ठाणे : ठाणे महापालिकेचा ( Municipal Corporation ) आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तब्बल ५४१.०८ कोटी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. दि. २३ डिसेंबर रोजीपर्यंतच्या या वसुलीत अव्वल ठरलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने १८७.४५ कोटी वसूल केले असून, सर्वात कमी म्हणजेच १८.४८ कोटींची वसुली मुंब्रा येथे झाली आहे. तरी थकबाकीदारांनी कर भरावा, यासाठी ठाणे पालिकेने फोन, ‘एसएमएस’द्वारे थकबाकी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला २०२४-२५ या वर्षाकरिता एकूण ८५७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित विभागाने आतापर्यंत ५४१.०८ कोटींची वसुली केली आहे. प्रशासनाने ठेवलेल्या उद्दिष्टाच्या ती ६० टक्के इतकी आहे. गतवर्षी याच कालावधीत ४९५.२५ कोटींची वसुली करण्यात आली होती.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५.८३ कोटींची अधिकची वसुली आतापर्यंत झाली आहे. यंदा ६ लाख, १३ हजार ग्राहकांना बिलांचे वाटप केले आहे. त्यातील ३ लाख, १० हजार ग्राहकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. ५५ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाईन भरणा केला. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने १८७.४५ कोटींची वसुली केली आहे. तर सर्वात कमी वसुली ही मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत झाली आहे. तर वर्तकनगर आणि नौपाडा प्रभाग समितीने वसुलीत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समितींना २० कोटींचा पल्ला आतापर्यंत गाठता आलेला नाही.
...अन्यथा जप्तीची कारवाई
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीअंतर्गत मालमत्ता कराच्या वसुलीची मोहीम जोरदार सुरू आहे. त्यानुसार थकबाकीदारांना नोटीस बजावणे, त्यानंतर मालमत्ता सील करणे, जप्तीची कारवाई करणे अशी मोहीम राबविण्यात येत आहे.
सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्रे सुरू
आर्थिक वर्षांच्या पुढील तीन महिन्यांत १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभाग प्रयत्न करत आहे. पालिकेची सर्व प्रभाग आणि उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येत असल्याचे पालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी सांगितले.