महाराष्ट्रातील प्रमुख राममंदिरे (भाग २) रामटेकचे राम-सीता आणि लक्ष्मण मंदिर

    07-Dec-2024
Total Views |

Ram Temple
 
विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील गडावरील प्राचीन राम-सीता मंदिर सुप्रसिद्ध आहे. छोट्या टेकडीवर हे मंदिर असल्याने त्यास ‘गड मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. वनवासकाळात श्रीराम, सीता व लक्ष्मणाचे काही काळ या टेकडीवर वास्तव्य होते. येथेच श्रीरामाची व ऋषी अगस्त्य मुनींची भेट झाली. त्यांनी रामास ब्रह्मास्त्रासह अनेक अस्त्रे दिली. गडमंदिर हे अनेक देवदेवतांच्या मंदिरांचे भव्य-विस्तीर्ण असे संकुल आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मणाचे येथे स्वतंत्र मंदिर आहे. कवी कुलगुरू कालिदासाचा तसेच प्राकृत मराठीत ‘सेतुबंध’ काव्य लिहिणार्‍या राजा प्रवरसेनाचा या स्थानाशी संबंध आहे.
 
त्रेतायुगात श्रीरामाचा वनवास काळात भारतातील अनेक स्थानांशी निकट संबंध आला. अनेक स्थळे रामाच्या पावन वास्तव्याने पुनीत झाली. त्या स्थानांपैकी महाराष्ट्रातील नाशिक, पंचवटी सर्वपरिचित आहे. तसेच, आणखी एक स्थान महाराष्ट्र भूमीत आहे, ते म्हणजे विदर्भातील नागपूर जवळचे रामटेक! या टेकडीवर वनवासी राम-सीतेचे चार महिने वास्तव्य होते. हे स्थान नागपूरपासून सुमारे ५० किमीवर आहे. या टेकडीजवळ ‘सूर’ नदीच्या काठी थोर ऋषी अगस्ती यांचा आश्रम होता. श्रीराम व अगस्ती ऋषींची येथेच भेट झाली. येथेच अगस्ती ऋषींकडून श्रीरामास ब्रह्मास्त्रप्राप्ती झाली.
 
‘रामटेक’ हे नाव या टेकडीला रामाच्या वास्तव्याने पुनीत झाल्यामुळेच प्राप्त झाले, असे अभ्यासकांचे मत आहे. यापूर्वी या १०० मीटर उंचीच्या छोट्या टेकडीला ‘सिंदुरगिरी’ म्हणून ओळखले जात होते. नाशिकच्या काळाराम मंदिराप्रमाणेच रामटेक राममंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन राममंदिर आहे. सध्या जे विद्यमान मंंदिर पाहतो, ते सुमारे ६०० वर्षे प्राचीन आहे. या भागावर इ. स.२५० मध्ये मौर्य वंशीय राजघराण्याचे अधिपत्य होते. त्यानंतर सातवाहन राजघराण्याने काही काळ अधिपत्य मिळवले. त्यानंतर काही काळ वाकाटक राजघराण्याच्या ताब्यात हा भाग आला होता. राजा प्रवरसेनची या भागातच ‘मनसर’ तथा ‘प्रवरपूर’ येथे राजधानी होती. या राजघराण्यातील द्वितीय प्रवरसेन हा साहित्य, कला, संगीतप्रेमीच नव्हे, तर युद्धातही निष्णात, पारंगत होता. महाराष्ट्री प्राकृत भाषेत या द्वितीय प्रवरसेन राजाने, रामायणावर आधारित ‘सेतूबंध’ महाकाव्य लिहिलेले आहे. त्याविषयीचा स्वतंत्र लेख या लेखमालेत प्रकाशित झालेलाच आहे. महाराष्ट्री प्राकृत साहित्यातील पहिल्या रामकथेचा मान या ‘सेतूबंध’ महाकाव्याला आहे. संस्कृत महाकवी कवी कुलगुरू कालिदासाचेही या रामटेक टेकडीच्या परिसरात काही काळ वास्तव्य होते. राजा प्रवरासेन (द्वि.) आणि कवी कालिदास हे साहित्यप्रेमी मित्र होते. रामटेकच्या निसर्गरम्य अशा वृक्षराजीने नटलेल्या परिसरातच कालिदासाने ‘मेघदूत’ या जगद्विख्यात संस्कृत काव्याची रचना केली. सध्या तेथे ‘कालिदास स्मारक’ आणि कवी कालिदास विद्यापीठ यांद्वारे कालिदासाच्या संस्मरणीय स्मृती जतन केलेल्या आपण पाहू शकतो. तसेच, आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची रामटेक ही कर्मभूमी मानली जाते. महानुभव भक्ती पंथाचे संस्थापक स्वामी चक्रधर हे गुजरातमधील भरूच (भडोच) मधून महाराष्ट्रात येऊन याच टेकडीवर दहा महिने राहिले होते. ‘लीळाचरित्र’ ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे.
 
अनेक मंदिरांचा समूह : मंदिर संकुल
 
रामटेकवर सध्या आपण जी मंदिरे पाहतो, ती ६०० वर्षे प्राचीन आहेत. सुमारे ३०० वर्षांपूर्वी नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी या मंदिरांचा व गडकोटांचा जीर्णोद्धार-पुनर्बांधणी केली. नागपूरकर भोसले राजांनी हा परिसर व गड छिंदवाडराजांच्या ताब्यातून मिळवला होता.
 
श्रीराम-सीता मंदिर ज्या गडावर आहे, ती टेकडी केवळ १००-१५०मीटर उंचीची छोटी टेकडी आहे. गडाच्या पश्चिम व दक्षिण बाजू निसर्गतःच संरक्षित आहेत, तर उत्तर आणि पूर्वेवर दुहेरी तटबंदी आहे. दोन भक्कम तटबंदींमधील विस्तीर्ण परिसरात पश्चिम भागात श्रीराम-सीता यांचे मंदिर आहे. टेकडीच्या पश्चिम बाजूने वर जाण्यास सुमारे ७०० पायर्‍या आहेत. अर्थात, नव्या सोयीसुविधांमुळे टेकडीवर मंदिरापर्यंत मोटारने जाता येते. गडावर फार जुने तळे असून जवळच नृसिंहाचे मंदिर आहे. राममंदिर आदी मंदिर संकुलांचा परिसर ‘देऊळवाडा’ म्हणून ओळखला जातो. मुख्य महादरवाज्याला ‘वराह महाद्वार’ म्हटले जाते. या महादरवाज्याला लागूनच भगवान विष्णुंच्या वराह अवताराची मूर्ती आहे. त्यानंतर तीन प्रवेशद्वारे ओलांडून आपणास जावे लागते. प्रथम तटबंदीला ‘सिंधुपूर दरवाजा’ आहे. द्वितीय तटबंदीला ‘भैरव दरवाजा’ आहे. त्याशिवाय, एक गोकुळ दरवाजापण आहे. देऊळवाड्यात अनेक मंदिरे आहेत. त्यात राजा दशरथ आणि रघुकुल गुरू वसिष्ठ ऋषी यांचे स्वतंत्र मंदिर आहे. तसेच, श्री लक्ष्मणाचेही स्वतंत्र मंदिर आहे. महाराष्ट्रातील हे एकमेवाद्वितीय लक्ष्मण मंदिर म्हणता येईल. लक्ष्मण मंदिर पुढे असून त्यामागे श्रीराम-सीता यांचे मुख्य मंदिर आहे. त्याशिवाय, महादेव मंदिर आहे, नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. अष्टभुजा गणेशाचे देऊळ आहे. एवढेच नव्हे, तर येथील धुमेश्वर महादेव मंदिर शंबुकाचीही मूर्ती आहे. या सर्व मंदिरांची शिखरे भूमिज शैलीतील आहेत. लक्ष्मण मंदिर आणि गोकुळ दरवाज्यावरील कोरीव नक्षीकाम अभिजात शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराची शिखरे, उपशिखरे, मंडप, मंडपातील खांब, खिडक्यांच्या दगडी कोरीव नक्षीदार जाळ्या, सज्जे, छत्र्या, कमलपुष्पे, वेलबुट्या सारे काही नयनमनोहर आहे. हिंदू मंदिरांनी शिल्पकला कशी जतन व उन्नत केली, त्याचे ही मंदिरे अनुपम दर्शन आहे.
 
१२व्या शतकातील महानुभव भक्ती पंथीय ग्रंथामध्ये रामटेक राममंदिरात साजरा झालेल्या ‘रामनवमी’ उत्सवाचा उल्लेख आहे. यावरून हे सिद्ध होते की, येथील रामनवमी उत्सवास नऊ शतकाची प्रदीर्घ परंपरा आहे. येथे रामनवमीचा मोठा उत्सव होतो. त्याशिवाय, त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. सारा गड-परिसर भाविक श्रद्धावंतांनी फुलून जातो. त्रिपुरी यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, रात्री १२ वाजता मंदिराच्या सर्वात उंच शिखरावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. तो सोहळा पाहण्यास हजारो भाविक रात्री गडावर गर्दी करतात.
 
 
 विद्याधर ताटे