‘पुष्पा २’ - हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचाच आवाज!

    02-Dec-2024
Total Views |
 
shreyas talpade
 
 
 
मुंबई : सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची प्रमुख भूमिका असणाऱ्या पुष्पा २ या चित्रपटाची विशेष चर्चा रंगली आहे. २०२१ मध्ये आलेल्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग असून देशभरात हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, पुष्पा १ मधील जितका अल्लू अर्जूनचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांना आवडला तितकाच वायरल या चित्रपटातील त्याचा ‘पुष्पा फ्लॉवर नही फायर है’, ‘झुकेगा नही साला’ हा संवादही झाला. दरम्यान, पुष्पा चित्रपटाचा हिंदी डब चित्रपट हा अल्लू अर्जुनला दिलेल्या हिंदी आवाजमुळेही लोकप्रिय झाला होता. आणि तो आवाज होता मराठमोळ्या श्रेयस तळपदे याचा.
 
मूळ तेलुगूमधील या चित्रपटाला हिंदीमध्ये प्रदर्शित करताना अल्लू अर्जुनच्या पात्राला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला होता. जितकी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तितकीच चर्चा श्रेयस तळपदेच्या आवाजाची देखील झाली होती. आता पुष्पाच्या दुसऱ्या भागातही अल्लू अर्जुनला श्रेयस तळपदेनेच आवाज दिला असून त्याने या डबिंग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
श्रेयसने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एका बाजूला ट्रेलर सुरू असून दुसऱ्या बाजूला ट्रेलरमधील अल्लू अर्जुनचे डायलॉग श्रेयस तळपदेने कसे म्हटले ते दिसते. ‘पुष्पा नॅशनल नही इंटरनॅशनल खिलाडी है’, ‘ पुष्पा फायर नही वाईल्ड फायर है’ हे या भागातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले डायलॉग श्रेयसने डबिंगच्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत.
श्रेयसने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘फ्लॉवर नाही, फायर आहे मी’पासून ‘नॅशनल नाही, इंटरनॅशनल आहे मी!’पर्यंत आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे. ‘पुष्पा २’ चा आठवडा अधिकृतपणे सुरू झाला आहे आणि मी यासाठी खूप उत्सुक आहे! ‘पुष्पा २’ साठी पुन्हा डबिंग करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि माझ्या आवाजाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुष्पाराज म्हणजेच अल्लू अर्जुन यांच्याबद्दल बोलायचं तर… काय एनर्जी आहे यार! तुमचा दमदार अभिनय प्रत्येक वेळी मला डब करताना नवीन ऊर्जा देतो. तुमचा स्वॅग, तुमचा आत्मविश्वास, तुमची देहबोली हे सर्व प्रेरणादायी आहे.
 

shreyas talpade 
 
पुढे श्रेयस म्हणतो, मनव भाऊ, राज, वीरू, सनी आणि संपूर्ण डबिंग टीमचे खूप खूप आभार, ज्यांनी ही प्रक्रिया आनंददायक, मजेदार आणि उत्साही बनवली. तुमचं मेहनतीचं फळ स्क्रीनवर स्पष्टपणे दिसतंय. आता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहून तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा!”.