नमाजानंतर मंदिर पाहणे 'हराम' ; मंदिराचे काम रोखण्यासाठी बांगलादेशी सैन्याची घुसखोरी!
07-Dec-2024
Total Views |
दिसपूर : बांगलादेशी बॉर्डर गार्डिंग फोर्स (BGB) च्या काही सैनिकांनी आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवर असणाऱ्या एका हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम थांबवल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. नमाजानंतर मंदिर पाहणे हे 'हराम' असल्याचे कारण देत मंदिराचे काम बंद पाडले. या अश्या कृत्यामुळे बांगलादेशी सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन तर केलेच. परंतु यामुळे युनुस सरकारच्या हिंदूंविरोधी असणारा इस्लामिक कट्टरतावादाचा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
कुशियारा नदीच्या काठावर असलेल्या हिंदूंचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनसा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आसाम सरकारने ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी बांगलादेशी सैन्य झाकीगंज सीमा चौकीतून एका स्पीडबोटीतून भारतच्या हद्दीत घुसले आणि तिथल्या मजुरांना मंदिराचे बांधकाम थांबवण्याची धमकी दिली.
बांगलादेशी सैनिकांच्या म्हणण्यानुसार, नमाजानंतर मशिदीतून मंदिर पाहणे हे 'हराम' म्हणजेच अशुभ किंवा वाईट मानले जाते. ते इस्लामच्या धार्मिक तत्वांच्या विरोधात आहे. त्यामुळेच स्थानिक हिंदूंना आणि काम करणाऱ्या मजुरांना दमदाटी करत मंदिर जीर्णोद्धाराचे काम बंद पाडल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे प्रसंगावधान
कथित घटनेची माहिती मिळताच भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) घटनास्थळी पोहोचले आणि योग्यरित्या परिस्थिती हाताळत बांगलादेशी सैन्याला प्रत्युत्तर दिले. त्यांना भारताच्या हद्दीत घुसण्याचा आणि भारतीय नागरिकांना धमकावण्याचा अधिकार नाही. तसेच मंदिराचे पुनर्बांधणीचे काम हे भारताच्या हद्दीत असल्याने ते सुरूच राहणार, असे बीएसएफच्या जवानांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर बांगलादेशी सैन्य माघारी परतले.
आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन
भारताच्या हद्दीत घुसखोरी करणे आणि शस्त्रं दाखवून धमक्या देणे हे आंतरराष्ट्रीय कायदे आणि सीमा शिष्टाचाराचे उल्लंघन आहे. या नियमांनुसार, कोणत्याही सीमा रक्षक दलाला दुसऱ्या देशाच्या सीमेत प्रवेश करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
बांगलादेशातील युनुस सरकारचा इस्लामिक कट्टरतावाद हा केवळ सर्वसामान्यांपुरता मर्यादित नसून तेथील सरकारी सुरक्षा यंत्रणा पोखरण्याचे कामही सुरु असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.