"आता तरी सुधरा! नाहीतर आयुष्यभर खोटे अग्रलेख...;" केशव उपाध्येंचा संजय राऊतांना टोला

    06-Dec-2024
Total Views |
 
Keshav Upadhye & Raut
 
मुंबई : आता तरी सुधरा, नाहीतर आयुष्यभर खोटे अग्रलेख खरडत बसलात, तर त्याचा परिणाम काय होतो, हे आत्ताच्या निकालांनी दाखवले आहे, असा खोचक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी संजय राऊतांना लगावला आहे. केशव उपाध्येंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर निशाणा साधला.
 
 
 
केशव उपाध्ये म्हणाले की, "खोटं बोलायला अजून पाच वर्षं मिळाली असली तरी त्याचा सदुपयोग करा. खोटं बोलून पदरात फक्त निराशाच पडते. सोयीने आठवलेल्या बंद खोलीतल्या वचनांपासून तर ईव्हीएमपर्यंत धादांत खोटे बोलून, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगून राजकारण करता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून साकार झालेल्या लोकशाहीच्या उत्सवावरच आक्षेप घेता? एवढंच होतं, तर काल उजळ माथ्याने शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं होतं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड
 
ते पुढे म्हणाले की, "ईडी, सीबीआय, न्यायालय, निवडणूक आयोग, ईव्हीएम हे जनतेचे मुद्दे नाहीत. जनतेची समस्या काय आहे ते पाहून सोडवण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला मदत करा. नाहीतर आयुष्यभर खोटे अग्रलेख खरडत बसलात, तरी त्याचा परिणाम काय होतो, हे आत्ताच्या निकालांनी दाखवले आहे."