राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन! म्हणाले, "खरंतर २०१९ ला..."
05-Dec-2024
Total Views |
मुंबई : नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत फडणवीसांचे अभिनंदन केले.
राज ठाकरे म्हणाले की, "आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो."
"पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तस भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा," अशा शब्दात राज ठाकरेंनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.