नवी दिल्ली : जागतिक पातळीवर डी गुकेश याने सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून इतिहास रचला. त्यानंतर आता भारतीय बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने रविवारी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करत न्यूयॉर्कमधील FIDE वुमन्स रॅपीड चेस चॅम्पियनशिप जिंकली. २०१९ साली पहिल्यांदा तिने हा विजयश्री खेचून आणला होता.
११ पैकी ८.५ असा स्कोअर करत हंपी विजयी झाल्या. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या जु वेंजुन यांच्यानंतर हंपी हा किताब जिंकणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. हंपी यांच्यासहीत हरीका द्रोणवल्ली शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु हरीका यांचा सामना अर्निणीत राहिला. माध्यमांशी बोलताना, आपला आनंद व्यक्त करत कोनेरू हंपी म्हणाल्या की "भारताच्या चेससाठी हा सुवर्णकाळ आहे. आधी गुकेश आणि आता मला हा किताब मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. खरं तर मी खेळाची पहिली फेरीमध्ये हरले होते, त्यामुळे मी जिंकेल असं मला वाटलं नव्हतं." या विजयामुळे आपला आत्मविश्वास वाढेल तसेच बुद्धिबळावर पुन्हा काम करण्यास मदत होईल, असेही हंपी म्हणाल्या.