सनी लिओनीचं नाव वापरून काँग्रेस नेत्याने घेतला लाडकी बहिण योजनेचा लाभ!
23-Dec-2024
Total Views |
रायपूर : (Chhattisgarh) महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच छत्तीसगडमध्येही महतारी वंदन योजना सुरु आहे. मात्र काहीजण या योजनांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना दिसतात. दरम्यान एका काँग्रेस नेत्याने चक्क अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने या योजनेतून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सनी लिओनीच्या नावाने महतारी वंदन योजनेचा फायदा घेणाऱ्या आरोपी वीरेंद्र जोशीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. आपल्या आधार आणि बँक खाते क्रमांकांचा गैरवापर झाल्याचे वीरेंद्र जोशीने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे. तसेच या योजनेंतर्गत दर महिन्याला आपल्या खात्यात पैसे येत असल्याची कोणतीही माहिती आपल्याला नसल्याचेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले. तसेच या योजनेतून मिळालेले पैसे परत करण्यास आपण तयार असल्याचे त्याने सांगितले आहे.
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनात खळबळ उडाल्याने बस्तरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश जारी केले. लाभार्थी महिला वेदमती जोशी हिचा पती वीरेंद्र जोशी याने बनावट आणि बेकायदेशीरपणे सरकारी योजनेतून पैसे उकळल्याचा गुन्हा उघडकीस आला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर फसवणूक प्रकरणातील आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याचे बँक खाते होल्ड करण्यात आले आहे. दरम्यान बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.
महतारी वंदन योजना काय आहे?
महतारी वंदन योजने अंतर्गत २१ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना दरमहा १,००० रुपये दिले जातात. यामध्ये सर्व विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांचा समावेश आहे. छत्तीसगड सरकारने ५ फेब्रुवारी २०२४ पासून या योजनेसाठी नोंदणी सुरू केली होती. पहिला हप्ता १० मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते जारी करण्यात आला होता. सध्या ७० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.