विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची निवड

आमदार प्रविण दरेकरांकडून कवितेच्या माध्यमातून अभिनंदन

    19-Dec-2024
Total Views |

ram shinde
 
नागपूर : (Ram Shinde) विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आज महायुतीतर्फे भाजपचे राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन केले.
 
विधान परिषदेत बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपली एकमताने निवड केली हे आपले भाग्य आहे. यावेळी दरेकर यांनी ‘उपसभापती होत्या नीलम गोऱ्हे, त्यांच्या कारभारावर खुश आहोत आम्ही सारे... विधिमंडळाचे चांगले चालावे काम, म्हणूनच सभापती आले शिंदेचे राम!', अशी कविता केली.
 
ते पुढे म्हणाले की, राम शिंदे राजकारणातील अजात शत्रू आहेत. आमदार, पक्षाचा पदाधिकारी, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून चांगली कारकीर्द, चांगला स्वभाव राम शिंदे यांचा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. चौडीच्या सरपंच पदापासून ते आज सर्वोच्च अशा सभापती पदापर्यंत पोचण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. आज उच्च पदावर बसला आहात. सर्वच नेत्यांनी अभिनंदनाची भाषणे करताना चांगले संदेश दिले. राजकारणातील लोकांना एक चांगला संदेश आयुष्यात मिळतो कधी नाही मिळत. म्हणून तुम्ही लोकांसाठी चांगल्या पद्धतीचे काम करत राहा अशा पद्धतीचा संदेश दिलाय.
 
तसेच ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते राज्याच्या हितासाठी उपमुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना कधी वाटले नव्हते की उपमुख्यमंत्री होईन. त्यांना सर्वतोपारी राज्याचे हित महत्वाचे आहे, कोण कुठल्या पदावर आहे यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राचे हित जपायचेय ही चांगली भावना महाराष्ट्राच्या संस्कृतीत होताना दिसतेय. श्रद्धा सबुरी हा साईबाबांचा मंत्र सर्वांनाच आचरणात आणण्याची सवय लागलीय. श्रद्धा सबुरी एवढा चांगला जीवनातील कोणता मंत्र नाही आणि राम शिंदे यांनाही साईबाबांचा श्रद्धा सबुरी हा मंत्रच कामी आला, असेही दरेकर म्हणाले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, आपण ज्या धनगर समाजातून आले तेव्हा वाटले होते समाज पाठीशी उभा राहिला. परंतु जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. या राज्यातील सर्वोच्च सन्मानाचे पद धनगर समाजाला देऊन त्या समाजाचा अभिमान, मान उंचवण्याचे काम भाजप आणि महायुतीने केले आहे. त्याबद्दल महायुतीच्या नेत्यांनाही धन्यवाद देतो. आपली कामगिरी दैदिप्यमान व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
 
 
सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.
जन्मतारीख - १ जानेवारी १९६७
शिक्षण – एम. एस्सी, बी.एड.
(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)
 
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ
 प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य- २००४ ते २००६
तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-२००६ ते २००९
जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर २०१० ते २०१२
 सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य २०१३ ते २०१५
 प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य- २०२१
सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-२०२२
लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-
 
सन २०००-२००५ - सरपंच, ग्रामपंचायत चौंडी
 सन २००९-२०१४ - आमदार कर्जत-जामखेड
२०१४-२०१९ आमदार, कर्जत-जामखेड
सन २०१४-२०१६ या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
सन २०१६-२०१९ या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.
 
(सन२०१६-२०१९ या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला " जलयुक्त शिवार अभियान " हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.)