ममता सरकारकडून ‘मनरेगा’चा अपात्रांना लाभ

केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा घणाघात

    04-Dec-2024
Total Views |
Mamata Govt.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने ( Mamta Govt. ) ‘मनरेगा’ योजनेचा लाभ अपात्रांना दिल्याचा घणाघात केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.

पश्चिम बंगालमधील श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मनरेगावरील प्रश्नादरम्यान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी हमरीतुमरी केली. कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रश्नात आरोप केला की प.बंगालला २०२२-२३ मध्ये केंद्राकडून एकही पैसा मिळाला नाही. बॅनर्जी म्हणाले की, या योजनेत बेकायदेशीर कामे झाल्याचा युक्तिवाद केंद्र करत आहे, काही बेकायदेशीर कामे झाली असल्यास ते केंद्र सरकारने सांगावे असे आव्हान त्यांनी दिले.

बॅनर्जी यांच्या प्रश्नास केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, पश्चिम बंगाल सरकारने मोठी कामे कमी करून ठराविक लोकांना फायदा करून देण्याचा अपराध केला आहे. या योजनेंतर्गत अपात्रांना पात्र ठरवून पात्र लोकांना अपात्र ठरवण्यात आले होते, हे सिद्ध झाले आहे. ग्रामीण विकास योजनांची नावे बदलण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे नाव बदलून स्वतःच्या नावावर करण्याचा अपराध केला आहे. या योजनेंतर्गतही अपात्र लोकांना लाभ देण्यात आला आणि पात्र लोकांना डावलण्यात आले. प. बंगाल सरकारने यावर कोणतीही प्रभावी कारवाई केली नाही. पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' म्हटल्याप्रमाणे आम्ही निधीचा दुरुपयोग होऊ देणार नाही, असा टोला शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या उत्तरात लगावला आहे.