‘हिंदूफोबिया’ आणि सांप्रदायिक गुंडगिरीचे वास्तव

    15-Feb-2024
Total Views |
Hinduphobia
 
काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या ललित कला केंद्रात रामायण विडंबन नाट्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठे ही नेमकी शिक्षणाचे माहेरघर की विद्रोहाचे अड्डे, असा प्रश्न उपस्थित झाला. वर्षभरापूर्वी ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या घटनेने विद्यापीठ प्रशासनाचा ‘हिंदूफोबिया’ असाच चव्हाट्यावर आला होता. तेव्हा, या घटनेतील तथ्य, तपास, कारवाई आणि न्यायाची प्रतीक्षा यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर डाव्या विचारसरणीचा पगडा असून, नव्या विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढून, त्यांच्यापर्यंत चुकीचा इतिहास, अयोग्य वर्तमान पोहोचविण्याचे काम आजही बिनबोभाटपणे करण्यात येते. विद्यार्थ्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यासाठी, अगदी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे पापदेखील या संघटनांकडून होताना दिसते. एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली किंवा तो संकटात असेल, तर त्याचे कारण शोधण्याऐवजी, त्या विद्यार्थ्याची अगोदर जात शोधली जाते व त्याला जातीय रंग देत, राजकारण खेळले जाते. मुळात त्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा ‘इव्हेंट’ करणे आणि त्या माध्यमातून आपल्या राजकीय पोळ्या शेकणे, हाच यामागचा मुख्य उद्देश. अगदी देशातील प्रतिष्ठित व अग्रमानांकित अशा ‘आयआयटी मुंबई’मध्ये देखील अशी घटना घडली असून, या माध्यमातून ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या, या संस्थेतील वातावरण नासविण्याचे काम काही संघटनांनी एकत्रित येत केले. संबंधित विद्यार्थ्याच्या मृत्यूला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून, एका मुस्लीम विद्यार्थ्याच्या भीतीपोटी त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मात्र, तरीदेखील अगोदर चुकीच्या बातम्या व माहिती पसरवून विद्यार्थ्यांना भडकावत शंका-कुशंका निर्माण करणार्‍या या संघटना आत मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत. हीच त्यांची ‘हिंदूफोबिया’ व सांप्रदायिक गुंडगिरीची कहाणी म्हणता येईल.

दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘आयआयटी मुंबई’ येथील हिंदू अनुसूचित जातीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी (१९ वर्षे) याने आत्महत्या केली. ’आंबेडकर-पेरियार-फुले स्टडी सर्कल’ नावाच्या विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या अनधिकृत गटाने या दुर्दैवी घटनेला ‘जातिभेद’ असा रंग देत, राजकारण करण्यास सुरुवात केली व त्या आत्महत्येला ‘संस्थात्मक हत्या’ असेही संबोधले. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही अजूनही दर्शन सोळंकीच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि सत्य समोर आल्यानंतर या ‘हिंदूफोबिक’ डाव्यांचे मौन भयावह आहे. या लेखाच्या माध्यमातून या घटनेतील तथ्य, तपास, कायदेशीर कार्यवाही व जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेल्या वादावर प्रकाश टाकला आहे.दि. १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी काही वृत्तवाहिन्यांनी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येची बातमी दिली. तेव्हा या घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ‘आयआयटी मुंबई’मध्ये ‘दलित छात्र की आत्महत्या से मौत, एपीपीएससी का दावा, यह हैं संस्थागत हत्या’ असे वृत्त प्रसारित केल्यानंतर, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, ‘आयआयटी’चे संचालक व इतर तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीच्या माध्यमातून चौकशी सुरू केली.

प्राथमिक तपासातील मुद्दे

दि. १३ फेब्रुवारी, २०२३ रोजी दर्शनच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात सुरुवातीला या घटनेबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार दिसून आली नाही. मात्र, दि. १६ फेब्रुवारी रोजी पवई पोलीस ठाण्याच्या तपास अधिकार्‍याने दर्शनच्या मूळ गावी अहमदाबादला भेट दिली, तेव्हा घटनेला एक वळण लागले. दर्शन सोळंकी याच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत, सखोल चौकशीची मागणी केली आहे, असे वृत्त समोर आले. महाराष्ट्र राज्य सरकारने दि. २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले. ‘एसआयटी’ने दि. ३ मार्च, २०२३ रोजी दर्शनच्या खोलीची सविस्तर तपासणी केली असता, परीक्षेच्या पेपरच्या मागील बाजूस ‘अरमानने मला मारले आहे,’ अशी चिठ्ठी सापडली. या शोधामुळे तपासात महत्त्वाचे वळण लागले. दि. ६ एप्रिल, २०२३ रोजी हस्तलेखन तज्ज्ञाच्या अहवालाने ‘एसआयटी’कडे सादर केलेल्या, सर्व दस्तऐवजांच्या सामायिक लेखकत्वाची पुष्टी केली की, ती चिठ्ठी दर्शन सोळंकी यानेच लिहिली होती. तसेच दर्शनची आई तरलिका रमेशभाई सोलंकी यांनीदेखील त्याचे हस्ताक्षर ओळखले व ’दर्शनने लिखा होगा’ असे म्हटले. त्यानंतर पवई पोलीस स्थानकामध्ये त्याच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरूद्ध भादंविच्या ‘कलम ३०६’ आणि एससी-एसटी कायद्याच्या ‘३ (२) (५)’ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

अटक आणि कायदेशीर कार्यवाही
 
दर्शनाच्या चिठ्ठीच्या आधारे ‘आयआयटी’तील आरोपी विद्यार्थी अरमान इकबाल खत्री (१९ वर्ष) याला दि. ९ एप्रिल, २०२३ रोजी अटक करण्यात आली आणि त्याला दि. १५ एप्रिल, २०२३ पर्यंत दोनदा पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दि. ५ मे, २०२३ रोजी त्याला न्यायालयातून जामीन मिळाला व तेव्हापासून तो बाहेरच आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर खटला सुरूच राहिला. दि. १ जून, २०२३ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान ‘एससी-एसटी’ कायद्यांतर्गत पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यानंतर आयोगाने तत्काळ नुकसानभरपाईची शिफारस केली, आयोगातील खटला त्याच्या अधीनस्थ स्वरुपामुळे बंद करण्यात आला.
 
‘एपीपीएससी’कडून जाणूनबुजून जाती-भेदांचे आरोप

‘एपीपीएससी’ ही डाव्या विचारसरणीची संघटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली आणि जाती-भेदभाव आणि संस्थागत हत्या, या मुद्द्यांना अधोरेखित करून तथ्यहीन व खोटी विषारी कथा पसरवली. दि. १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी दर्शन सोळंकीच्या स्मृतिप्रीत्यर्थ काढण्यात आलेल्या कॅण्डल मार्चला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने, संघटनेच्या सदस्याने जातियवादी टिप्पणी केली व त्याच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. ‘एपीपीएससी’ गट, सामाजिक विज्ञान विभाग आणि ’अशांक देसाई सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’मधील संलग्न प्राध्यापक ‘आयआयटी मुंबई’चे शैक्षणिक वातावरण जाणूनबुजून बिघडवत आहेत, असे अनेक विद्यार्थ्यांनी कबूल केले आहे. हे विद्यार्थी व शिक्षक अनेकदा राजकीय कार्यक्रम आयोजित करतात आणि कट्टरपंथी तसेच विखारी वक्तव्य करणार्‍या वक्त्यांना आमंत्रित करतात.

दर्शनच्या आत्महत्येच्या तपासात जातीय भेदभावाच्या आरोपांच्या दिशेनेदेखील चौकशी करण्यात आली; परंतु साक्षीदार, कुटुंबातील सदस्य आणि विविध विद्यार्थ्यांच्या वक्तव्यावरून असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट झाले. नोव्हेंबर २०२२ मध्ये उदयसिंग मीणा यांच्या वक्तव्यानंतर दर्शन सोळंकी याच्या कुटुंबीयांनी आरोप करण्यास सुरुवात केली. तपास जसजसा पुढे जात होता, तसतसे पुरावे समोर आले की, दर्शनने आरोपी अरमान इकबाल खत्रीशी बोलताना, मुस्लीम धर्माबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. प्रत्युत्तरात अरमानने दर्शन सोळंकी याला पेपर कटरने धमकावले. यामुळे दर्शन दहशतीत आला होता व भीतीने त्याची गाळण उडाली होती. त्याची प्रकृतीदेखील खराब झाली होती. अरमान आपला खून करेल, अशी भीती त्याच्या मनात बसली होती. ‘अरमानचे खूप संपर्क असून, तो मला मारून टाकेल, तो मला सोडणार नाही. त्याच्या गावातील अनेक मुस्लीम लोक दंगे करतात’ असे दर्शन बोलल्याचे साक्षीदारांनी चौकशीदरम्यान सांगितले. व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि पेपर कटर जप्त केल्यावर या साक्षींचे समर्थन करणारे महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले.दि. १० फेब्रुवारी रोजी दर्शनने अरमानला व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज पाठविला होता. त्यात - ‘हाय अरमान, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला माफ कर, यानंतर असे काही होणार नाही. मी मुंबई सोडून घरी चाललो आहे,’ असे त्याने त्यात लिहिले होते.

न्यायालयाचे निरीक्षण

दि. ६ मे २०२३ रोजी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले की, रेकॉर्डवरील कागदपत्रे तपासल्यानंतर तपास अधिकार्‍यांनी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याचे उघड झाले. दि. ९ फेब्रुवारी, २०२३ रोजी आरोपीने दर्शनला मुस्लीम धर्माबाबत आक्षेपार्ह बोलल्यामुळे, पेपर कटरने मारण्याची धमकी दिली होती व मृत व्यक्तीने वारंवार आरोपीची माफीही मागितल्याचे साक्षीपुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.

निष्कर्ष

दर्शनाच्या फोनचे न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) विश्लेषण, कुटुंबातील सदस्यांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी आणि दर्शनचा संस्थेशी झालेला संवाद याच्या सर्वसमावेशक तपासातून हे स्पष्ट होते की, यात जातीय भेदभावाची कोणतीही घटना नव्हती. ‘एपीपीएससी’ने, ‘आयआयटी’मध्ये तथ्यहीन व खोट्या जातीय मुद्द्याला आणून प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर कारवाई सुरू असतादेखील त्यांनी खोटी माहिती पसरवली. ‘आयआयटी बॉम्बे’ संस्थेने अशा गटांना खुला मार्ग व मोकळीक दिली आहे. अभ्यासात हुशार असलेल्या, दर्शन सोळंकीच्या मृत्यूची माहिती समोर आल्यावर, हिंदुत्वाचा द्वेष करणार्‍यांनी जातिभेदाच्या खोट्या कथा मांडल्या आणि वातावरण बिघडवले. ‘आयआयटी मुंबई’त दर्शन सोळंकीच्या दुःखदआत्महत्येने हिंदूफोबिया, आक्षेपार्ह विधाने, धमक्या आणि परिणामी भीती यांमुळे तरूण विद्यार्थ्याला स्वतःचाजीव देण्यास प्रवृत्त करणार्‍या घटकांचा गुंतागुंतीचा संवाद उघड केला. अनुसूचित जाती आयोगाचा तपास, कायदेशीर कार्यवाही आणि शिफारशी अशा घटनांच्या सभोवतालच्या परिस्थितीची सूक्ष्म समज आणि शैक्षणिक संस्थांमधील मानसिक आरोग्य व त्याच्याशी निगडित आव्हानांना तोंड देण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.

आरोपी अरमान इकबाल खत्रीवर शिस्तभंगाची कुठलीही कारवाई झालेली नाही. पेपर कटरने सहकारी विद्यार्थ्याला धमकावणार्‍या, विद्यार्थ्याला निलंबित करण्याबाबत ‘आयआयटी’ प्रशासनाने पाऊल उचलले नसून, या प्रकारच्या कृतीमुळे इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शनच्या दुःखद आत्महत्येनंतर ‘आयआयटी मुंबई’मध्ये हिंदूफोबिया, फुटीरतावादी विचार, धमक्या देणारी प्रवृत्ती, रक्तरंजित संवादावरील भर, ‘आयआयटी’तील कट्टरपंथीयांना मिळणारे संरक्षण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, माओवादी संघटनांचा कॅम्पसमधील वावर, या बाबी समोर आल्या. दि. १२ फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस म्हणून ‘आयआयटी मुंबई’च्या इतिहासात स्मरणात राहील. ‘आयआयटी’ प्रशासनाने जाणूनबुजून मौन पाळले आणि कट्टरपंथी डाव्या व माओवाद्यांच्या धाकाला ते शरण गेले. आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असून हिंदूफोबिक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे मौन भयावह आहे. त्यांनी एका दुर्दैवी घटनेला राजकीय प्रचाराच्या घृणास्पद कृत्यात कसे जगासमोर आणले, हे यातून स्पष्ट होते. असली विचारधारा व लोक आपले राष्ट्र, समाज आणि शैक्षणिक संस्थांना वाळवीप्रमाणे आतून पोखरत आहेत. अशा प्रकारच्या घटकांनी आपला समाज तोडण्यापूर्वी, आपण त्यांना योग्य धडा शिकवत प्रभावहीन केले पाहिजे.


नितीन मोरे
(लेखक जयभिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)