पुणे : (CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत येऊन सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. "सोमनाश सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
"राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने इथे आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये विद्वेष निर्माण करायचा, एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे. हेच काम गेली अनेक वर्षं ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे हे जे त्यांचं विद्वेषाचं काम आहे ते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे. महाराष्ट्राचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी घोषित केलेली आहे. या न्यायालयीन चौकशीमध्ये यासंदर्भातील सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचं कारण नाही. जर या चौकशीमध्ये मारहाणीमध्ये किंवा अश्या प्रकारच्या गोष्टीमुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आल्यास कोणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल." असे मुख्यमंत्री म्हणाले.