आज, दि. 20 डिसेंबर रोजी पुणे येथे सायंकाळी 5 वाजता ‘भाऊबीज निधी’ समर्पण सुविख्यात लेखिका व माध्यमतज्ज्ञ शेफाली वैद्य यांच्या हस्ते ‘महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण’ संस्थेस सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानिमिताने ‘भाऊबीज निधी’ संकल्पनेचा इतिहास व ओळख या लेखाद्वारे करून देत आहोत.
वाबहिणीचे नाते हे स्नेहपूर्ण व एकमेकांवर असलेला प्रेमाचा हक्क सांगणारे असे असते. या नात्याचा उत्सव, घराघरांतून भाऊबीजेच्या दिवशी केला जातो. या सणाचे निमित्त साधत कुणी सामाजिक उपक्रम म्हणून एखाद्या ध्येयसाधक संस्थेची आर्थिक गरज पूर्ण करेल, असा विचार 104 वर्षांपूर्वी कोणाच्या मनातही आला नसेल. परंतु, हे नावीन्यपूर्ण व कल्पक द्रष्टेपण दाखविले ते गोपाल महादेव ऊर्फ बापूसाहेब चिपळूणकरांनी. बापूसाहेब हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांचे एक कार्यनिष्ठ सहकारी.
महर्षी अण्णांनी अनाथ बालिका-विधवांसाठी हिंगणे-पुणे येथे सुरू केलेल्या संस्थेतील मुलींचे संगोपन व शिक्षणाकरिता लागणारा खर्च खूप मोठा होता. अण्णांच्या कार्याचा परिचय सर्वदूरपर्यंत पोहोचल्यामुळे, संस्थेत दाखल होणार्या मुलींची संख्याही वाढत होती. मात्र, यामुळे वाढता आर्थिक भार पेलणे हे एक मोठे आव्हान संस्थेसमोर उभे ठाकले होते. संस्थात्मक कार्य उभे राहात असताना, ते निरंतर व योग्य त्या गतीने सुरू राहण्याकरिता तसेच संस्थेच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने भक्कम व निरंतर आर्थिक स्रोत असणे महत्त्वाचे असते. तसेच, प्रसंगिक खर्चाची तरतूद करून ठेवणेदेखील गरजेचे असते.
समविचारी कार्यकर्त्यांना जोडणे व संस्थेच्या आर्थिक गरजा भागविणे या दोन्ही गोष्टींचा तोलही संस्थेस सांभाळावा लागतो. स्त्रीशिक्षणाचे कार्य उभे करीत असताना, अण्णांना या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने काम करावे लागत होते. या कार्याची महती व गरज जाणून, अनेक सेवावर्ती कार्यकर्ते त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांना लाभले. पत्नी आनंदीबाई, मेहुणी पार्वतीबाई आठवले, या कुटुंबातील सदस्यांसह अनेक समविचारी सहकारी, त्यांच्या या कार्यातील सहप्रवासी होते. त्यांच्या या सर्व सहकार्यांनी संस्थेतील अन्य कामांसह आश्रमाकरिता निधी गोळा करण्याचेदेखील काम अथकपणे अगदी प्रसंगी परदेशात प्रवास करूनही आयुष्यभर केले.
भावाबहिणीच्या या नात्यांतील स्नेहाचा ओलावा जपत, अत्यंत सन्मानपूर्वकरित्या निधी संकलित करण्याचा वेगळेपणा ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’ने तब्बल 100हून अधिक वर्षे, अगणित कुटुंबांच्या सहभागातून करून दाखविला आहे. या उपक्रमाचे शताब्दी वर्ष 2020 साली साजरे करण्यात आले. मुख्य म्हणजे, या उपक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही घेण्यात आली आहे. या आगळ्या वेगळ्या सामाजिक भाऊबीजेचा, आजपर्यंतचा प्रवासही अत्यंत कौतुकाचा व अनेकदा समाधानाने डोळे व मन भरून येणारा ठरला आहे.
बापूसाहेबांनी प्रथम हा प्रयोग 1919 साली केला. आश्रमातील मुलींनी दिवाळीच्या सुट्टीत घरी गेल्यावर गावातील लोकांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती द्यायची व आश्रमातील मुलींकरिता ’भाऊबीज’ गोळा करायची, अशी संकल्पना मांडली. संस्थेस दैनंदिन व्यवहार व्यवस्थितपणे चालवण्यासाठी निधीचे अखंड पाठबळ लागते. हे काम अधिक लोकांकडून विस्तृत प्रदेशात व कमी काळात होणे गरजेचे होते. काळ कमी असल्याने स्वयंसेवकांचा उत्साह टिकून राहील व उत्साही वातावरणात लोकांनाही पैसे देणे जड जाणार नाही, हा विचार प्रामुख्याने त्यामागे होता. अर्थातच, या प्रयोगाचे फलित काय असेल, याबाबत व्यवस्थापन मंडळात अनेक संभ्रम होते.
मात्र, बापूसाहेबांनी अतिशय बारकाईने या संकल्पनेचा विचार (सूक्ष्म नियोजन) केला होता. भाऊबीज निधी संकलनाकरिता जाताना, मुलींनी कसे व नेमके काय बोलावे, कसे वागावे, कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हिशोब कसा ठेवावा, पावती देणे आवश्यक का? या सर्व गोष्टींचे ते मार्गदर्शन मुलींना करीत. मुख्य म्हणजे, मुलींची समिती नेमूनच ते हिशोब चोख ठेवीत. पुढील दहा वर्षांत भाऊबीज संकल्पनेची घडी बसविण्यात बापूसाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. मुळातच ते स्वतः कल्पक व हरहुन्नरी होते. निरनिराळ्या योजनांची आखणी करणे, तिची यशस्वी कार्यवाही करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. याच दरम्यान महिला विद्यापीठाची जबाबदारी संस्थेने घेतली असल्यामुळे या कामात अण्णांचा बराच वेळ जाई. अशा स्थितीत संस्थेची आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी बापूसाहेबांनी ही योजना मांडली व या कामाची घडीही उत्तमरित्या बसविली होती. बापूसाहेबांनी अशा प्रकाराने निधी संकलित होताना अनेक पाश्चिमात्त्य देशात पहिले होते.
पहिल्या वर्षी म्हणजे 1919 साली एकूण रु. 1 हजार, 779 व सात आणे व तीन पैसे जमल्याची नोंद जमाखर्चात (ताळेबंद) दिसून येते. या कल्पक व तितक्याच भावनिक संकल्पनेस मिळालेला समाजाचा प्रतिसाद पाहून ही योजना प्रतिवर्षी चालविण्याची संमती व्यवस्थापक मंडळाने दिली. भाऊबीजेला एक परंपरेचा सांस्कृतिक व भावनिक संबंधही असल्यामुळे समाजाने या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला व आजही अगदी 100 वर्षांनंतरही तो तसाच उत्साहपूर्ण आहे, हे विशेष. आपल्या कुटुंबातील बहिणीला भाऊबीज देताना, आश्रमातील बहिणीलाही भाऊबीज देण्याची जणू सवयच या उपक्रमाने जगाच्या पाठीवरील अनेक कुटुंबांना लावली.
मुख्य म्हणजे, समाजाच्या उतरंडीवरील सर्व घटकांपर्यंत ही संकल्पना पोहोचविण्याकरिता व ती सर्व स्तरांतून स्वीकारली जावी, यादृष्टीने संस्थेतील अनेक स्वयंसेवकांनी (स्त्री-पुरुष) अत्यंत निष्ठेने व सातत्य राखत अनेक कुटुंबांना न चुकता नित्यनेमाने भेटी दिल्या व त्यांच्या ओंजळभर मदतीचे निमित्त साधत अनेक छोटे-मोठे हितचिंतक व संस्थेत स्नेहाचा साकव बांधला. अगदी फुलवाले, भेळ-फुटाणे विकणारे, शेतकरी, गावातील बारा बलुतेदार, कष्टकरी समाज, निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे, नोकरदारवर्ग इत्यादींना सामावून घेणारी ही योजना आहे. एक-दोन पैशापासून अगदी रुपया देणारे हितचिंतक या स्वयंसेवकांनी संस्थेशी बांधले.
आज संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढत असताना गरजू विद्यार्थिनींची संख्याही त्याच पटीने वाढत आहे; त्यामुळे काळानुरूप ‘भाऊबीज’ संकल्पनेचे महत्त्वही दिवसागणिक वाढतच आहे. म्हणूनच आज या संस्थेची व्याप्ती वाढ असताना, हितचिंतकांच्या ओंजळभर मदतीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. ‘भाऊबीज निधी’ संकलित करणार्या स्वयंसेवकांची वाट पाहणारी कुटुंबे, आजही पाहायला मिळतात, हे या योजनेचे लोकांच्या मनातील स्थान आहे. पुढे संस्थेच्या संपर्कात आलेले हितचिंतकही भाऊबीज संकलन उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी झाले. अगदी वयाची सत्तरी ओलांडलेले स्वयंसेवकदेखील मोठ्या उत्साहाने या कामात स्वतःला झोकून देताना आजही दिसतात.
‘भाऊबीज’ उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेस एका अक्षय व अखंड वाहणार्या निर्झराची किंवा गंगोत्रीची प्राप्ती झाली, असा उल्लेख अण्णांच्या लिखाणात दिसून येतो. बापूसाहेबांनी आश्रमात कामांस सुरुवात केली व 1919 साली ते संस्थेचे आजन्म सेवक झाले. 1917 मध्ये सुरू झालेल्या शाळेत मुलींची संख्या केवळ तीन होती, मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंत ती संख्या 395 पर्यंत गेली होती. आज ही संख्या अंदाजे 32 हजार आहे. 1929 मध्ये त्यांचा अकाली मृत्यू विषमज्वराने झाला. मात्र, तोपर्यंत (1919 ते 1928) त्यांनी भाऊबीज संकलनाचा निधी रु. 30 हजारांपर्यंत पोहोचविला होता. त्यांच्या मृत्यूनंतरही भाऊबीज योजना त्याच पद्धतीने चालू आहे. संस्थेतील विद्यर्थिनी, सेवकवर्ग, हितचिंतक आज ही ‘भाऊबीज निधी संकलना’त त्याच विश्वासाने व निष्ठेने कार्यरत आहेत. शांताबाई परांजपे, गजानन जोशी, कुसुमताई शेंडे, शशिकांत ठाकूर गुरुजी आणि मनीषा कोपरकर अशी काही ठळक नावे ‘भाऊबीज निधी संकलना’तील अग्रणी म्हणून घेता येतील. आज तरुण पिढीही या कामात उत्साहपूर्ण सहभाग घेत आहे, हे विशेष.
’भाऊबीज योजना’ ही संस्थेची आर्थिक गरज भागविण्यात उपयुक्त ठरलीच. परंतु, यानिमित्ताने आज लाखो कुटुंबे महर्षि अण्णांच्या संस्थेचे हितचिंतक झाले. संस्थेस मदत, सहकार्य करणारे चार मोठे देणगीदार कमी पडले तरी चालतील, मात्र संस्थेचे हितचिंतक हे वाढलेच पाहिजेत, असा मोठा विचार या योजनेमागे दिसून येतो. खरं तर कोणत्याही संस्थेचे अस्तित्व हे हितचिंतकांच्या जोरावरच अबाधित राहते, त्यात असतो कौटुंबिक आपुलकीचा भाव व यातूनच संस्थेला, मदतीकरिता मिळतात शेकडो मदतीचे हात...
‘अण्णांची संस्था होण्या मोठी, द्या भाऊबीज जरी असेल छोटी’ म्हणत या योजनेने अनेक कुटुंबे जोडली व अनेक गरीब व गरजू मुलींसाठी शिक्षणाची दालने खुली केली. या योजनेच्या यशामागे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ’कमीत कमी निधीबाबत नसणारी अट’ व त्यामुळेच समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्यापरीने या सेवेच्या यज्ञकुंडात योगदान देत राहिली. सामाजिक संस्था दीर्घायुषी करण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी कायमच केला पाहिजे. संस्था अल्पायुषी होण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यांतील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जमा-खर्चाची अव्यवस्था, हे अण्णांच्या संस्थेने कायम लक्षात ठेवले आहे आणि ही कार्यपद्धती विकसित केली आहे.
संस्थेतील आर्थिक शिस्त, पारदर्शकता व उत्तरदायित्वाची प्रबळ भावना या सर्व गोष्टींवर भर दिल्यामुळे समाजाचा संस्थेवर प्रचंड विश्वास अधोरेखित होत आहे. सामाजिक भाऊबीजेचा हा उपक्रम सर्वांनाच मार्गदर्शक झाला आहे. स्वच्छ व प्रभावी कार्य असेल, तर अशा कार्याला मोठी समाज मान्यता मिळते आणि पैशाची कमतरता अजिबात भासत नाही, हे या उपक्रमातून संस्थेने एक चांगले, आदर्श उदाहरण घडविले आहे. आपणही या ईश्वरी कार्यात सहभागी होऊ शकता व ‘भाऊबीज निधी संकलन’ उपक्रमात स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देऊ शकता. आपल्या कुटुंबातील बहिणींसह, आश्रमातील आपल्या बहिणीलाही न विसरता भाऊबीज पाठवून, एक अधिक नाते स्नेहाचे बांधूच शकता.
स्मिता कुुलकर्णी