तेल अवीव : इस्रायल ( Israel ) येथील मशिदींमधील स्पीकरवरून होणार्या अजानवर बंदी घातली आहे. संरक्षणमंत्री इटामार बेन गवीर यांनी पोलिसांना मशिदींमध्ये लावलेले स्पीकर जप्त करण्याचे आणि आवाज केल्यास दंड आकारण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्व जेरुसलेम आणि इतर अनेक भागांतील मशिदींमधून मोठा आवाज येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
स्पीकर बंदीची मागणी करणार्यांचे म्हणणे आहे की, त्याचा मोठा आवाज सकाळच्या झोपेत अडथळा आणतो. बेन गवीर यांनी पोलीस कमांडर्सना सांगितले की, “ते लवकरच एक विधेयक सादर करणार असून ज्यामुळे गोंगाट करणार्या मशिदींवरील दंड वाढणार आहे.”
या निर्णयाविरोधात इस्रायलमध्येच निषेधाचा आवाज उठू लागला आहे. काही शहरांच्या महापौरांनी सांगितले की, “आम्ही बेन गवीरचे हे पाऊल मुस्लिमांविरुद्ध चिथावणी म्हणून पाहतो, त्यामुळे दंगली पसरू शकतात.
आदेशाला काही संघटनांचा विरोध
इस्रायलमधील ज्यू आणि अरबांमध्ये सहकार्य वाढवण्याचे काम करणार्या ‘अब्राहम इनिशिएटिव्ह ऑर्गनायझेशन’नेही याला विरोध केला. संघटनेने म्हटले की, “पोलिसांचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. देशात गुन्हेगार मोकळेपणाने फिरत असताना बेन गवीर पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत.”
स्पीकर काढून टाकण्याच्या निर्णयाचा अभिमान
अरब इस्लामी पक्षाचे अध्यक्ष मन्सूर अब्बास यांनी सरकारला बेन गवीर यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. “ते मुस्लिमांना चिथावणी देत आहेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहेत. तसेच, मशिदींमधून लाऊड स्पीकर काढून टाकण्याच्या त्यांच्या निर्णयाचा मला अभिमान आहे. हे स्पीकर्स इस्रायली नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. बहुतेक पाश्चात्य देश आणि काही अरब देशही आवाजावर नियंत्रण ठेवतात. तर, या विषयावर अनेक कायदे बनवतात. केवळ इस्रायलमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रार्थना करणे हा मूलभूत अधिकार आहे, परंतु एखाद्याच्या जीवाच्या किमतीवर नाही,” असेही त्यांनी सांगितले.