मुंबई : वरळीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रस्तावित असलेल्या अत्याधुनिक, बहुमजली व रोबो ऍण्ड शटल या तंत्रज्ञानासह उभारण्यात येणाऱया वाहनतळाच्या किंमतीमध्ये फुगवून वाढ करण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांमधून या वाहनतळाच्या निविदांबाबत करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीशी विसंगत आहेत.
मुंबई महानगरातील वाहनतळांची (पार्किंग) समस्या सोडविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याअंतर्गत वरळी येथे महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी संकूल (इंजिनीअरिंग हब) जवळ विद्युत यांत्रिकी पद्धतीने संचालित होवू शकणारे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हे वाहनतळ आचार्य अत्रे चौका लगत राहणार आहे. या परिसरात भूमिगत मेट्रो स्थानक तसेच महानगरपालिकेचे अभियांत्रिकी संकूल (इंजिनीअरिंग हब) यासह अनेक खासगी व्यावसायिक इमारती आहेत. स्वाभाविकच वाहनतळाची गरज लक्षात घेता सदर ठिकाणाची मुंबई वाहनतळ प्राधिकरण यांनी शिफारस केली आहे.
या बहुमजली स्वयंचलित तसेच रोबो ऍण्ड शटल या तंत्रज्ञानासह उभारण्यात येणाऱया वाहनतळासाठी २१६ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे. या वाहनतळाचा खर्च १६५ कोटी रुपयांवरुन वाढवून तो २१६ कोटी रुपये इतका फुगवल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र तो पूर्णतः तथ्यहीन आहे. या वाहनतळाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये सुमारे ४,२०० चौरस मीटर इतकी वाढ झाली आहे. स्वाभाविकच त्यासाठी पाया क्षेत्रामध्ये देखील सुधारणा झाली आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या सद्यस्थितीतील मानकानुसार या वाहनतळ इमारतीमध्ये अग्नीशमन यंत्रणा उभारली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक वाहनाच्या जागी उष्णता शोधक (हिट डिटेक्टर) आणि विमोचन शीर्ष (डाऊझर हेड) बसवण्यात येईल. तसेच प्रत्येक मजल्यावर मोठ्या आकाराच्या वाहिन्या, २० हजार लीटर दाबाचे व्हेसल, पंप इत्यादी लावण्यात येईल. त्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा व्यवस्था, झडपा, केबलिंग पॅनल, नियंत्रित केबलिंग, धूर दिसताच तात्काळ इशारा देणारी यंत्रणा या सर्वांचा समावेश करणारी संयंत्रे आदी या वाहनतळामध्ये उभारली जाणार आहेत.
तसेच, वाहनतळामध्ये उपयोगात येणाऱया रोबो ऍण्ड शटलच्या संख्येमध्ये पूर्वीच्या चार वरुन आता आठ इतकी वाढ करण्यात आली आहे. स्वाभाविकच त्याच्या अनुषांगिक यंत्रणेमध्ये देखील वाढ झाली आहे. वाहनतळ बांधकामाचा पूर्वीचा कालावधी पावसाळा वगळून ३० महिन्यांचा होता. म्हणजेच पावसाळा धरुन तो ४६ महिन्यांचा होता.
तर, नवीन निविदेचा कालावधी पावसाळ्यासह एकूण ४८ महिने आहे. म्हणजेच बांधकाम कालावधीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. जरी ४८ महिन्यांचा कालावधी असला तरी देखील १० टक्के वाढीव खर्चाच्या मर्यादेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ती पूर्वीइतकीच आहे.
मुंबईतील वाहनांची वाढती संख्या पाहता, वाहनतळांची गरज लक्षात घेवून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यथोचित निर्णय घेतले आहेत, असे देखील महानगरपालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.