बांगलादेशी महिलांविरोधात कट्टरपंथींचा फतवा

बाजारात फिरण्यावर बंदी, युनूस सरकारकडून तालिबानची नक्कल

    06-Dec-2024
Total Views |
Womens

मुंबई : बांगलादेशातील महिलांविरोधात येथील इस्लामिक कट्टरपंथींनी नुकताच एक फतवा ( Fatwa ) जारी केला आहे. गोपालगंजमधील महिलांना बाजारात जाऊन वस्तू खरेदी करता येणार नाहीत. महिलांना काही हवे असेल तर त्यांनी स्वतः घराबाहेर न पडता पुरुषांना बाजारात पाठवावे, असे फतव्यातून सांगण्यात आले आहे. अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अत्याचारादरम्यानच महिलांविरोधात फतवा जारी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

बांगलादेशातील महिलांबाबत घेत असलेले निर्णय पाहता, युनूस सरकार अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारची नक्कल करत आहे का, असा प्रश्न उद्भवत आहे. या फतव्याद्वारे महिलांना बाजारात फिरण्याची बंदी तर घातलीच आहे, परंतु बाजारातील दुकानदारांनाही सक्त ताकीद देण्यात आली आहे. महिलांविरुद्धचा हा फतवा हळूहळू देशभरात जारी केला जाईल, असे कट्टरपंथींचे म्हणणे आहे.

बांगलादेशबाबतचा अपप्रचार हानिकारक ठरेल; युनूस सरकारने ओकली गरळ

भारताचे राजकीय नेतृत्व देशांतर्गत राजकीय फायद्यासाठी बांगलादेशबाबतच्या मुद्द्यांचा वापर करत त्याचा अपप्रचार असल्याचा आरोप बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केला आहे. “बांगलादेशविरोधी आणि मुस्लीमविरोधी राजकारण भारताचे राष्ट्रीयहित आणि एकात्मता कमकुवत करू शकते. भारताने असे केले, तर ते देशांतर्गत राजकारणासाठी हानिकारक ठरेल,” असे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार नाहिद इस्लाम यांनी सांगितले. शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या विद्यार्थी नेत्यांपैकी नाहिद इस्लाम हे एक आहेत. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणार्‍या अत्याचारावर त्यांनी कोणतेही विशेष भाष्य केले नाही. मात्र, “भारताने या मुद्द्यांवर चर्चा करणे टाळण्याबाबत त्यांनी जास्त भर दिला आणि भारताने बांगलादेशविरुद्ध ’खोटा प्रचार’ थांबवावा,” असे आवाहनही केले आहे. “बांगलादेश हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समुदायांना पूर्ण नागरिकत्व हक्क, सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असा दावाही त्यांनी केला.

वेगळा हिंदू बांगलादेश निर्माण व्हावा : देवकीनंदन ठाकुर

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत प्रसिद्ध कथाकार तथा अध्यात्मिक नेते देवकीनंदन ठाकुर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून त्यांनी “बांगलादेशात हिंदू सुरक्षित नसतील, तर बांगलादेशीही भारतात सुरक्षित राहणार नाहीत,” असा इशारा बांगलादेशला दिला आहे. त्यासोबतच, “वेगळा हिंदू बांगलादेश निर्माण व्हावा,” असेही त्यांनी म्हटले आहे. देवकीनंदन ठाकूर यांनी संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “संपूर्ण जगात मानवतेला आक्षेप असल्यास जर कोणी नरसंहार केला, तर त्याला विरोध करण्यासाठी संयुक्त राष्ट्राची उभारणी केली. परंतु, जर संयुक्त राष्ट्र बांगलादेशप्रकरणी कठोर पाऊले उचलत नसेल, तर त्याचे अस्तित्वच संपले पाहिजे.” त्यांनी बांगलादेशला इशारा दिला की, “हिंदूंवरील अत्याचार थांबवले नाहीत, तर भारतात राहणार्‍या बांगलादेशींना शांततेत राहू देणार नाही. आता हिंदू जागे झाले आहेत आणि ज्यादिवशी ते उभे राहतील, त्या दिवशी बांगलादेशला कुठेही स्थान मिळणार नाही.”

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी काम करायचे आहे!
“बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या मंदिरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे सरकारने मला बांगलादेशात जाण्याची परवानगी द्यावी. तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी काम करायचे आहे,” असे म्हणत ‘इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदे’चे संस्थापक मौलाना तौकीर रझा खान यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराचा निषेध केला आहे. “बांगलादेशमध्ये धर्माच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. तसेच, अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारने ठोस पाऊले उचलली पाहिजेत,” असेही त्यांनी सांगितले.