काँग्रेसकडून कायमच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गांधी घराण्यातून नसल्यामुळे अवहेलना

    30-Dec-2024
Total Views |

cm devendra fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या या नीतीचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसकडून कायमच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करण्यात आला. ते गांधी घराण्यातून नसल्यामुळे त्यांच्या पदरी कायम अवहेलना आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
'एक्स पोस्ट' करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या राजकारणाचा समाचार घेतला. ते म्हणाले, "भारताचे महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक व्यक्त करीत असताना, काँग्रेस मात्र घाणेरडे राजकारण करीत आहे. हे दु:खद आहे. सिंग यांचा पाकिस्तानने अपमान केला, तेव्हा काँग्रेस गप्प बसली. मनमोहन सिंग गांधी घराण्यातील नसल्यामुळे काँग्रेसने त्यांचा अपमान केला. आम्ही याआधीही अशा अनेक बड्या नेत्यांचा अपमान होताना पाहिला आहे. केवळ ते गांधी घराण्यातील नसल्यामुळे त्यांचा अपमान होतो".
 
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जेव्हा पाकिस्तानी पंतप्रधानांकडून अपमान झाला, तेव्हा काँग्रेस त्यांच्या समर्थनासाठी कधीच पुढे आली नाही. त्यांच्या काळातील एक अध्यादेशही राहुल गांधींनी फाडला होता. केवळ मनमोहन सिंगच नाहीत, तर दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून अपमान सहन करावा लागला. नरसिंह राव यांच्या पार्थिवाला 'एआयसीसी' मुख्यालयात प्रवेश दिला गेला नाही. या सर्व घटनांमुळे लोकशाही आणि संविधानाचे सार जपण्यासाठी घराणेशाहीचे राजकारण किती धोकादायक आहे, याची आठवण करुन देत आहे", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.