ठाणे : कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला रहिवाश्यांनी अंगावर रॉकेल ओतुन वेठीस धरल्याचा प्रकार ताजा असतानाच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांना दिव्यात फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनधिकृत बाबींवर कारवाई करणारे पालिकेचे अधिकारी पुन्हा एकदा टार्गेट होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिवा रेल्वे स्थानक परिसर, मुंब्रादेवी कॉलनी भागात अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याने दिवा प्रभाग समितीच्या पथकाकडून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांच्या पथकाने फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली. यावेळी मुंब्रादेवी कॉलनी भागात फेरीवाल्यांनी हातगाड्या एका गाळ्यात नेत शटर बंद केले. त्यानंतर फेरीवाल्यांनी पालिका पथकाशी हुज्जत घालण्यास सुरवात केली.
हा प्रकार हातघाईवर आल्याने या फेरीवाल्यांनी थेट सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांना धक्काबुक्की केली. हे पाहून पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी गुडधे यांचा तात्काळ बचाव केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पालिकेच्या पथकाची बाचाबाची करणाऱ्या फेरीवाल्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.