मुंबईच्या समुद्रातील जवाहर बेटावर दुर्मीळ युरेशियन गिधाडाचे दर्शन: केले रेस्क्यू

    02-Dec-2024
Total Views |
eurasian griffon vulture rescued



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्वीपावर रविवार दि. १ डिसेंबर रोजी दुर्मीळ युरेशियन ग्रिफाॅन गिधाडाचे दर्शन झाले (
eurasian griffon vulture rescued). मात्र, हे गिधाड जखमी अवस्थेत असल्याने वन विभागाने त्याला पकडून पुण्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात उपचाराकरिता पाठवले आहे (eurasian griffon vulture rescued). युरेशियन ग्रिफाॅन गिधाड ही संकटग्रस्त श्रेणीतील दुर्मीळ प्रजात असून ते स्थलांतरी आहे. (eurasian griffon vulture rescued)

 
 
मुंबईच्या पश्चिमेला घारापुरी बेटाच्या शेजारी जवाहर द्वीप आहे. या बेटाला बुचर आयलंड म्हणूनही ओळखले जाते. या बेटावर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना रविवारी सकाळी दुर्मीळ युरेशियन गिधाड दिसले. हे गिधाड जमिनीवर बसून होते. त्यामुळे ते जखमी असल्याची शक्यता ओळखून कर्मचाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. उरण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेटावर जाऊन गिधाडाला ताब्यात घेतले. त्याची रवानगी पुढील उपचाराकरिता पुण्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात करण्यात आली. केंद्रात गिधाडावर उपचार सुरू करण्यात आले असून त्याची परिस्थितीत गंभीर आहे. डोक्यावर आदळल्यामुळे शरीराअंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
 

युरेशियन ग्रिफाॅन गिधाड ही हिवाळ्यात युरोपमधून भारतात स्थलांतर करतात. ही गिधाडे प्रामुख्याने मध्य भारतापर्यंतच्या प्रदेशात स्थलांतर करतात. त्याखालच्या प्रदेशांमध्ये क्वचितच दिसतात. जवाहर द्वीपावर सापडलेले गिधाडही स्थलांतरादरम्यानच याठिकाणी आले असावे. पश्चिम घाट आणि कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करुन येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत. दोन वर्षांपूर्वी नाशिकमधून या गिधाडाची पहिल्यांदा नोंद करण्यात आली होती.