मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे ( Rupali Thombre ) यांच्या विरोधात बीडमधील संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यावर तक्रार करण्यात आली आहे. यावर रुपाली ठोंबरे यांनी पलटवार केला आहे. "हे चॅट आव्हाडांचेच आहेत आणि सोशल मीडिया काय न्यायालय नाही. माझ्यावर याआधी ३२ गुन्हे दाखल आहेत आणि आता हा ३३वा.." असे म्हणत ठोंबरेंनी आपले कृत्य योग्य असल्याचे सांगितले.
रुपाली ठोंबरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन जितेंद्र आव्हाड यांच्या चॅट्सचे फोटो पोस्ट करण्यात आले होते. बीडमध्ये झालेल्या मोर्चाची तयारी कशाप्रकारे करत होते हे त्या चॅट्समधून समजून येते. यावरुन ते फेक असल्याचे सांगत ठोंबरे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. याला प्रत्युत्तर देताना रुपाली ठोंबरे यांनी चांगलाच पलटवार दिला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या, "तो स्क्रीन शॉट आव्हाडांचाच आहे. कोणताच आरोपी म्हणत नाही की हा आरोप मी केलाय.. बीडमधील निषेध मोर्चात राजकीय पोळ्या भाजण्यात आल्या. मनसेत असताना माझ्यावर ३२ केसेस दाखल होत्या. आता ही ३३वी. त्यामुळे आपण बीडमध्ये भेटू. सोशल मीडिया काय न्यायालय नाही. मी बीडमध्ये जाईन आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेन."
रुपाली ठोंबरे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की, "जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. आमच्यावर तसे गुन्हे नाही आहेत. जितेंद्र आव्हाड बालिश आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान नाही." जितेंद्र आव्हाडांसारखे राजकारणी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोपदेखील रुपाली ठोंबरे यांनी पलटवार स्वरुपी दिला आहे.