नवी दिल्ली : “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( AAP ) यांना ‘अॅण्टी नॅशनल’ म्हणणार्या काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी, अथवा त्यांची ‘इंडी’ आघाडीतून हकालपट्टी घडवू,” असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी दिला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि खा. संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, “दिल्ली निवडणुकीत ‘आप’चा पराभव करण्यासाठी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसची भाजपशी मिलीभगत नसेल, तर येत्या २४ तासांत केजरीवाल यांना ‘अॅण्टी नॅशनल’ संबोधणार्या अजय माकन यांच्यावर कारवाई करावी.” “युवक काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल केली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. येत्या २४ तासांत त्यावर कारवाई झाली नाही, तर काँग्रेस पक्षाला ‘इंडी’ आघाडीतून हुसकावून काढण्यासाठी आघाडीतील अन्य घटकपक्षांसोबत आप चर्चा करेल,” असा इशारादेखील आतिशी यांनी दिला आहे.
‘दिल्लीत काँग्रेसचे उमेदवार भाजप मुख्यालयात ठरतात’
“काँग्रेसची उमेदवार यादी भाजप मुख्यालयात तयार करण्यात येत आहे,” असा आरोप आतिशी यांनी केला आहे. “अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात काँग्रेसने संदीप दिक्षीत यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा प्रचारही भाजपतर्फे प्रायोजित करण्यात येत आहे. काँग्रेस नेते अजय माकन आणि अन्य नेते भाजपने दिल्ली स्क्रिप्ट वाचत आहेत,” असाही टोला आतिशी यांनी लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सत्ताधारी ‘आप’ आणि काँग्रेस पक्षामध्ये खडाजंगी रंगली आहे. विशेष म्हणजे, ‘इंडी’ आघाडीतील हे दोन्ही घटकपक्ष दिल्लीत स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काँग्रेस लक्ष्य करत असून काँग्रस नेते अजय माकन यांनी केजरीवाल हे ‘अॅण्टी नॅशनल’ असल्याचा घणाघात केला होता. काँग्रेस नेत्यांनी केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात ‘एफआयआर’ देखील दाखल केली आहे.