कौटुंबिक निष्ठेचे राष्ट्रकार्य

    02-Dec-2024
Total Views |

जो बायडन
 
सत्ताधीश पदाची शपथ घेताना राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रकार्य यांना प्राथमिकता देण्याचे वचन जनतेला देत असतो. अशावेळी लोकशाहीतील महत्त्वाचे तत्त्व असलेल्या न्यायाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. मात्र, याठिकाणी राष्ट्रकार्य म्हणून बायडन यांनी कौटुंबिक निष्ठाच जपली, हेच खरे!
 
राजासाठी संपूर्ण प्रजा हीच त्याचे अपत्य असते. त्यामुळे सगळ्यांवर सारखे प्रेम करतो, तोच राजगादीवर बसण्याच्या योग्यतेचा असतो, असे संकेत आहेत. मात्र, पुत्रप्रेमाचा मोह अनेक राज्यकर्त्यांना आवरता आलेला नाही. त्यामुळेच त्या राज्यांचे अथवा घराण्याचे पतन झाल्याचा इतिहास आहे. अशीच काहीशी पुत्रमोहाची लागण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना झाल्याचे चित्र आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्षाच्या शक्तीचा वापर करून आपला मुलगा हंटर बायडन याला त्याच्यावरील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये वडिलांची पुण्याईच हंटर यांच्या कामी आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर मी माझ्या मुलाच्या सुटकेसाठी कोणत्याही माझ्या अधिकाराचा वापर करणार नसल्याचे बायडन यांनी जाहीर केले होते. मात्र, आता त्यावरून ‘घुमजाव’ करत हंटर बायडन यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले आहेत.
 
अर्थात, बायडन यांच्यावर या पुत्रमोहासाठी टीका होत असली, तरीही बायडन यांचे वागणे अमेरिकेच्या राज्यघटनेला धरूनच आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये ‘कलम 2’मधील ‘उपकलम 2’अन्वये महाभियोग नसलेल्या फेडरलशी संबंधित गुन्ह्यांबाबत संबंधित आरोपीला माफ करण्याचा अथवा शिक्षेत सवलत देण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला देण्यात आला आहे. अर्थात, काही गुन्हे हे नकळत किंवा कोणताही गुन्हा करण्याचा हेतू नसताना घडतात. मात्र, न्यायाच्या पातळीवर तो गुन्हाच असल्याने त्यास न्यायव्यवस्थेकडून शिक्षा होते. अशावेळी न्यायाचा चेहरा क्रूर असू नये, यासाठी न्यायदानाची शेवटची पायरी म्हणून हा अधिकार राष्ट्राध्यक्षांना राज्यघटनेने दिला आहे. भारतातदेखील राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहेच. मात्र, त्याचबरोबर याचा वापर नैतिकतेने करण्याचे अघोषित बंधनदेखील राष्ट्राध्यक्षांवर असते, याचेच भान बायडन यांना राहिलेले दिसत नाही. त्यामुळे बायडन यांचे वर्तन हे नियमाधीन असले, तरी त्यास नैतिकतेच्या पातळीवर योग्य म्हणता येणार नाही. उलटपक्षी त्यास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नैतिक अधःपतन म्हणणेच यथोचित ठरेल.
 
हंटर बायडन याच्यावर अमेरिकेमध्ये करचुकवेगिरी आणि शस्त्र कायद्याच्या उल्लंघनाचे गंभीर आरोप होते. जवळपास 12 गुन्हे असे होते, ज्यामध्ये हंटर दोषी आढळले असते, तर त्यांना किमान 42 वर्षांची शिक्षा अमेरिकेच्या न्यायप्रणालीनुसार झाली असती. मात्र, त्याआधीच बायडन यांच्या निर्णयाने ते दोषमुक्त झाले आहेत. हंटर यांच्याविरोधातील गुन्हे मागे घेताना बायडन यांनी स्पष्टीकरण दिले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मी हंटरला नैसर्गिक न्याय मिळावा, यासाठी वाट पाहिली. मात्र, सगळेचजण त्याला कशा पद्धतीने यात अधिक अडकवले जाईल, याचेच प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. सिंहासनावर बसणार्‍यांकडून जनतेला सिंहासारखीच वर्तवणूक अपेक्षित असते, कोल्ह्यासारखी नाही, याचाच विसर बायडन यांना इथे पडलेला दिसतो. अमेरिकेमध्येही बायडन यांच्या या कृतीवर अनेक कायदे तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. अनेक तज्ज्ञांनी तर बायडन यांच्या कृतीची न्यायाचा बाजार म्हणत अवहेलनादेखील केली आहे. या सगळ्या बाबींमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज ठळक झाला, तो म्हणजे बायडन यांना स्वतःलाच अमेरिकेच्या न्याययंत्रणेवर विश्वास नाही. ज्याच्या नावे न्यायदानाचे कार्य अविरत न्याययंत्रणा चालवत असते. त्या यंत्रणेवरच जर राष्ट्राध्यक्षांचा विश्वास नसेल, तर अमेरिकेतील प्रजासत्ताकाचे भविष्य अंधकारमय होण्याच्या मार्गावर आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.
 
जगाला लोकशाहीचे धडे देण्यात सदोदित आनंद मानणार्‍या अमेरिकेमध्ये लोकशाहीमध्ये सत्ता ही जनसेवेसाठी असते, याचाच विसर पडला असून अमेरिकेमध्ये ती सध्या कौटुंबिक आश्रयदात्री झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच जो बायडन यांची कृती राजकीय आणि नैतिक दोन्ही पातळींवरही निषेधार्हच. एखादा सत्ताधीश पदाची शपथ घेताना राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रकार्य यांना प्राथमिकता देण्याचे वचन जनतेला देत असतो. अशावेळी लोकशाहीतील महत्त्वाचे तत्त्व असलेल्या न्यायाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची असते. मात्र, याठिकाणी राष्ट्रकार्य म्हणून बायडन यांनी कौटुंबिक निष्ठाच जपली, हेच खरे!
 
कौस्तुभ वीरकर