‘जो’ आवडे पुतीनला...

    16-Feb-2024   
Total Views |
 Putin's comment that he prefers Biden
 
‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला’ हे भावगीताचे सुपरिचित बोल. पण, आता अमेरिकेचा ‘जो’ म्हणजेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे एकाएकी रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतीन यांनाही आवडू लागले आहेत. आता हे वाचूनही विश्वास बसू नये, असे विधान असले तरी ते १०० टक्के सत्य! नुकत्याच एका रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकमेकांचे कट्टर हाडवैरी असलेल्या, पुतीन यांनी बायडन यांची स्तुती केल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानिमित्ताने पुतीन यांनी केलेली बायडनस्तुती खरोखरची की तोंडदेखली, हे समजून घ्यायला हवे.

पुतीन आणि बायडन यांच्यातून विस्तवही जात नाही. अनेकदा दोघांनी एकमेकांवर कठोर शब्दांत जहरी टीकाही केली. युक्रेन युद्धानंतर तर पुतीन हे हत्यारे आहेत, अशी जळजळीत टीकाही बायडन यांनी केली होती. एवढेच नव्हे तर वेळोवेळी रशियाची दादागिरी आणि पुतीन यांची हुकूमशाही यावरही बायडन यांनी ताशेरे ओढले. मग असे असताना दोन कट्टर वैरी, एकाएकी मित्र झाले का? पडद्याआड बायडन आणि पुतीन यांचा समझोता झाला असावा का? यांसारखे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. या चर्चांचे कारण ठरले, ती पुतीन यांची एक नुकतीच प्रसिद्ध झालेली मुलाखत. या मुलाखतीत पुतीन यांचा बायडन आणि अमेरिकाविरोधातील सूरही मवाळ दिसून आला. तसेच बायडन की ट्रम्प, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाला पाहायला आवडेल, असे विचारल्यावर पुतीन यांनी क्षणाचाही विलंब न करता, बायडन यांचे नाव घेतले.

नुसते बायडन यांचे पारडेच पुतीन यांनी जड केले नाही, तर ते म्हणाले की, “बायडन हे अत्यंत अनुभवी नेते असून, त्यांच्या कृतीचा अंदाजही बांधता येतो. ते जुन्या शैलीचे राजकारणी आहेत.” त्यातच पत्रकाराने बायडन यांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांवरही पुतीन यांना छेडले असता, त्यावरही त्यांनी बायडन यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्रच बहाल केले. पुतीन म्हणतात, “मी जेव्हा २०२१ साली बायडन यांना भेटलो, तेव्हा मला त्यांच्या वागणुकीत काहीही गैर आढळले नाही. तेव्हाही बायडन अकार्यक्षम आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, मला त्यांच्यासोबत वावरताना असे काहीही जाणवले नाही.” एकूणच बायडन यांना पसंती दर्शविल्यानंतर “जो कोणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येईल, त्या नेत्याबरोबर काम करण्याची आमची तयारी आहे,” अशीही साखरपेरणी पुतीन यांनी केली. आता पुतीनसारख्या तीन दशकांहून अधिक काळचा प्रदीर्घ राजकीय अनुभव गाठीशी असलेल्या, नेत्याच्या तोंडची ही विधाने ग्राह्य धरायची की, आंतरराष्ट्रीय राजकारणाील हा शत्रूला गाफील ठेवण्याचा पुतीन यांचा गोड डाव मानायचा?
 
शब्दांच्या पलीकडची भाषा राजकारणात आणि विशेषत्वाने आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत महत्त्वाची भूमिका बजावते. थेट शब्दांपेक्षा नेत्यांची कृती, देहबोली यावरूनही बरेच तर्क लावले जातात. म्हणूनच पुतीन यांच्या बायडनस्तुतीमागचा अर्थ समजून घ्यायला हवा. बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा अजेंडा पुढे रेटणार्‍या माध्यमांनी पुतीन यांच्या बायडनकौतुकाचे अक्षरशः पूल बांधले. पण, गोड बोलून पुतीन यांना नेमके उलट सूचवायचे होते का? म्हणजे बघा, एखाद्या शर्यतीत सशाला विचारले की, तुला प्रतिस्पर्धी म्हणून समोर कासव हवे की हरीण? तर ससाही कासवाचेच नाव घेईल. कारण, साहजिकच हरणाच्या तुलनेत कासव हा कमकुवत प्रतिस्पर्धी असून, सशाची जिंकण्याची शक्यताही अधिक. पुतीन यांनीही असाच ‘सोपा, कमकुवत प्रतिस्पर्धीच बरा’ असा विचार करून, बायडन यांची फुकाची प्रशंसा केलेली दिसते.

कारण, बायडन हे सर्वार्थाने केवळ रशियाच नव्हे, तर अफगाणिस्तान, इस्रायल अशा एकूणच आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहेत. बायडन यांना देशांतर्गत आणि आता जागतिक समुदायातही फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही, अशी स्थिती. ८१ वर्षीय जो बायडन यांना सातत्याने होणारे विस्मरण, चालताना तोल जाणे यांसारख्या प्रकारांमुळे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सक्षम नाहीत, असा मतप्रवाह अमेरिकेतही दिसून येतो. याउलट ट्रम्प यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नीती, अन्य जागतिक नेत्यांशी सुमधूर संबंध, कणखर व प्रसंगी समेटाची भूमिका पाहता, ते उजवे ठरावे. म्हणूनच जेव्हा ट्रम्प यांना पुतीन यांच्या बायडनस्तुतीविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले की, “उलट पुतीन यांनी माझीच खूप मोठी प्रशंसा केली आहे.” म्हणूनच म्हणतात की, ’समझदार को इशारा काफी हैं।’

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची