दिव्यांगत्वावर मात करत आपल्या वेगळ्या धाटणीच्या शिकवणीतून हजारो विद्यार्थ्यांना घडवणार्या आदर्श शिक्षक अंकुश नथुराम जाधव यांच्याविषयी...
कुश नथुराम जाधव यांचे मूळ गाव मु. निवी, पोस्ट-वरसे, जिल्हा रायगड. निवी हे गाव डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी असून, अंकुश यांच्या घरी अठराविश्व दारिद्य्र. वडील नथुराम जाधव आणि आई रूक्मिणी अशिक्षित असून, त्यांनी संकटांशी दोन हात करत आपल्या अपत्यांना कसेबसे शिक्षण दिले. अंकुश यांची लहु, संदीप आणि सविता अशी भावंडं. अंकुश हे जन्मत: ४८ टक्के दिव्यांग. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोहा येथील निवी गावी झाले. उच्च प्राथमिक शिक्षण तळाघर, नंतरचे शिक्षण रोहा व बारावीनंतर बी.एड पदवीचे शिक्षण त्यांनी पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात घेतले.
अंकुश जन्मत: दिव्यांग असल्याने पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटणे तसे साहजिकच. त्यांची आई त्यांना आपल्या कडेवर उचलून शाळेत न्यायची. इयत्ता आठवीत असताना दिव्यांगांसाठी उपयुक्त असणारी तीनचाकी सायकल अंकुश यांच्यासाठी त्यांनी विकत घेतली. अंकुश त्या सायकलवरून शाळेत जाऊ लागले. ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्त इयत्ता दहावीत असताना सायकल शर्यतीत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याची आठवणही ते आवर्जून नमूद करतात.
अंकुश हे लहानपणापासून शाळेत हुशार. त्यांना काव्यवाचनाची, लिखाणाची प्रचंड आवड. पण, घरातील एकूणच परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण आपल्या बहिणीच्या सासरी पूर्ण केले. ‘बी.एड’चे शिक्षण घेण्यासाठी रोह्याहून पनवेलकडे जाण्यास त्यांनी रेल्वेमार्गाने पहिला प्रवास केला. खाण्यापिण्याचीसुद्धा भ्रांत. वास्तव्य करायचे तरी कुठे? नोकरीचा तर मोठा प्रश्न आ वासून उभा होताच. कसेबसे ‘बी.एड’चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंकुश यांनी पनवेलमधील कळंबोली येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पहिली नोकरी मिळवली. ते आजही त्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वाजवी वेतनात एकूण १२-१३ वर्षे त्यांनी काम केले. पगारातून स्वत:चा कसाबसा उदरनिर्वाह करत, ते आपल्या गावी चार पैसे पाठवायचे.
अनेक वर्षे त्यांनी दहा-बाय-दहाच्या भाडेतत्त्वाच्या खोलीतच आयुष्य घालवले. ते शाळेत नोकरीसाठी जात असताना आपली तीनचाकी सायकल घेऊन जात असत. घर ते शाळा या प्रवासादरम्यान आपल्या हाताने त्यांना तीनचाकी सायकलचा पायडल मारावा लागायचा, यामुळे अनेकदा त्यांचा हातही दुखायचा.
शाळेत मराठी विषयात तसा त्यांचा हातखंडा. अंकुश यांना मराठी विषयातील पद्य विभाग शिकवण्यामध्येही अधिक रस. इतर शिक्षकांच्या तुलनेत अंकुश यांच्या शिकवण्याचे कौशल्य हे जणू निराळेच. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करत त्यांनी अगदी टेपरेकॉर्डरचा वापर करत संतवाणी आणि इतर कविता विद्यार्थ्यांना ऐकवल्या. टेपरेकॉर्डरच्या माध्यमातून कविता ऐकवल्याने त्या कविता विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील, असे त्यांचे म्हणणे. चित्रपटातील गाणे ऐकल्यानंतर मुलांना ते लक्षात राहते, त्याचप्रमाणे टेपरेकॉर्डरने कविता ऐकवून त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण केल्यास, ते विद्यार्थ्यांना सहजपणे उमगेल, असे अंकुश यांचे म्हणणे. २००४ सालापासून ते आजही अनेक विद्यार्थ्यांना अशाच प्रकारची शिकवण देतात. त्यांच्या शिकवणीचे हेच कौशल्य आणि दिव्यांगत्वाशी केलेले दोन हात पाहून, त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
नोकरी मिळाली, पण आता छोकरीचे काय? असा प्रश्न अनेकदा त्यांना अस्वस्थ करीत असे. वाजवी वेतन आणि दिव्यांगत्वामुळे त्यांना मुलींचाही लग्नासाठी नकार यायचा. मग आपला पूर्ण वेळ हा नोकरीसाठी राखीव ठेवायचा, असा निश्चय त्यांनी धरला. मात्र, २००८ साली अंकुश यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. अंकुश पुरते एकटे पडले. मातृवियोगाचे दुःख त्यांना पचवता येत नव्हते. अशावेळी निवी या गावातील अवंतिका नावाच्या युवतीने अंकुश यांना विवाहाची मागणी घातली. त्यांचे वाचन आणि लिखाण मराठी साहित्य, कविता, लहान विद्यार्थ्यांप्रति असलेले प्रेम पाहून अवंतिका अंकुश यांच्यावर भाळून गेल्या होत्या. अशावेळी अवंतिका यांच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी मात्र विरोध दर्शवला. ‘तुमचे जन्माला येणारे अपत्यही दिव्यांगच होईल, ज्याच्याकडे स्वत:चे घर नाही, अशा व्यक्तीसोबत विवाह करू नको,’ म्हणून अवंतिका यांना या विवाहापासून परावृत्त करण्याचा त्यांच्या घरच्यांनी पूर्ण प्रयत्न केला. मात्र, अवंतिका यांनी अंकुश यांच्यावरील प्रेमापोटी आणि विश्वासापोटी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २६व्या वर्षी अंकुश आणि अवंतिका विवाहबद्ध झाले. त्यानंतर आज लक्ष्मी घरात आल्याने अंकुश यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांचे नाव हे सरकारी शिक्षक कोट्यात गेले. त्यांच्या वेतनात वाढ झाली. १९९४ ते २०१३ सालापर्यंत एकूण १९ वर्षे त्यांनी तीनचाकी सायकवरून प्रवास केला. मात्र, आता ते स्कूटीचा वापर करतात. त्यांना प्रथम, प्रथमेश अशी दोन सुदृढसंपन्न अपत्य आहेत.
त्यांचा नुकताच ‘अर्पण’ नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांना ‘कवी रत्नपुरस्कार’, ‘स्वामी विवेकानंद’, ‘साहित्य श्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. “या जगात आपले स्थान हे वेगळे आहे. आपण नेहमी आशावादी राहण्याचा सकारात्मक विचार करावा,” असा दिव्यांगांना ते संदेश देतात. त्यांच्या कार्यप्रणालीतून त्यांनी आपल्या शिकवणीचे वेगळेपण सक्रिय ठेवावे. त्यांच्या कार्याच्या उन्नतीस दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून शुभेच्छा!
सुशांत काळे