पेटीएम पेमेंट बँकाचे खातेदार असाल तर हे नक्की वाचा....
पेटीएम प्रकरणातील इत्यंभूत नवी माहिती
घाबरू नका १५ मार्चपर्यंत पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाई पुढे ढकलली.
पेटीएम पेमेंट बँकेशिवाय पेटीएम युपीआयने दैनंदिन व्यवहार करता येतील.
मुंबई:रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या व्यवहार स्थगितीला पुढे ढकलले आहे. आरबीआयकडून या संदर्भात सूचनाही जारी करण्यात आलेली आहे. वन ९७ कम्युनिकेशनस मालकीच्या पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईत कुठलीही सवलत आरबीआयकडून देण्यात आलेली नाही. केवळ व्यवहार, देवाणघेवाणीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने प्रश्न उत्तर (एफ ए क्यू) प्रसिद्ध केले आहे. यात सांगितल्याप्रमाणे यापुढे पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात कुठलाही पैसा जमा करण्यास आरबीआयने मज्जाव केला आहे. यानुसार कुठलीही नवी ठेव, कुठल्याही बँकेचे खाते जोडण्यास अथवा फूड वॉलेट, फास्टटॅग इत्यादी सुविधा पेटीएम पेमेंट बँकेत वापरता येणार नाही.
भविष्यात या पेटीएम बँकेवर निर्बंध असले तरी पेटीएममधून युपीआयच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहार करता येणार आहेत. या पेटीएम बँकेत व्याज दर,कॅशबॅक , परतफेड अशा अपवादात्मक सेवा वगळता कुठल्याही प्रकारची थेट रक्कम ज्यामध्ये पगार, सबसिडी जमा होणार नाही.
या व्यतिरिक्त क्यू आर कोड पेमेंट पेटीएम बँकेशी संलग्न (लिंक) नसल्यास व्यापारी, दुकानदार ग्राहकांशी युपीआयने व्यवहार करू शकतील.पेटीएम पेमेंट बँके व्यतिरिक्त इतर बँकाशी पेटीएम जोडले गेले असल्यास व्यवहार करता येणार आहे.
१५ मार्चनंतर जर पीपीबीएल (पेटीएम पेमेंट बँक) शी खाते जोडले नसल्यास पेटीएम कार्ड स्वाईप मशिन व्यवहारासाठी दुकानदारांना वापरता येणार आहेत. व्यापारी, दुकानदारांची अडचण होऊ नये म्हणून पेटीएमकडून पीओएस मशीन देण्यात आली आहेत. पेटीएम पेमेंट बँक वगळता बाकी बँकाशी व्यवहार करता येणार आहे.
केवायसी असलेल्या खात्यांना पेटीएम पेमेंट बँकेतील रक्कम दुसऱ्या बँकेत जमा करता येईल. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रस्ते प्राधिकरणाच्या अधिकृत बँकेच्या संलग्न असलेल्या यादीतून पेटीएम पेमेंट बँक वगळण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील पेटीएम पेमेंट बँक ग्राहकांना म्हणजेच फास्टटॅग धारकांना ' रेडिओ फ्रिकवेन्सी आयडेंटिफिकेशन' स्टिकर्स नव्याने बनवायला लागणार आहेत.अधिकृत अहवालानुसार आरबीआय व तपास यंत्रणेचा ससेमिरा चालू झाल्यानंतर पेटीएमला २७००० कोटींचे नुकसान झाले आहे.
कथित गैरव्यवहार प्रकरणात पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडच्या खात्यांची चौकशी ईडीने पूर्ण केली असून परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (एफईएमए) कुठलाही गैरव्यवहार आढळला नसल्याचे द हिंदू वृत्तसंस्थेने नुकतेच वृत्त दिले आहे. आरबीआयने केवायसी अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तपास यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले होते.
तथापि पेटीएम पेमेंट बँकेला व्यवहार व्यवस्थापन पूर्ण करण्यासाठी आरबीआयने १५ मार्चपर्यंत अवधी दिला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पेटीएमने आपले नोडल अकाऊंट एक्सिस बँकेत वळवले आहे. पेटीएमकडून जाहीरातनाम्यात सांगितल्याप्रमाणे व्यापारी वर्गाला व्यवहारात अडथळा येऊ नये म्हणून सोय केल्याचे पेटीएमने सांगितले आहे. पेटीएम क्यू आर कोड, साउंड बॉक्स व कार्ड मशिन चालू राहणार आहेत. पेटीएम पेमेंट बँकेवर १५ मार्चपासून निर्बंध असले तरी ही उत्पादने मात्र सुरू राहणार आहेत.
याशिवाय सध्या पेटीएम पेमेंट बँकेतील रक्कम ग्राहकांना काढून घेता किंवा खर्च करता येणार आहे. परंतु १५ मार्चनंतर या पेमेंट बँकेत नवीन फंड जमा करता येणार नाही. पेमेंट बँकेच्या कारवाईविरोधात विनंतीसाठी पेटीएम चेअरमन विजय शर्मा यांनी आरबीआय व अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र कारवाई होणार असल्याने ती भेट निष्फळ ठरली आहे.
यावर पेटीएम कंपनीचे अधिकृत प्रवक्ते यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,'आम्ही अनुपालन व नियामक मार्गदर्शकतत्त्वांवर लक्ष केंद्रित करत आमच्या व्यापारी सहयोगींना विनासायास सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना आश्वासन देतो की, पेटीएम अॅप आणि आमचे अग्रणी डिवाईसेस जसे पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स, कार्ड मशिन नेहमीप्रमाणे पुढे देखील कार्यरत राहतील. नोडल खाते अॅक्सिस बँकेत (एस्क्रो खाते उघडून) हस्तांतरित करण्यामधून पूर्वीप्रमाणे मर्चंट सेटलमेंट सुरू राहण्याची खात्री मिळेल. आम्ही देशाच्या आर्थिक समावेशन प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देणा-या भारतींयाना सक्षम करत राहण्याचा प्रयत्न करतो.'