कुख्यात डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकाचा ठाण्यातील फ्लॅट जप्त
24-Dec-2024
Total Views |
ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ ( Daud brother ) इक्बाल कासकर याच्या हस्तकाने खंडणीच्या माध्यमातून बळकावलेला घोडबंदर रोडवरील फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. मुमताज शेख असे या हस्तकाचे नाव असून त्याने बांधकाम व्यावसायिकाला धमकावून कावेसरमधील निओपोलिस इमारतीतील घराचा ताबा घेतल्याचे समोर आले होते. २०२२ मध्ये मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने हा फ्लॅट सील केला होता. त्यानंतर आज दुसर्यांदा या फ्लॅटवर कारवाई करण्यात आली.
इक्बाल कासकरचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेत बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहताकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती. सुमारे ७५ लाख रुपयांचे मूल्य असलेली ही सदनिका बळजबरीने शेखच्या नावावर करण्यात आली होती. तसेच बनावट धनादेशाद्वारे १० लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते. मुमताज शेख हा २०१६ साली निओपोलिस इमारतीतील रूम नंबर ४०५ मध्ये आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे राहत होती. २०२२ मध्ये मनी लॉडरिंग प्रकरणी इक्बाल कासकर विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती. याच दरम्यान इक्बालचा हस्तक मुमताज याने बळकावलेल्या ठाण्यातील फ्लॅटवर ईडीने कारवाई केली. ईडी हा फ्लॅट सील करणार असल्याची कुणकुण लागताच मुमताज फॅमिलीसोबत रातोरात सामान गुंडाळून पळून गेला होता.
पंधरवड्यापूर्वी फ्लॅटचे सील तोडले
पंधरवड्यापूर्वी मुमताज त्याच्या कुटुंबीयांसोबत पुन्हा ठाण्यात आला. सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन करत त्याने रूमचे सील तोडुन घरात प्रवेश केला. याबाबत सोसायटीच्या कमिटीला संशय आल्यानंतर त्यांनी ईडी अधिकार्यांशी संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर आज ईडी अधिकार्यांनी पुन्हा हा फ्लॅट सील केला आहे.