खानिवडे : वसई तालुक्यात मंगळवार पासून सुरू झालेल्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. वसई-विरार शहरात भाद्रपद महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यंदा वसईत सार्वजनिक आणि घरगुती मिळून १,७५१ माघी गणरायांचे आगमन झाले होते .त्यातील दीड दिवसांच्या घरगुती गणरायांचे बुधवारी भाव भक्तीने विसर्जन करण्यात आले.
तीन वर्षांपूर्वी कोरोनाकाळाचा परिणाम भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवावर झाला होता. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक मंडळांनी आपले उत्सव रद्द केले होते, तर काही ठिकाणी गणेशमूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे राणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता .मात्र आता माघी गणेशोत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागल्याने नवरात्री नंतर कारागिरांची गणेश शाळांमधून लगबग वाढली होती .यंदा तालुक्यात ६६ सार्वजनिक तर १,६५१ घरगुती गणरायांचे आगमन झाले होते .त्यातील आज दीड दिवसांच्या गणरायांच्या विसर्जनाला आबालवृद्ध सजून धजून उपस्थित होते.