क्षेत्र व मालकी हक्क कायम करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी
21-Dec-2024
Total Views | 58
ठाणे : बाळकूम, कोलशेत, मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रक या दस्तऐवजातील नोंदीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे अधिवेशनात केली.
नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील महसुली गावे बाळकूम, कोलशेत, मानपाडा, ढोकाळी येथील मूळ सातबारा उतारा आणि नवीन मालमत्ता पत्रक यात असलेल्या नोंदींची तफावत आणि त्यामुळे जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. मालमत्ता पत्रकात झालेल्या चुकीच्या नोंदी हा रहिवाशांवर अन्यायच असल्याचे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.
यशस्वी नगरसारख्या गृहसंकुलात ४० ते ५० वर्षे जुन्या इमारती आहेत. त्या धोकादायक झाल्या असून ठाणे महापालिकेने त्या रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटीसाही बजावल्या आहेत. चुकीच्या नोंदीमुळे या इमारतींचा पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे केळकर यांनी नमूद केले. अस्तित्वात असलेला सातबारा उतारा कालबाह्य समजून नवीन दिलेल्या नोंदीनुसार नवीन मालमत्ता पत्रकाप्रमाणे क्षेत्र व मालकी हक्क समजण्यात येईल असे शासनाने नमूद केले आहे. मात्र मालमत्ता पत्रक देताना झालेली चौकशी, तपासणी आणि नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आमदारकेळकर यांनी पुनरुच्चार केला.
मूळ सातबारा आणि मालमत्ता पत्रकातील क्षेत्र नोंदणी यात मोठी तफावत आढळत असून मूळ सातबारा उताऱ्याप्रमाणे मालमत्ता पत्रक दुरुस्त करून मिळावे अशी तेथील नागरिकांची जुनी मागणी आहे, मात्र आठ महिने उलटूनही त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने तेथील रहिवाशांना पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. याप्रकरणी मूळ सातबारा उताऱ्याप्रमाणे नव्याने मोजणी करून क्षेत्र व मालकी हक्क कायम करावेत असे निर्देश शासनाने द्यावेत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केली.