हल्दवानी हिंसाचार! मदरशाच्या जागी बांधण्यात येणार पोलिस स्टेशन

    13-Feb-2024
Total Views |
 haldwani
 
डेहराडून : बेकायदेशीर मशीद-मदरसा पाडल्यानंतर हिंसाचार भडकलेल्या हल्दवानी येथील बनभूलपूर पोलीस स्टेशन परिसरात आता कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे. ज्या ठिकाणचा मशीद-मदरसा पाडण्यात आला. त्या जागेवर आता पोलीस ठाणे बांधण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री धामी यांनी केली आहे. अशा स्थितीत पुन्हा त्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याची संधी मिळणार नाही.
 
खुद्द उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “आता हल्दवानीच्या बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यात आले त्या ठिकाणी पोलिस स्टेशन बांधले जाईल. देवभूमीच्या शांततेशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, उत्तराखंडमध्ये अशा बदमाशांना जागा नाही, असा आमच्या सरकारचा हा स्पष्ट संदेश आहे."
 
दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी हल्दवानीमधील बेकायदेशीर मशीद हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कट्टरपंथी जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. आधी या जमावाने छतावरून पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर हे लोक पेट्रोल बॉम्ब वगैरे घेऊन रस्त्यावर आले. दंगल करणाऱ्या जमावाकडे शस्त्रेही होती. त्यांनी पोलिसांना ठार मारण्याचा आणि जाळण्याचा प्रयत्न केला होता.
 
याशिवाय पोलिस ठाण्यावरही हल्ला करून लुटमार केली. दंगलखोर जमावाला नियंत्रणात आणल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत त्यांनी याप्रकरणी ३० जणांना अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणामध्ये ३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींनाही सीसीटीव्ही आदींच्या माध्यमातून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.