चला हिवाळ्यातील जागतिक स्पर्धांना...

    08-Dec-2024
Total Views |
 
winter world championships
 
देशात पसरलेली उष्णतेची लाट जाऊन आल्हाददायक अशी गुलाबी थंडी पसरली आहे. याच थंडीत देशभरात मॅरेथॉनचे आयोजन विविध ठिकाणी केले जात आहे. तसेच देशातील अन्य खेळातील क्रीडापटू देखील त्यांच्या विजयाने भारतीयांच्या थंडीचा आनंद द्विगुणित करत आहेत. क्रीडाक्षेत्रातील अशा विविध आनंददायी घटनांचा घेतलेला आढावा...
 
वाळ्याच्या गुलाबी थंडीत उशिरा जागायची आणि सकाळी उशिरा उठायची सवय बदलून, ज्या व्यक्ती ’लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य धनसंपदा लाभे’ या उक्तीचा अवलंब करतात, त्यांना त्यामुळे आरोग्य, धनसंपदा, ज्ञान यांचा लाभ होतो. वेळेवर पार ऐकत-वाचत आलेले हे सुविचार अमलात जे आणतात, ते भाग्यवान ठरतात. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आपल्याला कळत असतात. पण, ते वळतात किती जणांना? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नोकरी व्यवसायाच्या कारणामुळे, दिवस पाळी, रात्र पाळी करणार्‍या लोकांना या झोपायच्या वेळा वेळच्यावेळी पाळणे अवघड असते. ते लोक वागळता अन्य लोकांनी या वेळा पाळणे जरुरीचे आहे, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत असतात.
 
सकाळी लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते.
लवकर उठणार्‍यांच्या चिंता, नैराश्य कमी होते. लवकर उठणार्‍यांना दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशाचा फायदा घेता येतो. लवकर उठणार्‍यांना आपल्या परिसरातल्या कमी रहदारीचा फायदा मिळतो. मॉर्निंग वॉकला जाणारे आज बरेचजण आढळून येत आहेत, हे चांगलेच आहे. त्याच जोडीने आज अनेक समाजिक संस्था मॅरेथॉनचे आयोजन करत, समाजाला ‘लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य धनसंपदा लाभे’ याचा फायदा मिळवून देत आहेत. जगात अनेक ठिकाणी प्रामुख्याने हिवाळ्यात, मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. समाजातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती त्यात सहभागी होत असल्याने, त्याला एक वलय निर्माण होत असते. उन्हाचा त्रास, घाम येणं असे या काळात होत नाही.
 
भारताच्या राज्यातल्या राजधान्यांमध्ये तसेच मोठ्या शहरात देखील मॅरेथॉन आयोजित केल्या जातात. जानेवारीत मुंबईत प्रतिष्ठित ’टाटा मुंबई मॅरेथॉन’ पार पडते. यामध्ये असंख्य नागरिक उत्साहाने सहभागी होतात. माहीम ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा मार्गावर पहाटेपासून आयोजित होणार्‍या त्या स्पर्धेत, हजारो स्पर्धक सहभागी होत असतात. मुंबई मॅरेथॉन ही क्रीडा स्पर्धेपेक्षाही मुंबईकरांना एकत्र आणणारी चळवळ आहे. ‘टाटा’सारखा उद्योगसमूह त्यासाठी पुढाकार घेत असतो. ही स्पर्धा महाराष्ट्राच्या राजधानीत होत असते. तशीच एक मॅरेथॉन बिहारच्या राजधानीत म्हणजेच पाटण्यात होत असते. राजधान्यांबरोबरच पुण्यासारख्या शहरातदेखील, मॅरेथॉन होत असतात. भारताबरोबरच जगातील अनेकविध राष्ट्रातील धावपटू पुण्यातील स्पर्धेत आवर्जून धावायलाच नव्हे, तर बक्षिसे पटकावून नेण्यासाठी येऊन जात असतात.
 
‘पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्ट’सारखे कार्यालयही पुण्यात उघण्यात आलेले पाहिले, तर मॅरेथॉनचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला दिसून येईल.
 
जागतिक स्तरावर असलेल्या ‘इंटरनॅशनल मॅरेथॉन (एम्स) समिती’ने, तिच्या वार्षिक नियोजनात पुण्यातील या स्पर्धेचा कायमस्वरुपी समावेश केला आहे आणि भारतातील सर्वात जुनी व महत्त्वाची मॅरेथॉन होण्याचा मान मिळवला आहे. पाटण्यात बॅडमिंटनपटू नेहा सेहेवालने उद्घाटन केले, तर पुण्यात अनेक नामवंत याला उपस्थित राहतात. ‘पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्ट’तर्फे दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या रविवारी, शर्यत आयोजित केली जाते. त्यानुसार 38वी स्पर्धा दि. 1 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता सुरू होऊन, सकाळी सकाळी पार पडली. 1983 पासून कोविडच्या कालावधीसारखे एक-दोन अपवाद वगळता, ही शर्यत आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत 42.195 किमीची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पहाटे 3 वाजता, त्यानंतर पहाटे 3.30 वाजता अर्ध मॅरेथॉन 21.0975 किमी, सकाळी 6.30 वाजता दहा किमी, तसेच 7 वाजता पाच किमीची शर्यत (पुरुष आणि महिला गट) आणि सकाळी 7.15 वा. तीन किमीची व्हीलचेअर अशा क्रमाने शर्यत सोडण्यात आल्या होत्या.
 
स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंची सुरक्षा, त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वैद्यकीय व्यवस्था, 150 डॉक्टर आणि 250 नर्सिंग, फिजिओ स्टाफ, रुग्णवाहिका, 15 बेडचे तात्पुरते रुग्णालय अशी व्यवस्था केली गेली होती. संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमीवर पिण्याचे पाणी, प्रत्येक 2.5 किमीवर फिडिंग बूथ, एनर्जी ड्रिंक, फळे अशी सुविधा देण्यात आली होती. स्पर्धा संपेपर्यंत संपूर्ण मार्गावर सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्यात आली असली, तरी काही वेळेस वाहतुकीची अडचण येतच असते. या स्पर्धेत सर्व गटात मिळून, संपूर्ण देशातील अंदाजे दहा हजार खेळाडू सहभागी होत असतात. शारीरिक तंदुरुस्ती आणि शरीरस्वास्थ राखण्यासाठी एरवी सकाळी व्यायाम म्हणून धावायला जाणारे पुणेकर, रविवारी भल्या पहाटे धावले. मुख्य शर्यतीत परदेशी धावपटूंचे वर्चस्व राहणे अपेक्षित होते, त्यानुसार केनिया आणि इथिओपिया येथील एकूण 71 धावपटू सहभागी झाले होते. या वेळीदेखील भारतीय गटात लष्कराच्या क्रीडा केंद्राचे धावपटू धावले होते.
 
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा, बुद्धिबळाच्या जागतिक आव्हानवीरांच्या स्पर्धा, हॉकी असे विविध क्रीडाप्रकार आता याच महिन्यात होताना अनेकांनी पहिले. अशा मॅरेथॉनमध्ये अनेकांचे पळून झाले, तर त्याच दरम्यान आता सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकून त्या स्पर्धेचेविजेतेपद भारताला मिळवून दिल्यानंतर, पी. व्ही. सिंधूला भारतीयांना अजून एक आनंदाची बातमी द्यायची होती. सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा संपताक्षणीच, सिंधूच्या वडिलांनी भारतीय क्रीडाप्रेमींना एक आनंदाचे वृत्त दिले आहे. दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती, भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू दि. 22 डिसेंबर रोजी उदयपूर येथे विवाहबद्ध होणार आहे. त्याचे रिसेप्शन दि. 24 डिसेंबर रोजी, हैदराबाद येथे होणार आहे. 2016 मध्ये ऑलिम्पिक रौप्य आणि 2021 मध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर असलेल्या, पी. व्ही. सिंधूने गेल्या आठवड्यात सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल येथे बीड्बल्युएफ वर्ल्ड टूर विजेतेपदासाठी, दोन वर्षांची प्रतीक्षा संपवली. ही स्पर्धा 2024 मधील वर्ल्ड टूरमधील अंतिम स्पर्धा होती. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी एकमेव भारतीय महिला होण्याचा मान सिंधूच्या नावावर आहे. एकंदरीत सिंधूने पाच वर्ल्ड टूर विजेतेपदे जिंकली आहे. 29 वर्षीय शटलरने, 2018 मध्ये इथे वर्ल्ड टूर फायनल्स आणि 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. हैदराबादस्थित आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई यांच्याशी ती लग्न करेल. सध्या कार्यकारी संचालक म्हणून प्रोसिडेक्स टेक्नॉलॉजी या संस्थेत ते काम करत आहे. पी. व्ही. सिंधूचे वडील पी. व्ही. रमणा यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होती. परंतु, एक महिन्यापूर्वीच लग्नाची बोलणी झाली. त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, सिंधूचे जानेवारीपासून बॅडमिंटनचे खूप व्यस्त वेळापत्रक असेल, त्यामुळे डिसेंबर लग्नासाठी योग्य महिना आहे. पारंपरिक पद्धतीने चालणारा त्यांचा विवाह सोहळा दि. 20 डिसेंबरपासून सुरू होईल. 2025चा बीड्बल्युएफ वर्ल्ड टूर हंगाम जानेवारीमध्ये मलेशिया ओपन सुपर 1,000 मध्ये सुरू होणार आहे. सिंधू वेळेवर दौर्‍यावर परतेल अशी अपेक्षा आहे. असे खेळाला प्राधान्य तिने दिले आहे. सिंधूला आपली तब्येत सांभाळत आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यायचा आहे. ते झाल्यावर मग वैयक्तिक गुलाबी सोहळे अनुभवायला सर्व जीवन पडले आहे, असे तिचे विचार आहेत. या पी. व्ही.सिंधूच्या बातमीपाठोपाठ आपल्या कुमार हॉकीपटूंनी पाकिस्तानला पराभूत करत आनंदाची बातमी दिली आहे.
 
ओमानमधील मस्कत येथे झालेल्या पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत, वर्चस्वपूर्ण कामगिरी केल्यानंतर भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघ परतला असून, पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले आहे. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना केला आणि त्यांना 5-3 असे पराभूत करून, पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदाची मालिका अखंडित ठेवली. या विजयासह भारताने त्यांच्या पाचव्या पुरुष ज्युनियर आशिया कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि आशियातील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून त्यांचे स्थान मजबूत केले.
 
जपान, कोरिया, थायलंड आणि चायनीज तैपेईसह भारताला ‘अ’ गटात स्थान देण्यात आले होते. त्यांनी थायलंड, चायनीज तैपेई आणि कोरियावर विजय मिळवून, गटसाखळी सामन्यात वर्चस्व राखले.
 
ज्युनियर आशिया चषक स्पर्धेतील आमचा प्रवास विलक्षण होता. प्रत्येक सामन्यात स्वतःची आव्हाने होती. परंतु, आमच्या संघाचा दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम यामुळेच यश मिळाले. आमच्या फॉरवर्ड्सने उत्तम कामगिरी केली, सातत्याने बचाव मोडून काढत आणि गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, हे विजेतेपद पटकावले. ही पाचवी वेळ आमच्या उत्कृष्टतेचा आणि आमच्या अतुलनीय चाहत्यांच्या पाठिंब्याचा पुरावा आहे अशी कॅप्टन अमीर अलीने प्रतिक्रिया दिली. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. तथापि, अराईजीतच्या चार गोलच्या चमकदार कामगिरीमुळे, भारताने अंतिम रेषा ओलांडली आणि सुवर्णपदक मिळवले. या शेवटच्या आऊटिंगमध्येदेखील अराईजीतने दहा गोलांसह दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. गेल्या महिन्यात सुलतान ऑफ जोहोर चषक स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनानंतर, हे जेतेपद राखले गेले जेथे मुख्य प्रशिक्षक पीआर श्रीजेश यांनी त्यांच्या संघाला त्यांच्या पहिल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले. भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघ आता पुढील वर्षी चेन्नई येथे होणार्‍या, एफआयएच कनिष्ठ हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक 2025 वर आपले लक्ष केंद्रित करेल.
 
प्रत्येक खेळाडूने या उल्लेखनीय विजयात योगदान दिले आणि आमचा सामूहिक प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी ठरला आहे. विशेषतः जपान आणि पाकिस्तान विरुद्धच्या खडतर सामन्यांनी, आमच्या कौशल्याची चाचणी घेतली. परंतु, आम्ही एकाग्र राहून आमची योजना अमलात आणली. हा खरोखरच सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्यापैकी आणि आम्ही आता मोठ्या अपेक्षेने चेन्नईतील ज्युनियर वर्ल्ड चषकाची वाट पाहात आहोत, असे हे युवक सांगत आहेत.
 
या वर्षाची अखेर संस्मरणीय ठरवत असताना, भारताबरोबरच समग्र बुद्धिबळ क्षेत्र मात्र जागतिक विजेता चिनी असणार आहे की भारतीय याच्या अंतिम परिणामाचा अंदाज आजमितीला तरी काढू शकत नाहीत. ‘जागतिक बुद्धिबळ संघटना’द्वारे आयोजित बुद्धिबळाचा जागतिक विजेता कोण? हे ठरवण्यासाठी दि. 25 नोव्हेंबर ते दि. 13 डिसेंबर दरम्यान, सिंगापूर येथे विद्यमान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील एकापाठोपाठ एक डाव बरोबरीत सुटत आहेत.
 
25 लाख डॉलर म्हणजे अंदाजे 21.14 कोटी रुपये, या दोघांपैकी कोण पटकवणार याकडे भारतीयांचेच नव्हे, तर सगळ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. या 14 फेर्‍यांअंती निकाल लागला नाही, तर मात्र ’फास्टर टाईम कंट्रोल’ नियमाला अनुसरून, एकाचे नाव जगद्जेता म्हणून नाईलाजास्तव घोषित केले जाईल. रविवारच्या रात्री जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने अकराव्या सामन्यामध्ये डिंग लिरेनचा पराभव करत 6-5 अशी आघाडी घेतली.
 
दि. 25 नोव्हेंबर सामना 1 विजेता डिंग लिरेन
दि. 26 नोव्हेंबर सामना 2 दोघात बरोबरी
दि. 27 नोव्हेंबर सामना 3 विजेता दोम्माराजू गुकेश
दि. 29 नोव्हेंबर सामना 4 दोघात बरोबरी
दि. 30 नोव्हेंबर सामना 5 दोघात बरोबरी
दि. 1 डिसेंबर सामना 6 दोघात बरोबरी
दि. 3 डिसेंबर सामना 7 दोघात बरोबरी
दि. 4 डिसेंबर सामना 8 दोघात बरोबरी
दि. 5 डिसेंबर सामना 9 दोघात बरोबरी
 
दि. 7 डिसेंबर सामना 10 दोघात बरोबरी झाली असून शनिवार अखेर दोघांचेही 5-5 असे गुण झालेले होते .दि. 8 डिसेंबरचा 11वा सामना जिंकल्याने डी गुकेशने आघाडी घेतली आहे. दि. 9 डिसेंबरचा 12वा, दि. 11 डिसेंबरचा 13वा, दि. 12 डिसेंबरचा 14वा आणि अंतिमतः गरज पडल्यास दि. 13 डिसेंबरला टायब्रेकरमध्ये त्याचा निकाल लावला जाईल. या दोघांच्या स्पर्धेबद्दल अनेकजण आपले भाकीत व्यक्त करत आहेत, तर लीला झिरो, या एआयवर आधारित असलेल्या आणि जी अधिकृत ‘फिडे’देखील ज्याचा आधार घेत असते, अशा संस्थेने आपले अंदाज व्यक्त केले आहेत.
 
आजकालच्या बुद्धिबळाच्या स्पर्धेत, पांढरा आणि काळा रंग फार मोठा फरक करत नाही. आता फक्त चार अतिशय मनोरंजक खेळ खेळायचे बाकी आहेत, असे गुकेश पत्रकार परिषदेत सांगत होता. पुढच्या सामन्यापूर्वी अर्जुन पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे म्हणणे असे आहे की, त्या दोघांनी असे ठरवलेले दिसत आहे की, टायब्रेकमध्ये जायचे. अन्य जोखीम पत्करायची नाही. गुकेशने आपल्याकडे एक ब्रम्हास्त्र ठेवले असावे की, जे तो 12 किंवा 13व्या डावात अमलात आणेल. आपण डिसेंबरचा दुसरा पंधरवडादेखील आनंदात घालवण्यासाठी पी. व्ही., गुकेश आणि युवा हॉकीपटू अशा समस्त क्रीडाप्रेमींना गुलाबी थंडीच्या गुलाबी रंगासारखा आल्हादकारक ठरो.
 
 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत.)

श्रीपाद पेंडसे