परिवहन मंत्री सरनाईक ॲक्शन मोडवर : एसटी प्रशासनाला दिला महिन्याभराचा अल्टीमेट
ठाण्यातील खोपट बस स्थानकाची केली पाहणी
22-Dec-2024
Total Views |
ठाणे : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांची परिवहन मंत्री पदी वर्णी लागल्यानंतरना. सरनाईक पहिल्याच दिवशी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत ( ST Administration ) रविवारी (दि.२२ डिसे.) पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था,अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली, तसेच पहिल्याच दिवशी कारवाई टाळत असल्याचे स्पष्ट करून एक महिन्याचा अल्टीमेटम देताना चुकीला क्षमा नाही असा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप नुकतेच जाहिर करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर लगेचच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री सरनाईक यांनी रविवारी खोपट बस आगार भेट देऊन एसटी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्या बरोबरच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
परिवहन मंत्रीपद मिळाले, हे श्रद्धा आणि सबुरीचे फळ असल्याचे स्पष्ट करीत सरनाईक यांनी मंत्री बनल्यानंतर सर्वप्रथम घरच्या म्हणजेच ठाण्यापासुन सुधारणा करण्याचे ठरवले. त्यानुसार रविवारी खोपट आगाराची पाहणी करून पहिल्याच दिवशी कारवाई करणं योग्य नसल्याने एक महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर चुकीला क्षमा नाही. अशी तंबीही सरनाईक यांनी प्रशासनाला दिली आहे.