संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
20-Dec-2024
Total Views |
नागपूर : (CM Devendra Fadnavis) परभणीमध्ये संविधानाचा अवमान करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सुर्यवंशी (Somnath suryawanshi) या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेवर विधानसभेत चर्चा झाली. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "परभणीमध्ये जाळपोळ सुरु असताना व्हिडिओमध्ये जे लोक दिसले त्यांना अटक करण्यात आली. यात सोमनाथ व्यंकट सुर्यवंशीसुद्धा होते. त्यांना दोनदा दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केला का? किंवा तुम्हाला मारहाण झाली का? असे त्यांना विचारण्यात आले. यावर सोमनाथ यांनी नाही असे सांगितले. यासंदर्भातील सगळे व्हिडीओ उपलब्ध आहेत.
"सोमनाथ यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांना श्वसनाचा आजार आणि ब्रेथलेसनेस असल्याचा उल्लेख आहे. पोलिस कस्टडीतून त्यांना तुरुंगात नेण्यात आले. त्यांना सकाळच्या वेळी जळजळत असल्याने तिथून हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आणि तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पैशाने कुणाचा जीव परत येत नाही. परंतू, राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत केली जाईल. तसेच या सगळ्या प्रकरणाची न्यायलयीन चौकशीसुद्धा केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.