ठाण्यात प्रथमच होणाऱ्या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
25-Dec-2024
Total Views |
ठाणे : ठाण्यात प्रथमच होणाऱ्या "गृहनिर्माण संस्थाच्या महाअधिवेशनाला ( Maha Adhiveshan ) २८ डिसें. रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस प्रथमच ठाण्यात येत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज्याचा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेले हे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील उपवन परिसरातील मैदानात होणार आहे. या महाअधिवेशनाला तब्बल ३० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी उपस्थिती दर्शवणार असल्याने आयोजक ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या मार्फत उपवन तलाव मैदानात भला मोठा पंडाल उभारण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.
या महाअधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गणेश नाईक, प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के,आमदार रविंद्र चव्हाण,आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे आदींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व अर्थसाह्य यासह सोसायटयांच्या वेगवेगळ्या समस्या आणि अडचणीवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे सीताराम राणे यांनी सांगितले.
महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी लिंक
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनने https://bit.ly/thanehousingmahaadhiveshan2024 ही लिंक उपलब्ध केली आहे. तेव्हा, गुरुवार (दि. २६ डिसेंबर) पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.