डॉ. बाबासासाहेब आंबेडकर यांचा राजकीय वारसा : रिपब्लिकन ऐक्य

    05-Dec-2024
Total Views |

Dr. Babasaheb Ambedkar
 
आज महामानव, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा, त्यांनी दलित, वंचितांच्या हक्कांसाठी उभारलेला लढा आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याविषयी या लेखातून व्यक्त केलेले हे विचार...
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. यंदा ६८वा महापरिनिर्वाण दिन असून दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आंबेडकरी जनता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यास चैत्यभूमी येथे कोटी कोटी संख्येने उपस्थित राहील.
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून १५ ते २० वर्षे आपल्यात राहिले असते, तर ते भारताचे पंतप्रधान झाले असते. त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे चहावालासुद्धा पंतप्रधान होऊ शकतो, हे आजचे पंतप्रधानही अगदी जाहीरपणे सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत या देशात अनेक लोकनेते आमदार, खासदार होत आहेत. क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा हा संपूर्ण जगातला मानवी हक्कांचा क्रांतिकारी प्रेरणादायी लढा ठरला आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाजाकडे बारीक लक्ष होते. समाजातील समस्या, खेड्यापाड्यात होणारे अत्याचार पाहून ते व्यथित होत असे. म्हणूनच समाजाला न्याय देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी संविधान निर्माण करताना स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून त्यांनी संविधान साकार केले.
 
स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून बाबासाहेबांनी देशाकडे, समाजाकडे लक्ष दिले. या देशात 18 पगड जातींचे, भाषेचे, विविध धर्मांचे लोक राहतात. या सर्वांना एका समान धाग्यात गुंफणे हे खरं तर फार अवघड होते. मात्र, बाबासाहेबांनी विविधतेने नटलेल्या देशाला संविधानातून राष्ट्रीय एकात्मतेने बांधले. जात, धर्म, भाषा यांपेक्षा देश महत्त्वाचा आहे. वेळ आली, तर जात, धर्म, भाषा हे सर्व भेद विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. दलितांवर अत्याचार होत असले, तरी देश महत्त्वाचा आहे, हे दलितांना सांगितले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही तोडणारी नाही, जोडणारी विचारसरणी आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत या सर्वांपेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, असे प्रखर राष्ट्रप्रेमाचे विचार त्यांनी दलितांच्या मनावर बिंबवले आहेत.
 
चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी ग्रामीण भागातले हजारो आंबेडकरी अनुयायी जमा झाले, तेव्हा त्यांच्यावर-दलितांवर सवर्ण समाजाकडून दगडफेक झाली. अनेक सत्याग्रही रक्तबंबाळ झाले. तेव्हा सर्व सत्याग्रही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले.त्यांनी दगडफेकीला दगडफेकीने उत्तर देण्याची परवानगी मागितली. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिसेंला हिंसेने उत्तर देण्याचे नाकारले. जे लोक आज तुमच्यावर दगडफेक करत आहेत, तो त्यांचा दोष नसून त्यांच्या डोक्यात शेकडो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या जातीभेदाचा विचार आहे. त्यासाठी त्यावर दगडफेक करून चालणार नाही. त्यांच्यातील जातीभेदाचा विचार आपल्याला फेकून द्यावा लागेल, तरच ते भविष्यात आपल्यावर दगड फेकणार नाहीत, असे डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना समजावले.
 
घटनेमध्ये ‘कलम 17’ नुसार कायद्याने जातीभेद नष्ट केला आहे. मात्र, काही लोकांच्या मनातून जातीभेद गेलेला नाही. आजही काही ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडतात. मात्र, तरीही समाजात परिवर्तन होत आहे. आजही अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह होतात आणि हे विवाह यशस्वीदेखील होतात. दोन्ही कुटुंबे एकत्र येतात. मात्र, काही ठिकाणी आंतरजातीय विवाहातून जातीय अत्याचाराच्या घटनाही समोर येतात.
 
घटनेने दिलेल्या अधिकारामुळे दलित तरुण प्रगत होत आहेत. आम्ही ‘दलित पँथर’ स्थापन केली होती. अन्याय, अत्याचार आम्ही कुणावर करणार नाही. मात्र, अन्याय होत असेल तर अन्याय आम्ही सहन करणार नाही, अशी ‘दलित पँथर’मध्ये आमची भूमिका होती. ‘जे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, ते सर्व दलित’ अशी आम्ही ‘दलित पँथर’ स्थापना करताना दलित समाजाची व्याख्या केली होती.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या होत्या. त्या काळात त्यांच्या लक्षात आले की, कामगार कामगार म्हणून एकत्र येतो, पण घरी गेल्यावर तो त्याच्या जाती-धर्मानुसार वागतो. जातिभेदातून आपल्याच कामगारांवर हल्लेही करतो. त्यामुळे कामगार म्हणून होणारी एकजूट जातिभेदातून फुटत असते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना केली होती. देशातील सर्वहारा वर्ग, कष्टकरी वर्ग या 85 टक्के समाजाचे नेतृत्व करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका होती. 1952 सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. 1954 मध्ये भंडारामध्ये काँग्रेसने बाबसाहेबांचा पराभव केला. “शेड्युल्ड कास्टच्या मतांवर मी निवडून येत नाही, तर माझे लोक कसे निवडून येतील, सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत,” असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची संकल्पना मांडली. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली.
 
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला फुटीचा शाप लागला आहे. रिपाइं कधी एकत्र येत नाही. जेव्हा आम्ही एकत्र आलो, तेव्हा 1998 मध्ये आमचे रिपाइंचे चार खासदार निवडून आले. स्वतःच्या बळावर आपले लोक निवडून आणणे कठीण आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग चांगला होता. मात्र, त्यांना त्यांच्या पक्षाला एवढ्या वर्षांत मान्यता मिळवता आली नाही.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. चार पाऊले मागे येण्याची माझी तयारी आहेच. बाळासाहेब आंबेडकरांनी रिपाइंचे अध्यक्ष व्हावे. सर्व नेत्यांनी एकत्र यावे. त्या रिपब्लिकन ऐक्याला जनता प्रतिसाद देईल. त्यानंतर एखाद्या पक्षाची युती केली, तर रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद उभी राहील. रिपब्लिकन ऐक्यामुळे आंबेडकरी जनतेची राजकीय ताकद उभी राहील, असा भविष्यात माझा प्रयत्न आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे.
 
मी शिवसेना-भाजपसोबत युतीमध्ये असलो तरी, काही निळा आंबेडकरी विचारांचा झेंडा सोडलेला नाही. ‘आंबेडकरवाद’ माझ्या नसानसांत भिनलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ‘शिवशक्ती-भिमशक्ती’ एकजुटीची भूमिका मांडली. मी सर्व विचारवंतांचा सल्ला घेऊन ‘शिवशक्ती-भिमशक्ती’ भाजप युतीचा प्रयोग केला. माझे काम चालू आहे.
 
‘दलित पँथर’सारखी चळवळ आता उभी राहत नाही. ‘दलित पँथर’च्या काळात नामांतराच्या मागणीवर मोठा लढा आम्ही दिला. त्याला जनतेने मोठी साथ दिली. समाज अजूनही संघर्षशील आहे. सध्याच्या परिस्थितीत आर्थिक प्रश्नाच्या मुद्द्यावर लोक एकत्र येत नाहीत. ग्रामीण भागातील प्रश्न, झोपडपट्ट्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावर आंदोलन उभारण्याचा माझा प्रयत्न आहे.
 
माझे मंत्रिपद हे माझे नाही, ते समाजाचे मंत्रिपद आहे. हे कार्यकर्त्यांचे मंत्रिपद आहे. मी मंत्री झाल्यामुळे माझा पक्ष देशभर वाढला आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्यांत माझा पक्ष पोहोचला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला 17 टक्के मतदान मिळाल्यामुळे मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला मान्यता प्राप्त झाली आहे. नागालँड, मणिपूर या दोन राज्यांत रिपब्लिकन पक्ष मान्यता प्राप्त झाला असून आणखी दोन राज्यांत मान्यता प्राप्त झाल्यास रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्त ठरेल. संपूर्ण देशात पक्ष वाढवण्याचे काम सुरू आहे.
 
बाबासाहेबांचा अभिमान आम्हाला आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही या मैदानात उतरलो आहोत. मैदान गाजवण्याची संधी आम्हाला बाबासाहेबांमुळेच मिळाली आहे. बाबासाहेब नसते, तर आम्हाला कोणी विचारले नसते. आम्ही कुठेच नसतो. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांमुळे, आम्ही ताकदवान चळवळ उभी करू शकलो. बाबासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला आहे. त्यांचा राजकीय वारसा रिपब्लिकन पक्ष आहे. तो राजकीय वारसा आम्ही चालवीत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणे, हेच खरे महामानवाला विनम्र अभिवादन ठरेल!