साहित्यिक आणि गुप्त पोलीस

    16-Feb-2024
Total Views |
Article on Literary and Secret Police

समाजवादी-साम्यवादी राजवटींनी त्यांच्या देशातल्या इतर राजकीय विचारसरणीच्या लेखकांवर नुसती नजरच ठेवली नाही, तर त्यांची ससेहोलपट केली. कित्येक जण ठार झाले. कित्येक जण सैबेरियातल्या तुरुंगात सडत राहिले. काही थोडे भाग्यवान जीव वाचवून पश्चिम युरोप किंवा अमेरिकेत आश्रय घेऊ शकले.

फ्रेंच राज्यक्रांती १७८९ साली झाली. समाज राजेशाहीविरुद्ध बंड करून उठला. राजा, राणी, अनेक सरदार, उमराव यांना ठार मारण्यात आलं. खरं तर या राज्यक्रांतीची लक्षणं १७८७ पासूनच दिसू लागली होती. १७८९ साली प्रत्यक्ष उठावाला सुरुवात झाली आणि ही प्रक्रिया पुढे दहा वर्षं म्हणजे १७९९ सालापर्यंत सुरूच राहिली.

या उठावामागे विविध कारणं होती. यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे, फ्रान्समध्ये त्याहीवेळेस सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित होते. त्यामुळे ते भरपूर वाचन करीत असत आणि त्यामुळे कवी, लेखक, साहित्यिक, नाटककार अशा विचारवंत मंडळींचा एकंदर समाजावर फार मोठा प्रभाव होता. हे ‘इंटेलेक्चुअल्स’ आपल्या साहित्यातून, लेखनातून सामाजिक व राजकीय व्यवस्थेत सुधारणा करण्याची जोराची मागणी करीत होते.

यातून अखेर क्रांती झाली. ती वेडीवाकडी वळणं घेत चालू राहिली. तिने राजेशाहीबरोबरच अनेक विचारवंतांचाही बळी घेतला. शेवटी या मंथनातून नेपोलियन बोनापार्ट हा राजा झाला. म्हणजे सोळाव्या लुईची राजेशाही संपली; पण नेपोलियनची सुरू झाली. परंतु, हा नवा राजा अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेला होता. त्याला सामान्यांच्या कष्टांची जाण होती. त्या अर्थाने तो सामान्य जनतेचा प्रतिनिधी होता आणि आपल्या जेमतेम दहा वर्षांच्या राजवटीत त्याने लष्करीदृष्ट्या फ्रान्सला सर्वोच्च स्थानावर नेलं. राज्य कारभारातही त्याने खूप सुधारणा केल्या. लोकशाही, समाजवाद, सामाजिक न्याय यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कंबर कसलेल्या, फ्रेंच लेखकांनी अगदी आनंदाने या ‘राजा’ला डोक्यावर घेतलं.

पण, बहुधा तेव्हापासूनच फ्रेंच गुप्त पोलीस खात्याने सर्व कवी, लेखक, साहित्यिकांवर नजर ठेवायला सुरुवात केली असावी. युरोपातल्या नऊ राष्ट्रांनी मिळून, नेपोलियन बोनापार्टचा पाडाव केला. पुन्हा जुन्या बुर्बां राजघराण्याची राजवट सुरू झाली. पण, तीदेखील स्थिरावू शकली नाही. सतत सत्ताबदल चालूच राहिले. या सगळ्या घालमेलीत बोनापार्टवादी, राजेशाहीवादी, लोकशाहीवादी इत्यादी नाना मतांचे पक्ष उदयाला आले आणि त्यांनी राजकारणात भरपूर गोंधळ घातला.

याच काळात फ्रान्समध्ये व्हिक्टर ह्युगो हा उत्तुंग प्रतिभेचा कवी जन्मला. १८०२ ते १८८५ हा त्याचा जीवनकाल. वयाच्या २०व्या वर्षी त्याचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. २१व्या वर्षी पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि २५व्या वर्षी पहिलं नाटक प्रसिद्ध झालं. ह्युगोच्या एकंदर साहित्यात सर्वसामान्यांविषयीचा कळवळा, कणव ठासून भरलेली असते. त्याचं पहिलं नाटक ‘क्रॉमवेल’ हे ब्रिटनचा क्रांतिकारक राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल याच्या जीवनावर होतं. क्रॉमवेल हा सामान्य माणूस होता. कर्तबगारीने पुढे येऊन, तो मोठा सेनापती बनला. ब्रिटनच्या राजघराण्याविरुद्ध बंड पुकारून, तो काही काळ राज्यकर्ता बनला होता.

एका सामान्य माणसाची ही प्रगती ह्युगोला भावली. त्याने ती नाट्यरुपात उतरवली. परंतु, हे काव्यात्म नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आणणं अत्यंत अवघड ठरलं. एक सामान्य माणूस राजा होणं, ही सुखांतिका आणि शेवटी तो माणूस व त्याची विचारधारा यांचा पराभव होणं, ही शोकांतिका. यांमधला तोल ह्युगोने विलक्षण उंचीवर नेऊन ठेवला आहे. तो रंगमंचावर तितक्याच प्रभावाने मांडणं कुणालाच जमलं नाही. मात्र, ह्युगोचं हे नाटक आणि त्याहीपेक्षा त्याची जबरदस्त प्रस्तावना संपूर्ण युरोपभर गाजली. सामान्य माणसाची सुख-दुःखं, महत्त्वाकांक्षा हाच त्याच्या लिखाणाचा केंद्रबिंदू बनला.

विशेष म्हणजे, सामान्यांविषयी एवढ्या पोटतिडकीने लिहिणार्‍या, व्हिक्टर ह्युगोचा बाप फ्रेंच सैन्यात प्रथम मेजर व नंतर जनरलच्या हुद्द्यावर होता. जो कुणी राज्यावर येईल, त्याला तो आपली निष्ठा वाहत असे. ह्युगोची आई मात्र बुर्बां राजघराण्याशी एकनिष्ठ होती. याच कारणामुळे नंतर ते दोघे विभक्तही झाले होते. फ्रान्समधल्या स्त्रिया पावणेदोनशे वर्षांपूर्वीसुद्धा स्वतंत्र राजकीय विचारांच्या होत्या. आपल्याकडे अजून पुरुषांनासुद्धा ‘पॉलिटी’ आणि ‘पॉलिटिक्स’ मधला फरक समजत नाही; समजून घ्यावा, अशी इच्छाही नाही आणि त्यांना तो समजावून द्यावा, अशी आमच्या विचारवंतांची तर अजिबातच इच्छा नाही.

तर अशा आई-बापांचा मुलगा असून, स्वतः बर्‍या स्थितीत वाढलेला असूनही व्हिक्टर ह्युगोला सर्वसामान्य लोकांबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. पुढे ह्युगो सक्रिय राजकारणात उतरला. एकीकडे लेखन चालूच होतं. लुई फिलीप या राज्यकर्त्याने त्याला उमरावपद दिलं. पण, लवकरच लुई फिलीपला बाजूला ढकलून, लुई नेपोलियन म्हणजे नेपोलियन बोनापार्टचा पुतण्या हा राज्यकर्ता बनला. राजकीयदृष्ट्या त्याचं आणि ह्युगोचं पटलं नाही. परिणामी, ह्युगोला फ्रान्सच्या सर्वश्रेष्ठ नाटककाराला बेल्जियममध्ये हद्दपार व्हावं लागलं. बेल्जियममध्ये ब्रुसेल्स शहरात हद्दपारीचं जीवन कंठत असतानाच, व्हिक्टर ह्युगोची सर्वश्रेष्ठ कादंबरी जन्माला आली. तिचं नाव-‘ल मिझराब्ल.’ १८६२ साली ही कादंबरी एकाच वेळी दहा भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आणि कमालीची गाजली. आपल्याकडे भा. रा. भागवतांनी ‘जे का रंजले गांजले’ या नावाने काही भागांमध्ये ती भाषांतरीत केली होती. सध्या ते भाषांतर अर्थातच उपलब्ध नाही.
 
व्हिक्टर ह्युगोच्याच काळातले पण त्याच्यापेक्षा वयाने लहान असे दोन कवी फ्रान्समध्ये होऊन गेले. आर्थर रिमबॉ आणि पॉल व्हर्लें अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेदेखील वैचारिकदृष्ट्या ह्युगोसारखेच म्हणजे सामान्यांच्या दुःखांना वाचा फोडणारे होते. या व अशा अनेक साहित्यिकांच्या लेखनातून समाजवादी विचारधारा पोसली गेली. तिच्यातूनच पुढे साम्यवादी विचारधारा उगम पावली आणि क्रमशः रशिया वा चीन या अवाढव्य देशांमध्ये तिने क्रांती केली. म्हणजे प्रचलित राज्यव्यवस्था उलथून टाकून, नवी राज्यव्यवस्था आणली. याचा अर्थ काय की, या विचारधारा सामान्य माणसाला बंड करण्याची प्रेरणा देतात आणि जेव्हा एखादा लेनिन किंवा एखादा माओसारखा नेता मिळतो, तेव्हा सामान्य माणूस त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन, प्रचलित व्यवस्थेला यशस्वीपणे उलथवतो. समाजवादी आणि साम्यवादी यांच्या विचारांप्रमाणे राज्य करू शकले नाहीत. अंतिमतः ते हुकूमशहाच बनले ते सोडा; पण ‘शोषितांचे राज्य’, ‘कष्टकर्‍यांचे राज्य’ या त्यांच्या संकल्पनेत अगदी आजही विलक्षण अपीत्व आहे.

हे सामर्थ्य फे्रंच गुप्त पोलीस खात्याच्या तेव्हाच लक्षात आलं होतं, असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांच्या हस्तकांनी व्हिक्टर ह्युगो, आर्थर रिनबॉ, पॉल व्हर्लें आणि इतर अनेक साहित्यिकांवर नजर ठेवली होती. ब्रुनो फुलिग्नी हा फ्रान्सच्या संसदेतला एक कर्मचारी आहे. त्याला धुळीने माखलेल्या जुनाट फाईलींचा एक मोठा ऐवज गवसला. अभ्यासांती त्याला आढळलं की, १८७९ ते १८९१ या कालखंडात, फ्रान्सचा तत्कालीन पोलीस प्रमुख आंद्रे लुई याच्या हस्तकांनी वेगवेगळ्या साहित्यिकांवर नजर ठेवून, त्यांच्या हालचालींबाबत वरिष्ठांना दिलेले हे अहवाल आहेत. फुलिग्नीला आश्चर्य वाटलं. गुन्हेगार आणि विरोधी पक्षीय यांना सोडून आंद्रे लुईचे गुप्त हस्तक ह्युगोसारख्या प्रख्यात साहित्यिकाच्या मागे का बरं लागले? मग त्याच्या लक्षात आलं की, समाजवादी किंवा त्यांचे सहप्रवासी असणार्‍यांच्या मागेच ते लागलेत. फुलिग्नीने अर्थातच या प्रकरणावर झकास पुस्तक लिहिलेलं असून, नुकतंच ते प्रकाशित झालं. त्याचं नाव आहे-‘दि रायटर्सेस पोलीस.’

व्हिक्टर ह्युगोबद्दल आंद्रे लुईच्या गुप्त पोलिसांचं मत काय; तर तो एक कंजूष आणि लोभी मनुष्य होता. आर्थर रिमबॉ हा त्यांच्या मते, अद्भुत मनुष्य होता, तर पॉल व्हर्लें हा एक भंकस, फालतू इसम होता. मात्र, एकंदरीत व्हिक्टर ह्युगोवर या हस्तकांचा फारच दात आहे, असं जाणवतं. ह्युगोबद्दलच्या बारीकसारीक तपशिलांनी तीन बॉक्स फाईल भरलेल्या आहेत.
 
व्हिक्टर ह्युगो महान साहित्यिक होता. आयुष्यभर तो सामान्य माणसांसाठी झगडत राहिला. पण, त्यांच्यातही काही दोष होतेच. गुप्त हस्तकांनी त्याच्या या स्वभावदोषांचं रसभरित वर्णन केलं आहे. साहजिकच आहे. ह्युगोला अंगठ्याखाली आणायचा, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वातल्या उणिवांचा वापर करून घेणं सोयीचं. ह्युगोचं एक अंगवस्त्र होतं. ह्युगो हा महान साहित्यिक आहे, याचा या बाईला पत्ताच नव्हता. जेव्हा तिला ते कळलं, तेव्हा तिने ह्युगोकडून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रमुख आंद्रे लुई याला आपल्या हस्तकांच्या कार्यक्षमतेचा फार अभिमान होता. आपल्या आठवणींच्या पुस्तकाला त्याने नाव दिलंय-‘ऑल ऑफ पॅरिस, इन द एंड, ईज ऑन फाईल.’ या नावाचं तात्पर्य, संपूर्ण पॅरिस म्हणजेच पर्यायाने फ्रान्समधील खडान्खडा माहिती माझ्या खात्याच्या फायलींमध्ये आहे.

नियती काय अजब खेळ दाखवते पाहा. समाजवादी साहित्यिकांवर राजातर्फे नजर ठेवणार्‍या, या पोलीसप्रमुख आंद्रे लुईला १८९७ साली मुलगा झाला. त्याचं नाव आंद्रे लुई असंच ठेवण्यात आलं. पण, पुढे त्याने स्वतःच ते बदलून ‘लुई आरेगॉन’ असं केलं. हा लुई आरेगॉन १९८२ सालापर्यंत जगला आणि २०व्या शतकातल्या फ्रान्सचा महान कवी म्हणून प्रसिद्धी पावला. पण, तो पक्का साम्यवादी होता. त्याची बायको सोव्हिएत रशियन होती. साम्यवादी चळवळीतूनच त्याचं लग्न जमलं. समाजवादी-साम्यवादी राजवटींनी त्यांच्या देशातल्या इतर राजकीय विचारसरणीच्या लेखकांवर नुसती नजरच ठेवली नाही, तर त्यांची ससेहोलपट केली. कित्येक जण ठार झाले. कित्येक जण सैबेरियातल्या तुरुंगात सडत राहिले. काही थोडे भाग्यवान जीव वाचवून पश्चिम युरोप किंवा अमेरिकेत आश्रय घेऊ शकले.

आपल्याकडे अजून अशी स्थिती निर्माणच झालेली नाही. ज्यांच्या लेखणीचा धाक वाटावा, असा कुणीही नाही. काही वर्षांपूर्वी एकदा लेखकांना जरब बसवण्याचा प्रयत्न झाला. एका प्रख्यात राजकीय नेत्याच्या शब्दांत सांगायचं, तर “त्यांना वाकायला सांगितलं गेलं आणि ते (म्हणजे साहित्यिक) सांगायला लागले.” अशा लोकांवर पाळत-बिळत कशाला कोण ठेवणार?
 
मल्हार कृष्ण गोखले