मुंबई : राजकीय वर्तुळात कधीही एकत्र न येणारे दोन भाऊ भाचाच्या लग्नात शेजारी शेजारी उभे असलेली व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Thackeray ) व उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे राजकीय विरोधक असणारे चक्क एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले आणि संवादही साधल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न २२ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले. या लग्नात दोन्ही मामांनी पुढाकार घेऊन जबाबदारीही सांभाळली. या कौटुंबिक भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राजकारणात एकमेकांचे शत्रू असूनही आपल्या भाचाच्या लग्नात पुढाकार घेत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी आपला सहभाग दाखवला. राज ठाकरे या लग्नामध्ये उध्दव ठाकरे यांच्या शेजारी उभे होते. एवढेच नव्हे तर, त्या दोघांनी एकमेकांशी हात मिळवल्याचे या व्हिडीओत दिसून आले आहे. त्या दोघांमध्ये संवादही झाला आहे. मात्र त्या दोघांमध्ये काय संवाद झाला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे, ही भेट फक्त कौटुंबिक होती की त्यामुळे काही समीकरणं बदलतील? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भूकंप होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.