा यांचा एकत्रित विचार म्हणजेच रामराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात या सर्वच गोष्टी होत्या म्हणूनच रयत सुखी आणि समाधानी होती.
परंपरेनुसार सध्याच्या युगाला ‘कलियुग’ म्हणतात, तर रामायण हे त्रेतायुगात व महाभारत द्वापारयुगात झाले. असं मानलं जाते की, महाकाव्यांच्या इतिहासात महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण हे पहिले महाकाव्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, महाभारताचे युद्ध साधारणत: पाच हजार वर्षांपूर्वी झाले. या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांचा ३५वा वंशज बृहतपाल कौरवांकडून लढताना, पांडवांकडून मारला जातो. यावरूनच महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाला साधारणतः सहा हजार वर्षे झाली असावीत, असे परंपरा सांगते. महर्षी वेदव्यास रचित महाभारत हे असेच दुसरे मोठे महाकाव्य. जर आपण भारताचा नकाशा समोर आणला, तर आपल्याला असं लक्षात येतं की, रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी उत्तरेला असलेल्या अयोध्येपासून दक्षिणेतील लंकेपर्यंत पराक्रम गाजवत उभा भारत जोडला, तर महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी पश्चिमेला द्वारकेपासून अतिपूर्वेला प्रागज्योतीपर्यंत (आसाम) पराक्रम गाजवत, आडवा भारत जोडला. श्रीराम-कृष्णांमध्ये असलेली समरसता, संघटन कौशल्य व समर्पण वृत्ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रकर्षाने दिसते. म्हणूनच समर्थांनी म्हटल्याप्रमाणे ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे ब्रीद त्यांनी पूर्ण करून दाखवले. सामाजिक समरसतेचा वस्तुपाठच महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला.
महर्षी वाल्मिकी रचित रामायणातील नायक प्रभू श्रीराम आहेत, तर महर्षी वेदव्यास रचित महाभारतातील नायक भगवान श्रीकृष्ण आहेत. भारत भूमितील बहुसंख्य लोकांनी या दोघंही नायकांचा ईश्वर म्हणून स्वीकार केला आहे. १९८७-१९८८च्या जवळपास दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ९ ते १० या रामायण-महाभारताच्या मालिकेच्या वेळेत अखंड भारतातील रस्ते, गावं, शहरे सुमसाम पडत. यावरून सुद्धा या भूमीतील लोकांची श्रीराम-कृष्णांप्रति काय भावना आहे, हे सहज लक्षात येते. यातील श्रीरामांकडे आपण आदर्श मानवी जीवनाचे चरित्र म्हणून पाहतो, तर भगवान श्रीकृष्णांकडे आपण आदर्श व व्यवहार यांची समन्वयात्मक मांडणी करणारे चरित्र म्हणून पाहतो.रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी व महाभारत लिहिणारे महर्षी वेदव्यास हेसुद्धा ग्रंथरचनेच्या काळाशी समकालीन होते. म्हणूनच दोघांचाही आपापल्या महाकाव्यांमध्ये पात्र म्हणून समावेश आहे.समाजमनामध्ये प्रभू रामचंद्र हे एक पत्नी व्रत असून, गृहस्थाश्रम पाळणारी आदर्शवत व्यक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीला, रासलीला लोकांना विशेष आवडतात. त्यासोबतच भगवान श्रीकृष्णांची बाळकृष्ण, गोपाळकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण, सखाकृष्ण अशी नानाविध रूपेसुद्धा लोकप्रिय आहेत.\
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे
जेव्हा-जेव्हा या पृथ्वीतलावर अधर्म वाढतो, तेव्हा-तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी ईश्वर अवतार घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला कधी ईश्वर म्हणून संबोधले नाही; पण त्यांचे एकूण कार्य त्याच प्रकारचे होते. परकीयांच्या गुलामगिरीने रयत भरडली जात होती. आया-बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते. अशा कठीण परिस्थितीमध्ये शिवबा राजांनी रयतेला सुखी आणि समाधानी करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. अत्याचारी, दुराचारी सत्ताधीशांचा निःपात करत, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धात समोर असलेल्या परिस्थितीचा सर्व अभ्यास करून काय केले म्हणजे आपल्याला यश मिळेल, याचा सर्व अभ्यास करूनच निर्णय घेतले. अगदी महाराजांनी सुद्धा स्वराज्यावर ज्या-ज्या वेळी संकटे आली, त्या सर्व संकटांचा यथोचित अभ्यास केला. काय केले म्हणजे आपल्याला यश मिळेल, याचा विचार करूनच निर्णय घेतले. उदा. शिवाजी महाराज आग्य्राला बादशहाच्या काळ कोठडीत असताना, त्यातून बाहेर कसे पडायचे, हा एक खूप मोठा प्रश्न होता. तेव्हा त्यांना त्यांच्या मातेने लहानपणी सांगितलेली महाभारतातील लाक्षागृहाची गोष्ट नक्कीच आठवली असणार. लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून मारण्याचा कट दुर्योधनाने मामा शकुनीच्या मदतीने आखलेला असतो. त्यातून पांडव स्वतःची सुटका कशाप्रकारे करून घेतात, याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. कदाचित त्यातूनच महाराजांना औरंगजेबाच्या काळकोठडीतून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळालेली असू शकते. या दोन घटनांमधील साम्य आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला निश्चितच बर्याच गोष्टी लक्षात येतात.
दुसरे असेच एक उदाहरण देता येईल. स्वराज्यावरील अफजलखानाचे संकट निवारण्यासाठी, महाराजांनी वाघनखांचा उपयोग केला. वाघनखाची संकल्पना आपल्या पौराणिक कथांमधील नरसिंहाच्या अवतार कार्यातून घेतलेली असू शकते. ज्या प्रकारे नरसिंहांनी वाघनखांच्या साहाय्याने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून वध केला, महाराजांनी सुद्धा वाघनखांचा उपयोग करून, अफजलखानाचा वध केला.नारदमुनींनी नीतीविवेचनात आदर्श राजाचे गुण सांगितले आहेत. राजा हा नीतिमान, पराक्रमी, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवचनी, चारित्र्यसंपन्न, विद्वान, सामर्थ्यशील असावा. हे गुण श्रीराम-कृष्णांमध्ये होते. तसेच ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही होते. त्याचा प्रत्यय आपल्याला शिवछत्रपतींच्या गौरवपूर्ण इतिहासाचा अभ्यास करताना सतत येतो.भरत श्रीरामांना आणण्यासाठी गुरु वशिष्टांसह सर्व अयोध्यावासींयाना घेऊन चित्रकुटला येतो. पण, श्रीराम वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे परत येण्यास तयार होत नाहीत, तेव्हा तो श्रीरामांच्या पादुका मागतो व त्या पादुकांना सिंहासनावर विराजमान करतो. इथे दोघे भाऊ सिंहासन नको म्हणतात. राजपद घ्यायला तयार नाहीत आणि त्यासाठी ते कोणताही त्याग करायला तयार असतात. म्हणूनच मित्रांनो, मला मनापासून वाटते की, हो म्हणायला जितके सामर्थ्य लागते, त्यापेक्षा जास्त सामर्थ्य नाही म्हणायला लागते. हीच गोष्ट आपल्याला छत्रपतींच्या स्वराज्यात एका वेगळ्याच पद्धतीने दिसून येते. महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे १६८० पासून १७०७ पर्यंत मराठे मुघलांच्या अवाढव्य फौजेशी आपल्या तुटपुंजा सामर्थ्यानिशी लढले. तेव्हा अनेक वेळेला आपला नेता कोण, राजा कोण याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.
प्रत्येकालाच हिंदवी स्वराज्य हे आपले वाटत होते आणि ते कोणत्याही परिस्थितीत टिकले पाहिजे, त्यासाठी ते कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास मागे-पुढे पाहत नव्हते. शेवटी १७०७ला औरंगजेबाचा मृत्यू याच भूमीत होतो आणि मराठे खर्या अर्थाने जिंकतात. आज मात्र भाऊबंदकीतील संपत्तीसाठीच्या भांडणामुळे हजारो केसेस कोर्टात सुरू असल्याचे दिसून येते. दुसरे असे आज किती राजकारणी भेटतील की, जे मिळणारी सत्ता अशाप्रकारे नाकारतील. आजचा मानव सत्तेसाठी, खुर्चीसाठी काय-काय करताना दिसतो. अगदी गल्लीतल्या सोसायटीच्या अध्यक्ष पदापासून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत आपल्याला याबद्दल काय चित्र दिसत आहे? यावर अधिक न बोलणेच बरे.एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मला असे सांगावेसे वाटते की, आज रावण म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना त्रासदायक ठरते किंवा त्रास देते ती प्रत्येक गोष्ट. बर्याच वेळेला ज्याची आपल्याला भीती वाटते, आपल्या अभ्यासाच्या मार्गात जे विषय त्रासदायक ठरतात, त्याकडे जर आपण रावण यादृष्टीने बघितले व त्यावर विजय मिळवायचा असा निर्धार केला की, आपले काम सोपे होते. रावण म्हणजे काय तर दुसर्याला लुबाडून स्वतःला मोठे करणे, चारित्र्य हिणकाम, अहंकार, आसुरी प्रवृत्ती, दुसर्याबद्दलची आपल्या मनातील वाईट भावना.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाकडे ‘रावण’ या भूमिकेतूनच बघितलेले दिसते आणि अतिशय सावध राहून त्या संकटांचा मुकाबला केला. यासोबतच श्रीरामांनी वालीचा वध करून, किष्किंधेचे राज्य त्याचा भाऊ सुग्रीवाला दिले, तर रावणाचे राज्य त्याचा भाऊ बिभीषणाला दिले. कंस वधानंतर भगवान श्रीकृष्णांनी मथुरेचे राज्य त्याचे वडील उग्रसेन यांना दिले. ही दुसर्या राज्याप्रति व तेथील जनसमूहाप्रति व्यक्त केलेली व स्वीकारलेली भावना यावर आज आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना, ते भोसल्यांचे राज्य आहे म्हणून कधीही विचार केला नाही. याउलट ते रयतेचे व रयतेच्या कल्याणासाठी स्थापन केलेले राज्य आहे, हीच भावना होती. वर्तमान जगात या संदर्भातील चित्र अत्यंत चिंताजनक आहे, असे मला वाटते.महाभारताच्या युद्धात कर्णपर्वात कर्णाचा सारथी असलेल्या मद्र नरेश शल्याने कर्णाची ज्या प्रकारे अवहेलना केली, अगदी त्याच प्रकारे आज समाजात ठीकठिकाणी अवहेलना करणारे शल्य सापडतात. पण, कर्माचा संदेश देणारा श्रीकृष्ण मात्र दिसत नाही. माझ्या मते, हेच खरे आजच्या समाजाच्या दुःखाचे कारण आहे.श्रीरामकृष्णांचे चरित्र जगणे यातच आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ’रामायण-महाभारत आणि छत्रपती शिवराय’ हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो केवळ हमाल भारवाही॥ ही तुकोबारायांची उक्ती, तुम्हासारख्या जाणत्यांकडून खरे तर सगळे काही घेऊनच, मी हे माझे म्हणून लिहितो, याबद्दल समस्त वाचकांनी आपल्या उदार अंतःकरणाने माझ्या लिखाणाचा स्वीकार करावा.
प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे शिक्षक आहेत.)