कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा, हा भगवद्गीतेतील उपदेश. पण, बरेचदा प्रत्यक्षात कर्म न करताही फळाची चव चाखण्याची आणि जबाबदारी न स्वीकारण्याची मानवी वृत्ती दिसून येते. म्हणूनच आपण केलेल्या कर्मांपासून ते आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत, ही भावना स्वीकारणे हे निकडीचे. हे नेमके कसे करावे? त्यामागचे मानसशास्त्र काय सांगते? याचा आढावा घेणारा हा लेख...
जबाबदारी म्हणजे आपल्या एखाद्या कृतीची, निर्णयाची आणि परिणामांची जबाबदारी स्वीकारणे. याचा अर्थ आपल्या कृतीसाठी आपण स्वतः जबाबदार असणे, स्वतःशी प्रामाणिक असणे आणि प्रौढांच्या पातळीवर जबाबदार्या स्वीकारणे. आपल्या समस्यांसाठी आपण इतरांना किंवा बाह्य परिस्थितीला दोषी ठरविण्याच्या हे अगदी उलट आहे. आपण आपल्या स्वतःच्या जीवनावर नियंत्रण ठेवतो, हे ओळखण्याची क्षमता आणि आपल्या कृतींचा आपल्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडतो, हे जाणून घेणे, म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वीकारणे.
स्वजबाबदारी आणि दोष देणारी प्रवृत्ती यांच्यातील फरक कसा ओळखावा?
स्वजबाबदारी म्हणजे एखाद्याच्या कृतीची मालकी घेणे, तर दोष म्हणजे एखाद्याच्या चुकांची आणि समस्यांची जबाबदारी इतरांवर किंवा बाह्य परिस्थितीवर टाकणे. पण, इतरांवर दोषारोपण करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि आपल्या कृतीची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. स्वजबाबदारी समजून घेण्यासाठी दोघांमधील फरक ओळखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कृतीची जबाबदारी घेणे आपल्याला आत्मजागरूकता वाढवण्यास आणि आत्मचिंतन करण्यास साहाय्यभूत ठरते. जीवनात काय किती महत्त्वाचे आहे, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणेदेखील आत्मसन्मान आणि आत्मस्वीकृती वाढवते.
‘सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी’ (स्वजबाबदारी) म्हणजे काय?
स्वजबाबदारीमध्ये तुम्ही तुमच्या जीवनकथेचे लेखक आहात, हे ओळखणे समाविष्ट आहे. याचा अर्थ हे समजून घेणे की, तुमचे विचार, निवडी आणि वर्तणूक तुमच्या परिस्थितीला लक्षणीयरित्या आकार देतात. ही संकल्पना बाह्य घटकांचा प्रभाव नाकारत नाही. परंतु, आव्हाने आणि संधींना प्रतिसाद देण्यासाठी वैयक्तिक जबाबदारीच्या सामर्थ्यावर जोर देते.
तुमच्या आवडी-निवडी पाहण्यासाठी सर्वात कुशल व्यक्ती तुम्ही स्वत:च आहात. तुम्ही जितके स्वतःवर अवलंबून आहात, तितके तुमचे जीवनातील प्रत्येक पैलूवर तुमचे अधिक सकारात्मक नियंत्रण आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता आणि तुम्ही कसे जगता, यांची वैयक्तिक जबाबदारी घ्या. तुमच्यासाठी सर्वात चांगले काय आहे, हे तुम्हीच जाणता आणि ते साध्य करण्यात तुम्ही सर्वात सक्षम आहात!
दीर्घकाळात आपण आपल्या जीवनाला आणि पर्यायाने स्वतःला आकार देत असतो. आपण मरेपर्यंत ही स्वउत्थानाची प्रक्रिया संपत नाही आणि आपल्या आयुष्यात करत असलेल्या निवडी ही शेवटी आपली स्वतःची जबाबदारी असते. असे म्हणतात की, प्रत्येक मनुष्य एका उद्देशाने या भूतलावर जन्मला आहे आणि केवळ तो उद्देश शोधण्याचीच नव्हे, तर ती पूर्ण करण्याचीही जबाबदारी त्याच व्यक्तीची आहे.
व्यक्ती आजूबाजूला कोणतेही नियम असले, बंधने असली, तरीही मुक्त आहे. त्यांना ते सुसह्य वाटले, तरच ते ते सहन करतील. जर त्यांना खूप त्रास वाटला, तर ते ती बंधने झुगारून टाकतील. माणूस मुक्त आहे, कारण त्यांना माहीत आहे की, ते जे काही करतात, त्यासाठी ते नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत. माणसाच्या स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते. जो माणूस स्वतः आत्मविश्वासाने आणि प्रेरणेने मोठा व्हायला तयार नाही, ज्याला स्वतःच्या पाठीवर स्वतःचे वजन वाहून घ्यावयाचे नाही, अशा व्यक्तीसाठी स्वतःचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य टिकवणे खूप कष्टप्रद आहे.
स्वजबाबदारीचे महत्त्व
सक्षमीकरण : आपल्या जीवनाची जबाबदारी स्वीकारणे आपल्याला आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते. जेव्हा तुम्ही बाह्य शक्तींना दोष देणे थांबवता आणि तुम्ही कशावर प्रभाव टाकू शकता, यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची तुमची क्षमता ‘अनलॉक’ करता.
वाढ आणि शिकणे : चुका आणि अपयश हे अपरिहार्य आहे. त्यांचीही जबाबदारी स्वतःच घेतल्यास तुम्ही शिकू शकता आणि आपला विकास करू शकता. शिवाय, लवचिकता आणि अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता वाढवू शकता.
विश्वास आणि आदर : जे लोक त्यांच्या कृतींची जबाबदारी घेतात, ते इतरांचा विश्वास आणि आदर मिळवतात. हे वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंधातील एक प्रमुख गुणधर्म असल्याने नात्यांमध्ये अखंडता निर्माण करते.
भावनिक कल्याण : आपल्या जीवनावर आपले नियंत्रण आहे, ही भावना आपली असाहाय्यता कमी करते. हे आत्मसन्मान आणि भावनिक स्थिरता वाढवते.
स्वजबाबदारी म्हणजे केवळ अपयशाची जबाबदारी स्वीकारणे नव्हे, तर आपल्या यशाची मालकी घेणे आणि सतत सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवू शकत नसलो, तरी आपण त्यास कसा प्रतिसाद देतो, हे आपण नियंत्रित करू शकता. स्वजबाबदारी स्वीकारून, तुम्ही वैयक्तिक स्वप्नांची पूर्तता आणि समाजाचा अधिक सुसंवादी मार्ग प्रशस्त करता. आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्यासाठी आपण जबाबदार नाही, परंतु त्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा की नाही व होऊ द्यायचा, तर तो सकारात्मक असावा की नाही, हा मार्ग आपण ठरवू शकतो; आपण एकतर त्या परिस्थितीला आपल्या वर हावी होऊ देऊ शकतो किंवा आपण त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. तुमचा विश्वास असायला हवा की, तुमचे यश निर्माण करणारे तुम्हीच आहात, तुमची सामान्यता निर्माण करणारे तुम्हीच आहात आणि पैसा आणि यशाभोवती तुमचा संघर्ष निर्माण करणारे देखील तुम्हीच आहात! आजची जबाबदारी टाळून तुम्ही उद्याच्या जबाबदारीतून सुटू शकत नाही. आपण भूतकाळातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करू नये. भविष्यासाठी स्वतःची जबाबदारी आजच स्वीकारूया!
डॉ. शुभांगी पारकर