सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला विश्वातील प्रधान हरपला!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : माजी खासदार सतीश प्रधान यांना वाहिली श्रद्धांजली

    30-Dec-2024
Total Views |
 
Shinde
 
ठाणे : सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला विश्वातील प्रधान हरपला, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. ठाण्याचे पहिले महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवार, २९ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
 
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "नगराध्यक्ष, महापौर, राज्यसभेचे खासदार अशी अनेक पदे सतीश प्रधान साहेबांनी भुषवली. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील कट्टर हिंदूत्ववादी विचारांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. ठाणे शहरासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभे केले. तसेच ठाणे शहराच्या जडणघडणीत आणि सर्वांगिण विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांना जी पदे मिळाली त्याचा उपयोग त्यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी केला. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला विश्वातील प्रधान हरपल्याची भावना आहे."
 
"सर्वच क्षेत्रात त्यांचा सहभाग होता. ठाण्याची महापौर मॅरेथॉन सुरु करुन त्यांनी दुर्गम भागातील तरुण-तरूणींना एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले. ठाणे मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा खेळले. साहित्य क्षेत्रातही त्यांनी अनेक उपक्रम घेतले. क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेतला. ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे. सतीश प्रधान साहेबांनी कारसेवासुद्धा केली. ते कारसेवक म्हणून आंदोलनात होते. ते बाळासाहेबांचा कडवड हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे होते," अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.