मुंबई : "मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावणार्या गिरणी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करत राज्य शासनाने त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काचा निवारा मिळत आहे म्हणूनच या घरांमध्ये त्यांच्या आई- वडिलांचे छायाचित्र लावून त्यांचे योगदान सार्थकी लावावे”,असे आवाहन गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आ. सुनील राणे यांनी केले.
म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी मौजे कोन (ता. पनवेल, जि. रायगड) येथील २४१७ सदनिकांच्या विक्रीकरिता सन २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीतील यशस्वी ठरलेल्या पात्र व सदनिकेच्या संपूर्ण विक्री किंमतीचा भरणा केलेल्या सोडतीतील यशस्वी सुमारे ५८५ गिरणी कामगार/वारस यांना पहिल्या टप्प्यांतर्गत सदनिका चावी वाटप कार्यक्रमाचे आयोजन आज वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे करण्यात आले. यावेळी आमदार सुनील राणे बोलत होते. याप्रसंगी आमदार सुनील राणे यांनी सांगितले की, बृहन्मुंबईतील बंद/आजारी गिरण्यांमध्ये काम केलेल्या गिरणी कामगार/वारसांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये म्हाडा मुंबई मंडळाने काढलेल्या विविध सोडतीतील सुमारे १८०० पात्र गिरणी कामगार/वारस यांना हक्काच्या घराचा ताबा दिला आहे. ते पुढे म्हणाले की, मौजे कोन येथील गृहनिर्माण वसाहत मोठी आहे व प्रत्येक लाभार्थ्याने आपले घर व परिसर स्वछ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे. तसेच मुंबई मंडळातील अधिकार्यांचे कौतुक करत ते पुढे म्हणाले की, मौजे कोन येथे एमएमआरडीएतर्फे बांधलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटाच्या दोन सदनिका एकत्र करून ३२० चौरस फुट चटई क्षेत्रफळ आकारमानाची सदनिका गिरणी कामगार/वारस यांना मिळणार आहे. सदनिकांच्या दुरूस्तीसाठी म्हाडा मुंबई मंडळाने पुढाकार घेऊन काम पूर्ण केले आहे.
यावेळी आ. कालिदास कोळंबकर म्हणाले की, गिरणी कामगार/वारस यांना मोठ्या अथक परिश्रमानंतर हक्काचे घर मिळाले आहे. हे घर म्हणजे लक्ष्मी असून भावी पिढीला त्याचा लाभ घेता यावा यासाठी हक्काचा निवारा सांभाळून ठेवा. कुठल्याही परिस्थितीत त्याची विक्री करू नका, असे आवाहन कोळंबकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अभियंता राकेश गावित, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले, दीपक येकाळे आदी उपस्थित होते. रणजीत यादव यांनी सूत्रसंचालन केले.