नवी दिल्ली : जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान ( Former PM ) डॉ. मनमोहन सिंग शनिवारी दुपारी पंचत्त्वात विलीन झाले. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव लष्करी वाहनातून दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे त्यांना २१ तोफांची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी येथे माजी पंतप्रधानांना मानवंदना दिली. अंत्यस्कारास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शीख धार्मिक प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग उपस्थित होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्या उपिंदर सिंग यांनी मुखाग्नी दिला.
तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव वाजता काँग्रेस मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले, जेथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर २४, अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयापासून त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. यावेळी 'मनमोहन सिंग अमर रहे' अशा घोषणाही देण्यात आल्या.
आणि काँग्रेसकडून ऐतिहासिक चुकीचे परिमार्जन
देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे २३ डिसेंबर २००४ रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले होते. त्यावेळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे राव यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयासमोर ताटकळत ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे राव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील दिल्लीत करण्यात आले नव्हते. त्यावेळी देशात काँग्रेसचेच सरकार होते. मात्र, तरीदेखील आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानाविषयी काँग्रेस पक्षाने अशी भूमिका घेतली होती. यावेळी मात्र काँग्रेस पक्षाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवास काँग्रेस मुख्यालयात आणून आपल्या ऐतिहासिक चुकीचे काही प्रमाणात परिमार्जन केले, असे म्हणता येईल.