मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सीमावाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालून समन्वयातून मार्ग काढतील आणि मराठी भाषिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतील, असा विश्वास व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरेकर म्हणाले की, विरोधकांना सर्वप्रथम लाज वाटली पाहिजे. ज्या विरोधी पक्षात काँग्रेस आहे त्या काँग्रेसचे सरकार तिथे आहे आणि ते सरकार अत्याचार करतेय. आपले सरकार अत्याचार करतेय आणि पुन्हा नाकाने कांदे सोलून बोलायचे ही त्यांची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार आहे म्हणूनच नाही तर या राज्यात कुठलेही सरकार असले तरी सीमावासियांच्या बाजूनेच महाराष्ट्राचे सरकार राहिलेले आहे. आमचीही भुमिका तेथील मराठी भाषिकांच्या बाजूने आहे. मुख्यमंत्री फडणवीस जातीने लक्ष घालून समन्वयातून योग्य मार्ग काढतील. मराठी भाषिकांना त्रास होणार नाही याची निश्चितच दक्षता घेतील.
तसेच विरोधक भरकटलेले आहेत. प्रश्न कोणते, कोणत्या प्रश्नावर लढले पाहिजे यापेक्षा कुठलेही प्रश्न घेऊन जनतेच्या मनात महायुतीच्या बाबत प्रतिमा मलिन करण्यासारखे काही करता येतेय का? असा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा सुरू आहे. त्यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारावा, जनतेच्या प्रश्नासाठी पुढे यावे. अन्यथा उरलेसुरलेले अस्तित्व जनता संपवल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित होते. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, लोकांच्या कामासाठी जी व्यासपीठे दिलीत ती वापरायची नाहीत. ते निवडणुका कशासाठी लढवतात आणि पद कशासाठी घेतात हा प्रश्न आहे. जे राज्याचे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येऊ शकले नाहीत, घरात बसून कारभार केला त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारची अपेक्षा काय करणार. विधिमंडळाच्या सभागृहात येऊन सहभागी होणे ही आपली लोकशाहीत संविधानिक जबाबदारी आहे. मूळ जबाबदारीचेच भान या लोकांना राहिलेले नाही, असा टोला दरेकरांनी ठाकरे गटाला लगावला.
विरोधकांकडून ईव्हीएमबाबत होत असलेल्या आरोपांवर दरेकर म्हणाले की, ईव्हीएमबाबत आम्ही अनेकदा भुमिका मांडलीय. लोकसभेच्या निवडणुका ईव्हीएमद्वारेच घेतल्या गेल्या. सुप्रिया सुळे ईव्हीएमद्वारेच निवडून आल्या. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस खासदार ईव्हीएमद्वारेच निवडून आले. मविआचे आमदारही ईव्हीएमद्वारेच निवडून आलेत. या निवडून आलेल्या आमदारांना विश्वास नाही का की ते निवडून येऊच शकत नव्हते. ईव्हीएमने कसे काय त्यांना निवडून आणले. त्यांच्याच विजयावर ते स्वतःच शंका उपस्थित करताहेत. आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. परंतु लोकांना ही नौटंकी नीट समजते.
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार या चर्चेवर बोलताना दरेकर म्हणाले की, लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारची भूमिकाच आली नाही तर वेगळी भुमिका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणुकीवेळी महायुतीने जाहीर केलेले २१०० रूपये देण्यासाठी सरकार बांधील आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकार निश्चितच जी घोषणा आमच्या वचननाम्यात केलीय ती पूर्ण करणार.
राऊतांना ‘सोंगी भूषण’ पुरस्कार द्या
संजय राऊत यांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांना सोंगी भूषण पुरस्कार द्यायला हवा. राजकारणातील सोंगाड्या संजय राऊत आहेत. त्यामुळे त्यांना सोंगी भूषण द्यायला हवा अशी शिफारस सरकारला करावी लागेल.