दिव्यांग असुनही 'तो' मैदान गाजवतोय...

पॅरा ॲथलेटिक्स धावण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत ठाण्याच्या मयुरेशला दोन सुवर्ण

    25-Dec-2024
Total Views |
Mayuresh Kotiyan

ठाणे : गतिमंद असतानाही अथक प्रयत्नामुळे पुणे आणि कोल्हापुरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॅराॲथलेटिक्स ( Para Athletics ) स्पर्धेत ठाण्याच्या मयुरेश कोटियन याने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धात सुवर्ण पदक पटकावले आहे. दिव्यंगत्वावर मात करीत मयुरेश अनेक स्पर्धा गाजवत आहे.

ठाण्याच्या वाघबीळ येथे रहाणाऱ्या मयुरेश कोटीयन (२४) याचे श्री मॉ स्नेहदिप शाळेच्या स्पेशल चाईल्ड वर्गात शालेय शिक्षण झाले. लहानपणापासून मयुरेश धावण्यात चपळ होता. त्यामुळे शाळेतील धावण्याच्या स्पर्धेत देखील त्याची उल्लेखनीय कामगिरी होती. आपला मुलगा गतिमंद आहे. पुढे त्याचे कसे होणार याची चिंता कोटीयन कुटुंबाला होती. मात्र, मयुरेशने दुसऱ्यावर विसंबून राहू नये, स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी चेंबूर येथील एनएएसईओएच इन्स्टिट्युटमध्ये तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी दाखल केले. मयुरेश मधील धावण्याची चपळता जाणून पालकांनी त्याला तांत्रिक शिक्षणाबरोबर धावण्याचा सराव सुरू ठेवला.

शिकत असताना छोट्या मोठया ॲथलेटिक्स इव्हेंट स्पर्धा मयुरेश गाजवत होता. अशातच कोटीयन कुटुंबाला पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार ॲथलेटिक्स प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मयुरेश सराव करू लागला, सध्या तो राष्ट्रीय प्रशिक्षक जितेंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्सचे धडे गिरवत आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या स्पेशल चाईल्ड ॲथलेटिक्स १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आला, तर २१ आणि २२ डिसेंबर रोजी कोल्हापूर मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर झालेल्या पॅरालिंपिक स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मयुरेश याला सुवर्ण पदक मिळाले.