प्रवासी टाकणार सुटकेचा निश्वास; 'या' जोडपुलांचे बांधकाम लवकरच सुरू होणार

    16-Feb-2024
Total Views |
Bridge for bandra railway Terminus
 
मुंबई :  खार सबवेच्या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी आणि वांद्रे रेल्वे स्थानकावरुन वांद्रे रेल्वे टर्मिनसला जाण्यासाठी नागरिकांची होत असणारी कसरत तसेच प्रवाशांना होत असणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी आता महापालिकेच्यावतीने पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी सुटकेचा निश्वास टाकणार आहेत. वांद्रे रेल्वे स्थानक ते टर्मिनस आणि खार भुयारी मार्गावर पूर्व व पश्चिम मार्ग जोडणाऱ्या पुलाचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. काम संपल्यानंतर लागलीच याबाबत निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पालिका प्रशासकांच्या मंजुरीने काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

पश्चिम उपनगरात खार सबवेच्या ठिकाणी पावसाळ्यात बऱ्याच वेळेला पाणी साचण्याच्या समस्येमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असते. तसेच खार पश्चिम आणि पूर्व दिशेकडून जाण्यासाठी या एकाच भुयारी वाहतूक मार्गामुळे तासनतास वाहतूक तशीच उभी असते. त्यामुळे या भुयारी वाहतूक मार्गाच्या अभावी होणारी वाहतूककोंडी आणि वाहन चालकांची समस्या लक्षात घेता महापालिकेने पूर्व व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी पूल व्हावे, अशी स्थानिक लोकप्रतिनिधींसह रहिवाशांचीही मोठ्या प्रमाणात मागणी आहे, या मागणीचा विचार करता प्रशासनाने या ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचप्रमाणे वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकापासून ते वांद्र रेल्वे टर्मिनस दरम्यानचे अंतर जास्त असल्याने बऱ्याचदा रेल्वे प्रवाशांना परिसरातील वाहतूककोंडीमुळे जाण्यास बरेच कष्ट घ्यावे लागतात. कधीकधी या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची गाडीही चुकते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता महापालिकेच्यावतीने रेल्वे स्थानक ते टर्मिनस दरम्यानही पूल बांधला जाणार आहे. या पुलाचाही आराखडा बनवला जात असून याच्या सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर लवकरच याची निविदा काढली जाईल, असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.