महारेराने नुकसान भरपाईचे २०० कोटी केले वसूल

घरखरेदीदारांना नुकसान भरपाईसाठी महरेराचा प्रयत्न

    03-Dec-2024
Total Views |

maharera


मुंबई, दि.३: प्रतिनिधी 
महारेरा आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे तब्बल २००.२३ कोटी रुपये वसुल करून देण्यात यशस्वी झाले आहे. यात मुंबईसह राज्यभरातील प्रकल्पांचा समावेश आहे. ही वसुली आणखी प्रभावीपणे करता यावी यासाठी संख्या आणि रकमांच्या तुलनेत जास्त प्रकरणे असलेल्या मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांत, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.

मुंबई शहर ४६.४७ कोटी रुपये, मुंबई उपनगर ७६.३३ कोटी रुपये, पुणे ३९.१० कोटी रूपये, ठाणे ११.६५ कोटी रुपये , नागपूर ९.६५ कोटी रूपये, रायगड ७.४९ कोटी रूपये, पालघर ४.४९ कोटी रुपये, संभाजीनगर ३.८४ कोटी रूपये, नाशिक १.१२ कोटी रुपये आणि चंद्रपूरच्या 9 लाख रुपयांचा समावेश आहे. मुंबई उपनगरात ७३ प्रकल्पांतील ३५५ तक्रारींपोटी सुमारे २२८.१२ कोटी आणि पुणे क्षेत्रातील ८९ प्रकल्पांतील २०१ तक्रारींपोटी १५०.७२ कोटी रूपये वसूल होणे बाकी आहे. ही वसुली करण्यात कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार इतर जिल्हाधिकारी कार्यालयातही अशा नेमणुका करण्याचा महारेराचा मानस आहे.

महारेराने नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५.६२ कोटींच्या वसुलीसाठी ११६३ वारंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत १३९ प्रकल्पांतील २८३ वारंटसपोटी एकूण २००.२३ कोटी रूपये वसूल झालेले आहेत. महारेराने वेळोवेळी सुनावणी घेऊन व्याज/ नुकसान भरपाई/परतावा देण्याबाबत दिलेल्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महारेरा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.
-----
विविध कारणास्तव बाधित घरखरेदीदारांना नुकसान भरपाईसाठी महारेरा वेळोवेळी आदेश देते असते. ही आदेशित नुकसान भरपाई या घरखरेदीदारांना मिळावी आणि त्यांना यथोचित दिलासा मिळावा अशी महारेराची भूमिका आहे. रक्कम आणि संख्येच्या दृष्टीने जास्त प्रकरणे असलेल्या मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांत प्रायोगिक तत्त्वावर सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय महारेराने घेतलेला आहे. गरजेनुसार इतरत्रही अशा नियुक्त्या करण्याचा विचार करण्यात येईल.
- मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा