इस्लाममध्ये मूर्तिपूजा अमान्य असल्याचे सांगत, एकेकाळी अफगाणिस्तानातील बामियानमधील बुद्धाचे भव्य पुतळे तालिबान्यांनी तोफा डागून उद्ध्वस्त केले होते. आज इस्लामी देश असलेल्या, संयुक्त अरब अमिरातीत भव्य हिंदू मंदिराची झालेली उभारणी, ही भारतातील कट्टरवादी मुस्लिमांच्या गालावर मारलेली चपराक आहे. अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणार्या काही मतलबी हिंदू नेत्यांनाही आज तोंड लपवायला जागा उरलेली नाही. पण, झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला कोण जागे करणार?
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी या शहराजवळ पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे झालेले उद्घाटन ही अनेकार्थाने एक ऐतिहासिक घटना. याचे कारण या मंदिराने संयुक्त अरब अमिरातीबद्दल असलेल्या अनेक गैरसमज व पूर्वग्रहांना छेद तर दिलाच; पण मंदिर-मशिदीचे राजकारण करणार्या भारतातील नेत्यांनाही तोंडघशी पाडले. भाजपचे सरकार आमच्या धर्मात हस्तक्षेप करीत आहे, अयोध्येत बाबरी मशीद शहीद झाली आहे, इस्लामला मूर्तिपूजा मान्य नाही, यांसारख्या झापडबंद विचारसरणीचे संकुचित राजकारण करून, आपला राजकीय स्वार्थ साधणार्या नेत्यांना या घटनेने तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते आणि अमिरातीचे प्रमुख शेख झायेद अल-नाह्यान यांच्या उपस्थितीत या मंदिराचे उद्घाटन झाल्याने, या नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. मोदी हे धार्मिक मुद्द्यांचे राजकारण करतात, हा आरोप या मंदिराच्या उद्घाटनाने साफ खोडून टाकला आहे.
नरेंद्र मोदी हे खरोखरीच अपूर्व नशीब घेऊन आले असावेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातच विलक्षण उत्सुकता निर्माण केलेल्या, अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा मान मोदी यांना मिळाला. रामललासमोर नतमस्तक झालेली, त्यांची प्रतिमा अमर झाली. या घटनेनंतर महिनाभराच्या आतच त्यांना आणखी एका भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे भव्य मंदिर चक्क संयुक्त अरब अमिरातीसारख्या इस्लामी देशात उभे राहिले आहे.‘अल कायदा’, ‘तालिबान’, ‘इसिस’, ‘हमास’ यांसारख्या संघटनांनी इस्लामच्या नावावर जो बेबंद आणि नृशंस हिंसाचार जगभर चालविला आहे, त्यामुळे इस्लामची प्रतिमा डागाळली आहे. जगभर इस्लामविरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळे आता सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त यांसारख्या देशांनी आपल्या देशात अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे इस्लामची कट्टरपंथीय धर्म ही ओळख काहीशी बोथट होण्यास मदत झाली. या सुधारणांमुळे त्या देशातील नागरिकांनाही काहीसे स्वातंत्र्य लाभले. अबुधाबीत मंदिर उभे राहणे, हा या सुधारणावादी धोरणाचाच भाग.
एकीकडे हे इस्लामी देश आपल्यात सुधारणा करीत असले, तरी भारतातील काही मतलबी नेते आणि संघटना या मात्र धर्माच्या नावावर आपले राजकारण साधू पाहत आहेत. अनेक इस्लामी देशांमध्ये तोंडी तिहेरी तलाक बेकायदा आहे. पण, भारतात जेव्हा असा तलाक बेकायदा ठरविण्यासाठी कायदा केला, तेव्हा याच कट्टरवादी मुस्लिमांनी हा आमच्या धर्मात हस्तक्षेप असल्याची कोल्हेकुई केली होती. जे इस्लामी देशात घडू शकते, तेच भारतात घडले, तर तो धर्मात हस्तक्षेप कसा होऊ शकतो, यावर या मंडळींकडे उत्तर नव्हते. खरे म्हणजे, मोदी यांच्या धर्मनिरपेक्ष योजना आणि राजकारणामुळे विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी मुद्देच उरलेले नाहीत. राम मंदिराच्या उद्घाटनाचे राजकारण करण्याचा केलेला प्रयत्न आता आपल्याच अंगाशी येणार असल्याची जाणीव यापैकी अनेक नेत्यांना होत आहे.
अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणार्या, हिंदू नेत्यांनाही अबुधाबीतील भव्य मंदिराने पुरते तोंडघशी पाडले आहे. “मशीद पाडून बांधलेल्या, मंदिरात राम राहत नाही, असे आपली आजी मला म्हणाली होती,” असे जाहीरपणे सांगणारे अरविंद केजरीवाल दोन दिवसांपूर्वी आपल्या त्याच आजीसह आणि परिवारासह अयोध्येतील राम मंदिरात दर्शनाला गेले होते. ही ढोंगबाजी जनतेला कळणार नाही, अशी त्यांची समजूत असेल, तर त्यांचा लवकरच भ्रमनिरास होईल. किंबहुना, जे-जे नेते राम मंदिराच्या उद्घाटन समारंभास आमंत्रण मिळूनही अनुपस्थित राहिले होते, त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदार अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाहीत. सोनिया गांधी यांनी संसदेत जाण्यासाठी धरलेला राज्यसभेचा मार्ग ही त्याची खूणगाठ आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, तेव्हा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप आणण्यासाठी, या देशांनी काही तासांची मुदत द्यावी आणि त्या वेळेत आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही मायदेशी पाठवून देऊ, अशी विनंती भारताततर्फे करण्यात आली होती. युद्धासारखी घटना घडत असताना, युद्धमान देशांनी मोदी यांची ही मागणी मान्य करून, काही काळ चक्क युद्धच स्थगित केले! यंदा कतारसारख्या देशाने आपल्या देशाविरोधात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून आठ भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, मोदी यांच्या प्रयत्नांनी आणि भारताच्या राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या प्रभावाने या सर्वांना सोडून देण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच हे भारतीय नौसैनिक मायदेशी परतले. मायदेशी परतल्यावर त्यातील प्रत्येक सैनिकाने मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच आपण जीवंत परत आल्याचे आवर्जून सांगितले. पुलवामा स्फोटानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी उडालेल्या संघर्षात भारताचा लढाऊ वैमानिक विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तान्यांच्या हाती लागला. पण, भारताने त्याला तत्काळ सोडून द्यावे; अन्यथा भीषण परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम दिल्यावर, केवळ दोन दिवसांत अभिनंदनला भारताच्या सरहद्दीवर सहीसलामत पोहोचविण्यात आले. मोदी यांचा आंतरराष्ट्रीय दबदबा सिद्ध करण्यासाठी, ही उदाहरणेही पुरेशी आहेत.
मोदी हे धर्माचे राजकारण करतात, राम मंदिराच्या उभारणीचा राजकीय लाभ घेतात, यांसारखी टीका करणार्यांची तोंडे संयुक्त अरब अमिरातीने बंद केली आहेत. त्या देशाचे शेख झायेद अल-नाह्यान यांनीच या मंदिरासाठी तब्बल २७ एकर जागा दिली, हे मंदिर सर्व हिंदू धार्मिक चिन्हांसह उभे केले आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्यातही ते सहभागी झाले. यामुळे मोदी यांच्याविरोधातील धार्मिक राजकारणाचा मुद्दाच मुळापासूनच उखडला गेला आहे. मोदी यांनी शेखांच्या प्रदेशात ‘सनातन’ धर्माची शेखी मिरविली आहे!