प्राजक्ता माळी अवमानप्रकरणी महिला आयोग ॲक्शनमोडवर

मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश; वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना

    30-Dec-2024
Total Views |
Prajakta Mali And Suresh Dhas

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) यांच्याविषयी केलेले वक्तव्य आमदार सुरेश धस यांना भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोग ॲक्शनमोडवर आला असून, मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी राज्य महिला कडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात महिला आयोगाने म्हटले आहे की, "महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक आणि बदनामीकारक विधान, तसेच त्यांनंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने. राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे."