‘महा’शपथविधीची ‘मेगा’ तयारी

दि. ४ डिसेंबरला भाजप विधिमंडळ नेत्याची निवड

    03-Dec-2024
Total Views |
Azad Maidan

मुंबई : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर मिळण्याचा क्षण नजीक आला असून दि. ४ डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे. त्याआधी आझाद मैदानावर ‘महा’शपथविधीची ( Shapathvidhi ) ‘मेगा’ तयारी सुरू करण्यात आली आहे. दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होईल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विधान परिषदेतील गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्र आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार उपस्थित राहतील. मुख्य मंचावर शपथविधी, दुसर्‍या मंचावर साधू-महंत, तर तिसर्‍या मंचावर संगीत असा भव्य कार्यक्रम असणार आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरली. त्यामुळे त्यांचे विजयातील स्थान अधोरेखित करण्यासाठी लाडक्या बहिणींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

भाजपच्या मुंबईतील आमदारांवर शपथविधी सोहळ्याची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी या भव्य सोहळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतली. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित या बैठकीला मुंबईतील सर्व १५ आमदार, माजी नगरसेवक, मुंबई भाजपचे पदाधिकारी आणि सर्व आघाडीचे प्रमुख उपस्थित होते.

विरोधी पक्षांनाही निमंत्रण पाठवणार

‘महा’शपथविधीसाठी भाजप महायुतीकडून विरोधी पक्षांनाही निमंत्रण पाठवले जाणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना हे निमंत्रण पाठवले जाईल. शिवाय, सोनिया आणि राहुल गांधींनाही निमंत्रण पत्रिका पाठवली जाणार असल्याचे कळते.

मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा कधी?

बुधवार, दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधिमंडळ नेता निवडीच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदारांनी एकमत दर्शवलेल्या व्यक्तीची विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाईल. तोच दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल.

तयारीची वैशिष्ट्ये
  • शपथविधीसाठी एकूण ३ पायर्‍या असतील

  • मुख्य मंच ६० द १०० फूट

  • उजव्या आणि डाव्या बाजूला ६० द ५०चे दोन मंच

  • उजव्या बाजूच्या मंचावर संत-महंत, सन्मानीय व्यक्ती

  • डाव्या बाजूला महापुरुषांच्या प्रतिमा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील

  • ४० हजार आसनव्यवस्था

  • मंचासमोर आमदार-खासदार, निमंत्रित, व्हीव्हीआयपी

  • चोख पोलीस बंदोबस्त

  • सर्वसामान्यांच्या प्रवेशाकरिता ३ प्रवेशद्वारे