मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी मध्य रेल्वेवर रविवार, दि.२९ रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक असणार नाही.
रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३:३० या कालावधीत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या सेवा विद्याविहार पर्यंत डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्टलाईन वगळून अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या अप आणि ठाण्यावरून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील बंद राहतील.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक नाही
शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच २८/२९ डिसेंबर २०२४रोजी लोअर परळ स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनेल सुरू करण्यासाठी एक मोठा नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक अप आणि डाऊन जलद मार्गांवर रात्री ११:३० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत असेल. ब्लॉक कालावधीत, मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. या गाड्यांची सविस्तर माहिती उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवर उपलब्ध असेल.